दारूबंदीसाठी चकपीरंजीच्या महिलांची पायदळ वारी - अवैध दारूबंदीबाबत पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह
सावली (विजय कोरेवार) -
तालुक्यातील चकपीरंजी येथील महिलांनी अवैद्य दारुविक्रीविरोधात पुढाकार घेतला असून चार दिवसापूर्वी ग्रामसभेत दारुविक्री करणाऱ्यांना ग्रामपंचायतकडून कोणतेही दाखले, सोयी सवलती न देण्याचा ठराव पारित करण्यात आला. आज चकपीरंजी ते सावली पोलीस स्टेशन असा पायदळ प्रवास करून निवेदन देत दारूबंदीची मागणी केली. आठवडाभरापासून महिलांच्या दारूबंदीचा विषय गाजत असतांना सावली पोलीस प्रशासन काहीच कार्यवाही करीत नसल्याने महिलांना पायदळ पोलीस स्टेशन गाठत मागणी करावी लागत आहे. हा सावली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण करणारा प्रवास आहे.
सावली तालुक्यातील चकपीरंजी येथे अवैद्य दारुविक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने गावात असंतोष पसरला आहे. झगडे भांडणे सुरु असू महिलांना, मुलांना फार त्रास होत आहे. त्यामुळे येथील गावाकऱ्यांनी अवैद्य दारुविक्री करणाऱ्यांना ग्रामपंचायत मधून कोणतेही दाखले द्यायचे नाही, कोणताही शासकीय लाभ द्यायचा नाही असा ठराव ग्रामसभेत पारित केला. गावात ही मागणी जोर धरत असतानाही अवैद्य दारुविक्री सुरूच आहे मात्र 3-4 किमी हाकेच्या अंतरावर असलेले पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. महिला चकपीरंजी येथून पायदळ पोलीस स्टेशनला दारूबंदीचे निवेदन देण्यासाठी जाणार असे पोस्ट सामाजिक माध्यमावर होते. तरीही आपल्या मागण्यांसाठी महिलांना पायदळ पोलीस स्टेशनला जावे लागेल यावरून पोलीस प्रशासनाची तत्परता लक्षात येते. महिला येणार याची कल्पना पोलीस प्रशासनाला नसेल का? की महिलांची थट्टा पोलीस करीत आहेत? असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आतातरी महिलांच्या दारूबंदीच्या मागणीकडे पोलीस प्रशासन लक्ष देणार का? याकडे चकपीरंजी वासियांचे लक्ष लागलेले आहे.
यावेळी महिला संघटनेचे अध्यक्ष चैतालीताई येल्लेटीवार, उपाध्यक्ष अश्विनीताई भोपये, कोषाध्यक्ष वैशालीताई चौधरी, पोलीस पाटील ईश्वर मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरुडवार, लक्ष्मी मंडरे,विनोद मडावी, पुणेश्वर येल्लेटीवार, प्रभाकर चौधरी व गावातील शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!