"राजोलीकरांचा धडा – स्पीड ब्रेकरवर पट्टे, प्रशासनाला झटके!"

गावकऱ्यांनीच उचलली जबाबदारी! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर जनतेचा झणझणीत चपराक

मूल-नागपूर महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने काही ठिकाणी स्पीड ब्रेकर निर्माण केले आहेत. मात्र या स्पीड ब्रेकरबाबत कोणतीही सूचना, संकेत फलक, किंवा पांढऱ्या पट्ट्यांची खूण नसल्यामुळे या महामार्गावर अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेक दुचाकीस्वार, वाहनचालक अचानक समोर आलेल्या या अदृश्य स्पीड ब्रेकरवरून आदळत आहेत. यामुळे अनेकांना दुखापतीस सामोरे जावे लागत आहे.
"बांधकाम विभागाचे डोळे बंद – गावकऱ्यांनीच घेतली पुढाकार!"
या अपघातांची गंभीरता लक्षात घेऊन राजोली गावातील जागरूक नागरिकांनी आपसात पैसे जमा केले, रंग विकत घेतला आणि स्वतःच हातात ब्रश घेऊन स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारले. एकीकडे सरकारी यंत्रणा कुंभकर्णी झोपेत असताना, दुसरीकडे गावकऱ्यांनी केलेले हे कार्य सामाजिक सजगतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.



"लोकांनी दाखवली एकजुट – यंत्रणेला जागे करण्याचा धडाका"
गावकऱ्यांनी कोणताही राजकीय फायदा न पाहता, फक्त सार्वजनिक सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला. हे काम करताना त्यांनी कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी न घेता, केवळ जनतेसाठी झुकलेला तोल दाखवला. यामुळे ‘सत्ताधाऱ्यांनी जिथे हात झटकले, तिथे सामान्य माणूस खांदे देतो’ हे पुन्हा सिद्ध झाले.
"ही वेळ यावीच का लागते?" – संतप्त जनतेचा सवाल
सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार या बाबत कळवले गेले, तक्रारी केल्या गेल्या, मात्र यंत्रणा ढिम्म राहिली. केवळ स्पीड ब्रेकरची ओळख दर्शवणारे पट्टे काढणे ही साधी गोष्ट देखील विभागाला जमत नसेल, तर त्यांच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय, असा सवाल आता निर्माण झाला आहे.
"गावकऱ्यांचे अभिनंदन – खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधित्व"
राजोलीकरांनी एकत्र येत दाखवलेला हा धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रम इतर गावांसाठीही दिशादर्शक ठरणार आहे. नागरिकांच्या या एकजुटीचे आणि सजगतेचे जाहीर अभिनंदन करत, एक सामाजिक उदाहरण म्हणून याची नोंद घ्यावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!