शिवकालीन मर्दानी खेळांतूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य - डॉ. विजया नंदुरकर
पवनी येथे राज्यस्तरीय शालेय 'आष्टेडू आखाडा' क्रीडा स्पर्धांचे दिमाखदार उद्घाटन
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२१/०१/२०२६ "खेळ हे केवळ शारीरिक सुदृढतेचे माध्यम नसून ते शिस्त आणि जिद्द रुजवणारे संस्कार केंद्र आहे. आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिवकालीन मर्दानी खेळांचा वारसा जोपासणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन पवनीच्या नगराध्यक्षा डॉ.विजया नंदुरकर यांनी केले.
स्थानिक गांधी भवन येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय 'आष्टेडू आखाडा' क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे), जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (भंडारा) आणि भंडारा जिल्हा आष्टेडू आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २० व २१ जानेवारी रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक,माजी जि.प.सदस्य विकास राऊत,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देवराज बावनकर,अर्बन बँकेचे संचालक लोमेश वैध,क्रीडा अधिकारी आकाश गायकवाड, तालुका क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी, महाराष्ट्र राज्य आष्टेडू आखाडा असोसिएशनचे सचिव राजेश तलमले,मीडिया प्रमुख सचिन हुमने,ऋषी सुपारे व मुख्याध्यापक विवेक गायधने उपस्थित होते.
प्रारंभ आणि गौरव:
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन, माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून शिवकालीन क्रीडा शस्त्रांचे पूजन करण्यात आले.यावेळी उद्घाटक डॉ. विजया नंदुरकर व जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
नेत्रदीपक प्रात्यक्षिके:
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ८ विभागातुन ३२५ क्रीडा स्पर्धक सहभागी झाले.
उद्घाटन सोहळ्यात खेळाडूंनी सादर केलेल्या शिवकालीन मर्दानी खेळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
खेळाचे महत्त्व:
प्रास्ताविकात राजेश तलमले यांनी सांगितले की, "या खेळांमुळे शिवकालीन संस्कृतीचे जतन तर होईलच,पण शालेय राज्य क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना माध्यमिक शालांत परीक्षेत वाढीव गुणांचा फायदाही मिळणार आहे."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी केले,तर आभार प्रदर्शन राजेश येलसट्टीवार यांनी मानले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक जगदीश देशमुख,प्रदीप घाडगे,यशवंत कावळे,उल्हास आडे,निशांत नेवारे,तुषार भोगे,शुभम चव्हाण व गणेश कोकाटे या क्रीडा शिक्षकांनी,तथा क्रीडा समिती सदस्य
वंश बावनकर,वैभव तुळसकर,आदित्य हटवार,पियुष मेश्राम,वेदांत देशमुख,यश पिसे, श्रीकांत नागपुरे,कल्याणी नंदनवार,युगल सोनवाने,धनश्री पडोळे यांनी अथक परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!