राष्ट्रीय निकाल लेखन स्पर्धेत निधी सोनवाणे प्रथम
मूल : युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ अँड रिसर्च, युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मेघालय (USTM) यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘ऑल इंडिया लॉ ग्रॅज्युएट कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये आयोजित Judgement Writing Competition (निकाल लेखन स्पर्धा) मध्ये निधी सोनवाणे हिने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
देशभरातील कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत निधी सोनवाणे हिने आपल्या कायदेविषयक ज्ञान, तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि प्रभावी लेखनशैलीच्या जोरावर अव्वल स्थान मिळविले.
निकाल लेखन ही कायद्याच्या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची कौशल्याधारित स्पर्धा मानली जाते. कायद्याच्या तरतुदींचा अचूक अभ्यास करून उपलब्ध तथ्ये, पुरावे आणि कायदेशीर बाबींचे विश्लेषण करत न्यायालयीन निर्णयाच्या स्वरूपात प्रभावी लेखन करणे हे या स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत निधीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिच्या शैक्षणिक आणि कायदेविषयक गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
निधी सोनवाणे हिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षकवर्ग तसेच कायदे क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या या यशामुळे मूल परिसराच्या शैक्षणिक आणि कायदेविषयक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भविष्यात कायद्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याची क्षमता या यशातून अधोरेखित झाली असून, निधी सोनवाणे हिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!