राळेगाव येथे शेतकऱ्यांचा गटाच्या माध्यमातून तेलघाणी उद्योग सुरू

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील राळेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ३८० एकर क्षेत्रावर जवस पिकाची लागवड केल्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात जवसाचे उत्पादन उपलब्ध होणार आहेत.त्यापासून मूल्यवर्धन करीत तेल निर्मिती करावी व  विक्री उद्योग उभारणी करावा, असे आवाहन राळेगाव येथील तेलघाणी प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी उपस्थित गटांना केले.
 राळेगाव येथे आयोजित अखिल भारतीय समन्वयीत जवस  संशोधन प्रकल्प ,कृषी महाविद्यालय नागपूर व कृषी विभाग वरोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिवासी उपप्रकल्प ,अनुसूचित जाती उप प्रकल्प ,आणि प्रथम रेषीय प्रात्यक्षिक अंतर्गत जवस पिक शेतीदिन व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतांना कुलगुरू शरद गडाख यांनी म्हटले की,जवस मध्ये ओमेगा-३ चे प्रमाण ५८ टक्के पर्यंत असल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण ९ ते १८ टक्क्यांनी कमी करते तसेच सांधेदुखी, पाठदुखी कमी करते.जवस तेलाच्या वापरामुळे हाडे मजबुत राहतात,मधुमेह आटोक्यात येतो,सर्व रोगांना प्रतिकारशक्ती तयार करते.त्यामुळे दररोज च्या आहारात शेतकऱ्यांनी स्वयंनिर्मित जवस तेलाचा वापर करावा.डॉ बिना नायर,वरिष्ठ जवस पैदासकार, जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, नागपूर यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, संशोधित जवस वाण एन. एल.- 260  या जातीचे पीक प्रात्यक्षिके मौजा-राळेगाव, अकोला, बेंबळा, वायगाव भोयर, वडधा माल, पारडी , पिंपळगाव ,चारगाव (बु) इत्यादी गावात 110 एकरवर  लागवड करण्यात आली आहेत.तसेच कृषी विद्यापीठ कडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी उत्पादक गट, राळेगाव यांना तेलघाणी प्रकल्प 100% अनुदानावर देण्यात आलेला आहे. 
         जवस शेतीदिन च्या शिवारफेरी मध्ये राळेगाव येथील भालचंद्र थुल व प्रशांत थुल यांच्या जवस पीक प्रात्यक्षिकाची पाहणी करून कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.व जवस पिकाचा लागवड ते विक्री पर्यंत चा संपूर्ण ताळेबंद शेतकऱ्यांना समजावून सांगितला.  मंडळ कृषी अधिकारी, शेगांव बु.अंतर्गत क्लस्टर बेसिस वर उत्कृष्ठ प्रात्यक्षिक नियोजन केल्याबद्दल कुलगुरू यांनी समाधान व्यक्त केले. 
         जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर शंकरराव तोटावार यांनी सर्वांच्या प्रयत्नामुळे यावर्षी 20 टक्के रब्बी पीक पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याचे सांगितले. भात पीक निघाल्यावर रब्बी हंगामामध्ये तेलबिया पिके करडई,जवस,मोहरी इत्यादी पिकाची लागवड फायदेशीर ठरेल त्यामुळे रब्बी क्षेत्र वाढीत सर्व शेतकऱ्यांनी हातभार लावावा, असे आवाहन केले. 
        मागील पाच वर्षांपासून जवस पीकाचे उत्कृष्ठ उत्पादन घेत असलेले प्रगतशील शेतकरी संदीप थुल(राळेगाव),बंडूजी शेळकी (वडधा माल) व नथ्थुजी शेळकी (पिंपळगाव) यांचा कुलगुरू गडाख यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
    हवामान अनुकूल आधारित जवस बियाण्याचा वापर ,पीक पध्दतीत बदल व रसायन मुक्त शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून तेलबिया पिकाची लक्षणीय क्षेत्रवाढ करण्यात अग्रेसर असणारे मंडळ कृषी अधिकारी,शेगांव बु विजय काळे यांना कुलगुरू डॉ शरद गडाख यांच्या हस्ते गौरविण्यात आले,तसेच जवस क्षेत्र वाढीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल सहाय्यक कृषी अधिकारी वैभव साळवे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
     डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे संशोधन संचालक डॉ एस.एस.माने यांनी मानवी आहारात ज्वारी पिकाचे महत्त्व,सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय,नागपूर डॉ व्ही.एम.इलोरकर यांनी यशस्वी बांबू लागवड,मोहरी पैदासकार डॉ संदीप कामडी यांनी मोहरी पिकाचे लागवड तंत्रज्ञान, तारसा संशोधन प्रकल्प चे डॉ बिराजदार यांनी जवस पिकावरील किडी व रोग या विषयावर शेतकऱ्यांना समयोचित मार्गदर्शन केले.
   या कार्यक्रमास सहयोगी संशोधन संचालक डॉ एस.बी.अमरशेट्टीवार,उपविभागीय कृषी अधिकारी,वरोरा कविता हरिनखेडे, तालुका कृषी अधिकारी,वरोरा रवी राठोड व दूरदर्शन नागपूर चे कृषी कार्यक्रम निष्पादक मनोज जैन यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.कृषी भूषण शेतकरी  मधुकर भलमे,सुरेश गरमडे, हेमंत शेंदरे व परिसरातील 150 शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहून चर्चासत्रात भाग घेतला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या कोमल वाणीतून तांत्रिक सहाय्यक वैध मॅडम यांनी केले.उप कृषी अधिकारी प्रफुल आडकीने, गजानन सवंडकर, तंत्र सहाय्यक नंदकिशोर टेकाळे,सहाय्यक कृषी अधिकारी साळवे, राठोड,धुडसे, मोरे,तुराणकर,वानखेडे व समूह सहाय्यक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!