उद्या होणार निरक्षर आजी आजोबांची परीक्षा - सावली तालुक्यात 2600 निरक्षरांसाठी केंद्र सज्ज @ केंद्र शासन करतेय साक्षरतेच्या नावाखाली धुळफेक


सावली - (विजय कोरेवार )

दहावी-बारावीच्या परीक्षेतून नातवंडे मोकळी होताच आता घरातील निरक्षर आजी-आजोबांची परीक्षा होणार आहे. नव भारत साक्षरता कार्यक्रमातून शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या या प्रौढांची येत्या रविवारी 23 मार्चला परीक्षा घेतली जाणार असून सावली तालुक्यातून 2600 आजी आजोबा परीक्षा देणार आहेत. कोणतेही शिक्षण न देता फक्त शासनाला कागदावर आम्ही साक्षर केल्याचा प्रताप दाखवून जनतेमध्ये धुळफेक करीत असल्याची प्रतिक्रिया शिक्षण तज्ञाकडून व्यक्त होत आहे.

          केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रमात गेल्या वर्षभरापासून असाक्षरांची नोंदणी सुरू आहे स्वयंसेवकांमार्फत शिकवायचे होते मात्र तालुक्यात कुठेही शिकवणी झाल्याचे दिसलें नाही व उतरवयात शिक्षण घेण्याची हौसही कुणाला नाही. तरी त्यांना आता परीक्षा घेऊन त्यांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे. या परीक्षेची पूर्व तयारीसाठी परीक्षार्थ्यांना साक्षर करण्याची गरज असते मात्र कुठे साक्षर करण्यात आले याबाबत गौडबंगाल आहे. 

  विद्येविना मती गेली।

मतीविना नीती गेली |

नीतीविना गती गेली | 

गतिविना वित्त गेले |

वित्तविना शूद्र खचले |

इतके अनर्थ एका अविद्येने केले ॥

              -महात्मा ज्योतिबा फुले

उपरोक्त पंक्तीतून महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व जनसामान्यांना पटवून दिले आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक सुधारणेसाठी आपले आयुष्य वेचले. पन्भे सांगताना म. फुले यांनी केवळ शिक्षणाचे सोंग करण्यास सांगितलेले नाही. 

      ज्यांना शाळा शिकायची आहे, अशा शाळेत येणाऱ्या विद्यार्थाना शैक्षणिक सुविधा ना पुरविता, त्यांना पुरेसे शिक्षक न पुरविता, जे वृद्ध काही दिवसात स्मशानात जाणार आहेत अशांना साक्षर करून केंद्र शासनाला काय साध्य करायचा आहे. सावली तालुक्यात 2600 निरक्षरांची नोंदणी झालेली असून त्यांची परीक्षा व्यवस्था गावस्तरावर जिल्हा परिषद शाळेत केलेली आहे. त्यासाठी पर्यवेक्षक, परीक्षकांचीही नेमणूक केली आहे. निरक्षर म्हणून नोंदविले गेलेले सर्वच निरीक्षर परीक्षा केंद्रावर आले पाहिजे याकरीता, दोन दिवसापूर्वीच सर्व शिक्षकांनी ते नोंदविलेल्या निरक्षरांच्या घरी जावून, परिक्षेला हजर राहण्यांची विनंती करीत होते, या वयात आता कशाची परीक्षा घेता, नातू—पणतूला शिकवा असे जरी निरीक्षर वृध्दांनी सांगीतले तरी, शिक्षकांनी हात जोडून त्यांना परिक्षेसाठी तयार करीत असल्यांचे दृष्य चित्तवेधक होते. या कामात कोणीही हयगय करू नये यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. सक्तीने उपस्थित राहण्याचे आदेश निर्गमीत केले असून, कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांची, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रजा मंजूर करू नये असे आदेशात नमुद केले आहे. वृध्दांच्या परिक्षेत अडथळा येवू नये यासाठी शिक्षण विभागाच्या मॅराथान बैठका घेण्यात आल्या होत्या. मरणाच्या वाटेवर असलेल्याना साक्षर करून कोणता विकसित भारत सरकार करणार आहे हे न उलगडणारे कोडेच आहे. या अभियानात सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून अंगठाच लावण्याची पाळी निरक्षरांवर येणार असेल त्याचा उपयोग काय? असा प्रश्न शिक्षणतज्ञ करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!