वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
मोटेगाव येथील घटना
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर तालुक्यातील मोटेगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोटेगाव येथील दिलीप नन्नावरे वय अंदाजे ४७ वर्षे आहे. हे नेहमीप्रमाणे सकाळी बकऱ्या चराईसाठी जंगल परिसरात घेऊन गेले होते. मात्र उन्हाळा असल्यामुळे सकाळी बकऱ्या चराईला नेल्या असता ते सकाळी ११ वाजेपर्यंत परत येत असायचे परंतु बकऱ्या घरोघरी पोहचल्या व चराई करणारे घरी परतले नाहीत.म्हणून गावात सर्वत्र याविषयी चर्चा रंगली त्यानंतर विशेष म्हणजे त्यांच्या बकऱ्या स्वतःहून गावात परत आल्याने कुटुंबीयांना शंका आली. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी मोटेगावलगतच्या पहाडी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली.
शोधादरम्यान दिलीप नन्नावरे हे वाघाच्या हल्ल्यात मृतावस्थेत आढळून आले. हि घटना सकाळी १२ ते १ वाजेदरम्यान घडल्याचे कळाले.या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना सातत्याने घडत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. वाघ, बिबट व इतर वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे जंगलालगतच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी वन विभागाने गस्त वाढवावी, धोकादायक भागांमध्ये तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
वन्यप्राणी आणि मानव संघर्ष थांबणार कधी?
चंद्रपूर जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे वन्यप्राणी आणि मानव संघर्षाचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी शासन व वन विभागाने दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. वनमंत्र्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!