"एक झाड, एक जीवन; पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे" – गणेश येरमे

कोलारा ग्रामपंचायतीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; वृक्षारोपण व स्वच्छता अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि जनजागृतीद्वारे कोलारा ग्रामपंचायतीचा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य गणेश येरमे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोलारा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच गावात स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. वाढते प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड आणि नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला ऱ्हास या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण हाच प्रभावी उपाय असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत प्रशासक शोभा कोयचाडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश येरमे, ग्राम अधिकारी संजय ठाकरे, मधुकर जिवतोडे, क्षेत्र सहाय्यक मेडुलकर, वनरक्षक शिवा रोकडे तसेच झिरो वेस्ट अभियानाच्या प्रमुख प्रिती व दिपा यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गावातील ग्रामसंघाच्या महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. वृक्षांमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होते, भूजल पातळी टिकून राहते, जैवविविधतेचे संरक्षण होते आणि भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ व निरोगी पर्यावरण मिळण्यास हातभार लागतो, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी लावण्यात आलेल्या वृक्षांच्या नियमित देखभालीची आणि संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार करण्यात आला. "फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्या झाडांचे संगोपन करून त्यांना मोठे करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे," असा संदेशही कार्यक्रमातून देण्यात आला.

पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित करत, "एक झाड, एक जीवन" हा संदेश ग्रामपंचायतीच्या या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!