MKCL ऑलिंपियाडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय संधी : किशोर खडगी

सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथे शिक्षकवृंदाचा सन्मान; विद्यार्थ्यांना कृत्रीम बुद्धिमत्तेचे महत्त्व दिले पटवून 

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.२७/०९/२०२६
सावित्रीबाई फुले विद्यालय,पवनी येथे वैनगंगा कंप्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक किशोर खडगी यांनी सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण,MKCL ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विद्यालयात आगमन झाल्यानंतर विद्यालयाच्या वतीने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये,वैनगंगा कंप्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक किशोर खडगी तसेच अड्याळ येथील अंगणवाडी सेविका अर्चना टेंभुर्णे उपस्थित होत्या.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) यांच्या वतीने मुख्याध्यापिका सुजाता गजभिये तसेच विद्यालयातील शिक्षकवृंदाचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.शिक्षक समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी अविरत परिश्रम घेत असतात.त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील उपक्रमशील शाळांना भेट देऊन गुरुजनांचा सन्मान करण्याची परंपरा किशोर खडगी यांनी यंदाही कायम ठेवली.

यावेळी किशोर खडगी यांनी सावित्रीबाई फुले विद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांचे भरभरून कौतुक केले.तसेच MKCL मार्फत आयोजित ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षा ही राज्यस्तरीय स्वरूपाची असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानविकासासाठी तिचे विशेष महत्त्व आहे,असे सांगितले.स्पर्धेचे स्वरूप,नियम, सहभागाची प्रक्रिया तसेच विविध बक्षिसे व पारितोषिके जिंकण्याच्या संधी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आधुनिक युगातील कृत्रीम बुद्धिमत्ता (AI) चे वाढते महत्त्व स्पष्ट केले.विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य व सर्जनशील वापर करून आपल्या ज्ञानात भर घालावी,असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्य शासन पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप मुंडले,ललिता डेकाटे,अरुणा कांबळे,अर्चना दडवे,स्मिता मोहरकर,प्रतिक रंगारी,सुमय्या शेख,काजल नाकाडे तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!