६ ऑक्टोबरला नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत
राज्यातील रखडलेल्या नगरपरिषद निवडणुकांना गती
६ ऑक्टोबरला नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत
मुंबई :
राज्यातील रखडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा होत आहे. येत्या ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार असल्याचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत.
नगरविकास खात्याच्या उप सचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांनी ३ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना या सोडतीच्या वेळी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सोडतीत राज्यातील २४७ नगरपालिका व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित होणार आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही सोडत पार पडणार असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील काही काळापासून रखडलेल्या होत्या. मात्र आता आरक्षण प्रक्रियेला सुरूवात झाल्याने राजकीय पक्षांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. सोडतीनंतर उमेदवार निवड व प्रचाराचा धुराळा उठणार असून स्थानिक राजकारणात चांगलाच कलाटणीबाज रंग भरला जाणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!