पवनी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर स्ट्रीट लाईट व स्पीड ब्रेकरचा अभाव – तात्काळ कारवाई न झाल्यास विदर्भ युवा क्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असून अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस मोठया प्रमाणावर वाढतच चालले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारामुळे वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक व वेगवान वाहने जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. यासंदर्भात विदर्भ युवा क्रांती संघटने तर्फे नगर परिषद प्रशासनास निवेदन देण्यात आले असून,
बंद असलेले स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करावेत,आवश्यक त्या ठिकाणी नवीन स्ट्रीट लाईट बसवावेत,अपघात प्रवणस्थळी व वस्तीच्या भागात स्पीड ब्रेकर तातडीने बसवावेत,अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.जर या मागण्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!