कोरंबी रोडच्या दुरवस्थेवर विदर्भ युवा क्रांती संघटना आक्रमक; तात्पुरती डागडुजी नको, कायमस्वरूपी रस्त्याची मागणी

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या कोरंबी रोडची गेल्या काही काळापासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याची तातडीने पाहणी करून दर्जेदार व कायमस्वरूपी रस्ता तयार करण्यात यावा, या मागणीसाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेच्या वतीने पवनी नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले.

रस्त्याची परिस्थिती गंभीर असताना संबंधित नगरपरिषद प्रशासनाकडून केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे, डागडुजी केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच रस्त्याची अवस्था पुन्हा पूर्वीपेक्षाही खराब झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

“केवळ फोटो काढण्यासाठी किंवा दाखवण्यापुरती डागडुजी करून नागरिकांच्या समस्येवर पडदा टाकण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा विदर्भ युवा क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला.

तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी रस्त्याची तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने पाहणी करून कायमस्वरूपी व दर्जेदार रस्ता तयार करण्यात यावा, तसेच नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करण्यासाठी संबंधित विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

हे निवेदन विदर्भ युवा क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक सिंग टाक यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अन्यथा नागरिकांच्या हितासाठी आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!