संकल्प पूर्तींचा आनंदी सोहळा! याची देही याची डोळा !!
संकल्प पूर्तींचा आनंदी सोहळा , याची देही याची डोळा !
सन २०१४ मध्ये जुन्या महादेव मंदिर भेटीप्रसंगी श्री सुधीरभाऊ आणि सौ. सपनाताईंनी केलेल्या संकल्पाची संकल्पपूर्ती सोमवार, दि .16 सप्टेंबर 2024 ला होतानाचा प्रत्येक मंगलमय क्षण मनूचक्षुवर कोरून ठेवावा असाच अनुभव, प्रचिती आणि सत्यता प्रत्येक समाजबांधवाला आली .
सर्वप्रथम आपले हे मंदिर महादेव मंदिर या नावाने परिचित होते परंतु ज्या क्षणी या सुसंस्कृत धार्मिक दांपत्याने मंदिरास भेट दिली आणि नवीन मंदिर बांधून देण्याचा संकल्प बोलून दाखविला त्या क्षणापासून समाजबांधवांच्या सुखाचे दिवस , आनंदाचे दिवस सुरु झाले आणि ह्या सुखद आनंदी क्षणाचा आनंद घेण्यासाठी मग नियोजनबद्ध आखणी करण्यात आली आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे 14 , 15 आणि 16 सप्टेंबर या तीनही दिवशी भरगच्च धार्मिक विधीचे , मंत्रोपचाराचे , शोडोपचाराचे आयोजन व श्री कन्यका माता परमेश्वरी मंदिराचे पुनरुत्थान आणि प्राणप्रतिष्ठापनेचा नेत्र दीपक सोहळा..... डोळ्यांचे पारणेच फिटले जणू!!!
" एका सुखद आनंदाच्या पर्वाचा प्रारंभ "
सर्वप्रथम या कार्यक्रमाचा शुभारंभ सौ. सपनाताईंच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला . विविध कार्य सुरळीत आणि वेळेत पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमून त्याची शिस्तबद्ध आखणी करण्यात आली , त्यानुसार प्रत्येक समाजबांधवाला या शुभकार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी देण्याचे ठरले . प्रत्येकाने आपआपली जबाबदारी जाणीवपूर्व आणि व्यवस्थित पार पाडण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार मग तयारीची लगबग सुरु झाली . प्रत्येक समितीचे कार्य ठरवून , त्या कामाची विभागणी केल्या गेली .
सर्वप्रथम 13 सप्टेंबरला मुल नगरीत 11 ब्राह्मणांचे आगमन होऊन ह्या आनंदी पर्वाची सुरुवात झाली . अकरा ब्राह्मणांचे रीती रिवाजानुसार स्वागत , त्यांच्या भोजनाची यथोचित व्यवस्था आणि या कार्याच्या पूर्वतयारीचा हा एक भाग देवीच्या कृपेने सुरळीत पार पाडला.. अथिती देवो भव च्या उक्तीचे तंतोतंत पालनच केल्या गेले. असे वाटावे जणू येणाऱ्या आनंदी पर्वाची ती नांदीच असावी. अश्या पद्धतीने तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ खऱ्या अर्थाने सुरू झाला.
तीन दिवसीय धार्मिक विधीचा मंगलमय आरंभ....
14 सप्टेंबर रोजी मातृका पूजन, नऊग्रह देवतांचे पूजन, महादेव अभिषेक, नांदी श्राद्ध, तुपाने केल्या गेलेले शुद्धीकरण, क्षेत्रपाल देवतेचे पूजन, श्री रुद्र कलश पूजन आणि बरेच काही ... आदी सर्व देव देवतांचे पूजन करून आरती केल्यानंतर शैय्याधीवास, धान्याधीवास आणि जलाधीवास आदी सोपस्कार करण्यात आले. सोबतच पुण्यावाचन, अग्नि मंथनाने अग्नि निर्माण करून होम हवनाद्वारे मंदिर परिसर शुद्धीकरण केल्या गेले. शुध्द, पवित्र एनर्जीच्या लहरीने तमाम परिसर जागृत करण्यात आला. संतांच्या आगमनाने, होम हवनांच्या निघणाऱ्या शुध्द लहरीने परिसराची मांगल्य वृद्धी सर्वांनीच अनुभवली... सरतेशेवटी तो दिवस उजाडला, ज्या क्षणाची सौ.सपनाताई आणि श्री. सुधीरभाऊ हे धार्मिक दांपत्य आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण, ती वचनपूर्ती, ती संकल्पपूर्ती आणि त्या समाज कर्तव्यदक्षतेच्या पूर्तीचा क्षण नजरेसमोर येऊन ठेपला. साऱ्या समाज बांधवांची लगबग, त्यासाठीची धडपड आणि त्यातल्या त्यात वहिनींच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या आखणीनुसार प्रत्येक कार्यक्रम अगदी सुरळीत, सुव्यवस्थेत आणि आनंदाने पार पाडल्या जात होता...
सौ. सपनाताईंची असणारी जागरूकता, त्याप्रती असणारं त्यांचं समर्पण , त्याप्रती असणारी त्यांची उत्सुकता आणि कर्तव्यदक्षता बघण्याचे साक्षीदार सारे समाजबांधव होतेच... सकाळच्या मंगलमय प्रसंगी पावित्र्याचे प्रतीक म्हणून सौभाग्यवतींच्या उपस्थितीत त्याग आणि धैर्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केशरी रंगाच्या साडीत खरा मराठी साज लेवत शिरी कल्पवृक्ष म्हणून ज्याची ख्याती आहे आणि ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा वास असणाऱ्या श्रीफळ कुमकुम तीलकाने सजवून, फुलांच्या मालेने सुशोभित करून कलश यात्रेतील कलश सौभाग्यवतींच्या शिरी दिमाखात स्थिर झाला होता. पारंपारिक वेशातील विशेषतः महिला ढोल ताशाच्या पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.. सर्व सहभागी भगिनींनी हे नयनरम्य दृश्य नेत्रचक्षुत कायमचे कोरले आणि स्वतःच्या शिरी मानाचा तुरा रोवला होता....
सोबत रंगी बेरंगी फटाक्यांची आतिषबाजी दिमतीस होतीच. मंदिर परिसरातील रस्तेही रंगीत रांगोळीने सुशोभित करण्यात आले होते आणि कलाकाराचे कौतुक सर्वत्र झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. जणू काही दिवाळी दसऱ्याचा उत्सवच जणू....
परमपूज्य श्री गोविंद देव गिरीजी महाराजांच्या पुण्यमय पदस्पर्शाने, आशीर्वादाने मूल वासिय भारावून गेले.. महाराजांच्या आगमनाने, चरण स्पर्शाने सारा परिसर मंगलमय झाला. श्री गोविंद देव गिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने सर्व मंडळींच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव नकळत ओसंडून वाहत होता. सकाळच्या शुभ प्रहरी महाराजांचे मंदिरात आगमन होताच दिव्य आरतीने सोबत चंदन तिलक लावून भाविकांनी चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले.
सुगंधी फुलांच्या मंडपाखाली पालखीमधील कन्यका मातेचे सौभाग्यवतीनी मनोभावे पूजन केले. श्री गुरु गोविंद गिरीजी महाराजांना सुंदर, सुरेख शाही बग्गीमध्ये आसनस्थ करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. कलश यात्रेचा थाट गगनाला भिडल्याचा प्रत्येकानेच अनुभवला.
कलश यात्रेत सगळ्यात प्रथमस्थानी महिलांच्या ढोल ताशाच्या गजरात सारा आसमंत दुमदुमून गेला. मांगल्याचे प्रतीक, श्रद्धेचे प्रतीक, संस्काराचे प्रतीक, संस्कृतीच्या प्रतीकाचे प्रतिनिधित्व करणारी कलश यात्रेचा महिलांच्या भरगच्च उपस्थितीत सुरुवात करण्यात आला . सोबत होते भजनी मंडळी.. टाळ, मृदुंग ही आपल्याच धुंदीत नाद स्वरें मुक्तपणे संचारित करीत होती.. विठ्ठलाच्या दिंडीने शेवटपर्यंत सोबत केली. विठ्ठलाचे लोभस प्रसन्न सावळे रूप, रखुमाई आणि सोबत असणारी तुळशी माता आपल्या तुळशी वृंदावनात अगदी एटित विराजमान झाली होती. महाराजांच्या स्वागतासाठी जागोजागी अन्य समाज भगिनीच्या उपस्थितने आणि केल्या जाणाऱ्या स्वागताने शोभायात्रेला चार चाँद लावले. समाजाच्या प्रत्येक समूहाने स्वामीजींचे स्वागत उत्स्फूर्तपणे, भक्ती भावाने करून स्वामींच्या कृपादृष्टीने, आशीर्वादाने आणि चरण स्पर्शाने प्रत्येक समाज बांधव प्रसन्न झाला. रामदरबाराच्या झाकीने मुलवासियांच्या मनावर कायमचेच अधिराज्य केले!!!!
काय ते सुरेख रामाचे नेत्रसुख रूप ,सोबत सीतामाईची साथ होतीच. आज्ञाकारी लक्ष्मण इथे पण आपल्या ज्येष्ठ बंधूची साथ कशी सोडणार?... रामभक्त हनुमान सेवेत होतेच...
देवांचे देवाधिपती श्री शंकरजी आशीर्वादाला सामोरे होतेच की... चालता चालता होणारी रनिंग कॉमेंट्री मुळे वातावरणात खऱ्या अर्थाने रंगत आणली... संपूर्ण रस्त्यावर शोभायात्रेच्या मंगल लहरींचा प्रवास सुरू झाला....
संपूर्ण सोहळ्याचे प्रत्यक्ष चित्रण करण्यासाठी ड्रोन घिरट्या मारीतच होता...
अश्या प्रकारे हा पूर्ण ताफा श्री माता कन्यका परमेश्वरी मंदिराच्या अंगणात येऊन ठेपला... प्रत्येक कलश यात्रेतील सौभाग्यवतींची भूक स्वादिष्ट भोजनाने पुर्णत्वास आली आणि मग सरते शेवटी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो प्राणप्रतिष्ठापना सोहळा!!!
हजारो प्रकारच्या विविध मनोवेधक सुगंधी पुष्पांनी कन्यका माता परमेश्वरीचे मंदिर नववधू सारखे नटले होते.. जिथे पहावे तिथे नयनरम्य दृश्य... आल्हाद, मनाचा तजेला देणारा मंद सुगंध, मनाला शांती देणार, मनाची भूक घालवणार, मनाला तृप्त करणारी सुंदर फुलांची आरास याला कुठेच तोड नसावी!!! इतकं अप्रतिम, आल्हाददायक, मनावर आनंदाचे फवारे शिंपडून मनाला टवटवीत करणारी फुलांची सुंदर सजावट बघताच मन आनंदाने थूई.. थुई नाचलेच!!!
सर्व देवतांना वस्त्रे लेऊन त्यावर चमचमणाऱ्या दागिन्यांनी वेगळीच रंगत आणली...
महाराजांनी मंत्रोपचारात सर्व विधी, सोपस्कार पार पाडून आपल्या पवित्र हाताने प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास आरंभ केला...
एकेक देवतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा पूर्णत्वास येत होता तस तसे परिसरातील देवत्वाची प्रचिती प्रत्येक भाविकांना जाणवू लागली...
सकारात्मक ऊर्जेचे अधिराज्य कायमचेच स्थापित झाले. सर्वांग सुंदर, सर्वांचेच कल्याण करणाऱ्या मंगलमय वातावरणात जणू काही वासवी माताच प्रगट झाली आणि हो प्रत्येक आर्यवैश्य बांधवांना आशीर्वादाचा हात शिरस्त ठेवते आहे याची प्रचिती आली ..
स्वामींच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापनेचा पवित्र, मंगलमय सोहळा संपूर्णत्वात होत होता... गण गण गणात बोते, सबका मालिक एक, श्रद्धा आणि सबुरी यांची प्रचिती भक्ताना देणारे श्री साईबाबा, श्री गजानन महाराज, सदैव भक्तांना संकटातून तारणारे, भक्तांचे सर्व गुन्हे माफ करून पोटात घेणारे श्री गणेशजी, रामभक्त श्री हनुमान, ब्रम्हा विष्णू आणि महेशाची दत्त मूर्ती, पंचतायन आणि नवग्रहाच्या देवतांची अधीनस्थ स्थळी स्थापना करून प्राण प्रतिष्ठापना केल्या गेली... देवांचे देव शंकरजी यांना पण विराजमान करून महाराजांनी मुलवासीयांवर संतकृपेसोबत सर्वांना पुण्यवंत होण्याचा आशीर्वाद दिला...
सर्व देवांचे गुणगान आरतीने करून, भक्तांना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला ...
जणूकाही त्या लाडवातील साखरेचा गोडवा प्रत्येकाने आत्मसात करावा हाच शुभ संदेश देत असावा... एका मंगलमय, पवित्र क्षणाचे साक्षीदार उपस्थित प्रत्येक भाविक झाले. सोबत पावसाने आपली हजेरी लावून शुभ संकेत दिलाच...
न भूतो न भविष्यती असा हा नेत्रदीपक भव्य दिव्य सोहळ्याचे प्रत्येक जण साक्षीदार झाले ते फक्त आणि फक्त धार्मिक वृत्तीच्या, समाजकर्तव्यास प्राधान्य देणाऱ्या, दानशूर, खंबीर नेतृत्वाच्या सौ. सपनाताईंच्या आणि सुधीरभाऊंच्या कृपेने आणि आशीर्वादाने!
श्री कन्यका माता परमेश्वरी मंदिराच्या पुनरुत्थान आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या संकल्प पूर्तीच्याक्षणी आज प्रत्येक मूलवासीय धन्य पावला.
परमपूज्य श्री गोविंद गिरी महाराजांच्या दिव्य प्रवचनाने सारा आसमंत पवित्र लहरींनी न्हाऊन निघाला ... एका पवित्र विचारांचे रोपण मनामनात करण्यात आले आणि त्या दिव्य प्रवचनातून प्रत्येक जण शुद्ध होऊन आपल्या मानवी उत्कर्षातील योगदान देण्यास बाध्य झाला.
महाप्रसादाने या दिव्य सोहळ्याची सांगता झाली . विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात रंगत आणली ती सुंदर गोड प्रभावी सूत्रसंचालनाने आणि मधुर वाणीने गायल्या गेलेल्या सुरेल गीतांनी !!!!....
मूल वासियांचे पूर्वाजन्मीचे कदाचित पुण्यकर्म असावे म्हणून श्री सुधीरभाऊ आणि सौ. सपनाताईंच्या संकल्प पूर्तीचा आशीर्वाद आम्हा मूलवासीयांना लाभला.
याबद्दल समस्त मुलवासीयांतर्फे मी उभयतांचे आभार मानते. आपण आम्हाला जी अनमोल भेट दिली त्याचे ऋण आम्ही या जन्मात तरी फेडू शकू की नाही याबाबत आम्ही सांशक आहोत परंतु आम्ही आमच्या समाज कर्तव्याच्या बाबतीत निष्ठावंत राहू हे मात्र नक्की...
डॉ. सौ. राजश्री सूकेश मुस्तीलवार, मुल जिल्हा - चंद्रपूर








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!