गडचिरोली जिल्ह्याच्या नियोजनाकडे पालकांचे दुर्लक्ष - पालकमंत्री दोन तरीही जिल्हा नियोजनची बैठक ऑनलाईन का ? ✋ काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा सवाल
गडचिरोली जिल्ह्याच्या नियोजनाकडे पालकांचे दुर्लक्ष - पालकमंत्री दोन तरीही जिल्हा नियोजनची बैठक ऑनलाईन का ?
✋ काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा सवाल
गडचिरोली -
मागील अडीच वर्षाच्या सत्ताकाळात आताचे मुख्यमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पद असल्याने देवेंद्र फडणवीस यांचेकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. त्यावेळेसही एकही जिल्ह्याची नियोजन बैठक घेतल्या नसल्याची बोंब होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी फडणवीसांचा "फराळाला येणारे पाहुणे" असा उल्लेख केला होता. मुख्यमंत्री कडे कोणतेही पालकमंत्री पद राहत नाही मात्र त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेऊन सहपालकमंत्री म्हणून ऍड. आशिष जैस्वाल यांना नेमले. मात्र पालकमंत्र्यांच्या अनुपस्थित सहपालकमंत्री जिल्ह्याची नियोजन बैठक स्वतः उपस्थित राहून घ्यायची असतांना 31 जानेवारीची बैठक ऑनलाईन घेत असल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दोन्ही पालकमंत्र्यांवर पत्रकाद्वारे निशाणा साधला आहे.
कधी नव्हे तर जिल्ह्याच्या इतिहासात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवून नवा इतिहास रचला, मात्र या सोबतच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांच्या भुवया उंचावल्या, जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य नागरिकांच्या भावना समजून घेतील. येथील नागरिकांशी संवाद साधतील अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाली. इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांना मदत म्हणून जिल्ह्याला सह पालकमंत्री सुद्धा देण्यात आले, मात्र विधानसभा निवडणूकी नंत्तर गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक 31 जानेवारी रोजी, सहपालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरेन्स च्या माध्यमातुन पार पडणार असून, जिल्ह्याला एक नव्हे तर दोन-दोन पालकमंत्री असताना देखील नियोजन समितीची बैठक ऑनलाईन का? असा सवाल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर बैठक ऑनलाईन असतांना देखील मुख्यमंत्री फडणवीस हे बैठीकीस राहु शकत नाही हे देखील मोठी शोकांतिका असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठीच गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले का? कीं फक्त आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा करून, देण्यासाठी पालकमंत्री पद स्वतः कडे ठेवले असाही प्रश्न महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील असंख्य नागरिक विविध समस्यांना घेऊन मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे, अनेक शेतकऱ्याचे धानाचे चुकारे अजून मिळाले नाही, घरकुल धारकांच्या अनेक समस्या आहेत, जिल्ह्यातील रानटी जनावरांचे बंदोबस्त संदर्भातील समस्या आहेत, जिल्ह्यातील रस्ते, दवाखाने सारख्या विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी झालेली असताना देखील निधी उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे अनेक कंत्राटदारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. असे अनेक समस्या असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यासाठी वेळ देत नसतील तर जिल्ह्यातील नागरिकांना "पालकमंत्री हटाओ गडचिरोली जिल्हा बचाओ" अशी मोहीम राबविण्याची वेळ येईल का असेही मत महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!