हकालपट्टी केवळ दिखावा? यादी फाडण्यामागे ‘महोत्सवी आमदार’ असल्याची चर्चा

भाजपात बेशिस्तीचा स्फोट! प्रदेशाध्यक्षांची यादी फाडली, ‘आकां’च्या इशाऱ्यावर महानगर अध्यक्षांचा वापर


चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीने भाजपातील तथाकथित “शिस्तबद्ध पक्ष” ही प्रतिमा चक्क चुरडून टाकली आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी मंजूर केलेली उमेदवारांची अधिकृत यादी थेट फाडून टाकण्याचे धाडस चंद्रपूरमध्ये करण्यात आले असून, या बेशिस्तीमागे कोण आहे, हे आता लपून राहिलेले नाही.

चंद्रपूर भाजपा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी परस्परपणे तब्बल १० ते १२ निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची नावे यादीतून काढून टाकत पक्षाच्या सर्वोच्च शिस्तीलाच लाथ मारली. हा निर्णय कोणत्या अधिकाराने? हा प्रश्न आता भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात घुमत आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशालाच खुलेआम आव्हान देणाऱ्या या कृत्यामुळे, चंद्रपूर भाजपात अराजक माजले आहे. अखेर प्रदेश नेतृत्वाला हस्तक्षेप करत कासनगोट्टूवार यांची तात्काळ हकालपट्टी करावी लागली. मात्र ही कारवाई म्हणजे केवळ डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू आहे.

कारण या संपूर्ण राजकीय खेळाचा सूत्रधार वेगळाच आहे.
ही यादी बदलण्याची हिंमत सुभाष कासनगोट्टूवार यांची नव्हे, तर त्यांच्या ‘आका’ आमदार किशोर जोरगेवार यांची असल्याचे आता जिल्हाभरात बोलले जात आहे. नेत्यांच्या सत्तासंघर्षात कासनगोट्टूवार यांना बळीचा बकरा बनवण्यात आले, आणि खरे खेळाडू मात्र सुरक्षित अंतरावर उभे राहिले.

मागील विधानसभा निवडणूकीत भाजपात दाखल झालेले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त असल्याचा दावा करणारे आमदार किशोर जोरगेवार यांनी, भाजपातील ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थकांना लक्ष्य करत उमेदवार यादीतून योजनाबद्ध कपात केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

भाजपाच्या राजकीय इतिहासात हा काळा अध्याय ठरत आहे.
प्रदेशाध्यक्षांनी मंजूर केलेली यादी बदलणे, जिल्हा अध्यक्षाकडून आदेश झुगारणे, आणि पक्षशिस्तीला तिलांजली देणे — हे सर्व एका व्यक्तीच्या अहंकारासाठी घडत असल्यांचा आरोप होत आहे.

कारवाई मात्र झाली ती फक्त एका प्याद्यावर.
मात्र या सत्तासंघर्षाचा मुख्य सूत्रधार असलेल्या ‘महोत्सवी आमदार’ किशोर जोरगेवार यांच्यावर पक्ष कारवाई करणार की त्यांना मोकळे सोडणार? हा प्रश्न आता भाजपासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे.

ही निवडणूक केवळ महानगरपालिकेची नाही, तर भाजपाच्या संघटनात्मक शिस्तीची, नेतृत्वाच्या विश्वासार्हतेची आणि पक्षातील अंतर्गत लोकशाहीची परीक्षा आहे.

प्रदेश नेतृत्वाने जर खऱ्या दोषींवर हात टाकला नाही, तर चंद्रपूरमध्ये झालेली ही बेशिस्ती उद्या राज्यभरात 'मिसाल' ठरण्याची भीती नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!