चंद्रपूरची पहिली महिला खासदार कोण?
चंद्रपूरची पहिली महिला खासदार कोण?
18 व्या लोकसभेची धामधुम सुरू झाली आहे. देश
पातळीवर एनडीए विरूध्द इंडिया आघाडी तर चंद्रपूर लोकसभा
निर्वाचन क्षेत्रातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार विरूध्द आमदार प्रतिभा धानोरकर यांचेत थेट लढत होत आहे. आमदार
प्रतिभा धानोरकर या महिला असल्यांने,
या क्षेत्रातून महिला खासदार होतील काय? हा प्रश्न वारंवार
विचारल्या जात आहे. यापूर्वीही
चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून महिला खासदार म्हणून निवडून आली होती. 1964 च्या पोटनिवडणूकीत ही महिला खासदार
चंद्रपूर जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करीत होती.
कोण होती पहिली महिला खासदार?
गोपीकाताई मारोतराव कन्नमवार या चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या पहिल्या महिला खासदार होत्या. स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणूकीत ताहेर अली व त्यांच्या पाठोपाठ व्ही. एन. स्वामी हे खासदार म्हणून निवडूण आले होते.
१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत लाल श्यामशाहा लाल भगवानशाहा हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळी निर्वासितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न व आदिवासींचे मूळ प्रश्न डावलून बांग्लादेशाच्या निर्वासितांना आश्रय देण्याला प्राधान्य दिले जात होते. ही बाब त्यांनी खटकली. त्यांनी याकडे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लक्ष वेधले. यानंतर त्यांनी ५ सप्टेंबर १९६२ रोजी खासदारकीची शपथ घेतली. मात्र त्यांना सरकारच्या धोरणाविरुद्ध दुसऱ्यादिवशी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. तो २४ एप्रिल १९६४ ला राजीनामा मंजूर झाला. या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी १९६४ मध्ये पोटनिवडणूक झाली. भारतीय राष्ट्रिय कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री स्व. दादासाहेब कन्नमवार यांची पत्नी गोपिकाताई कन्नमवार यांना उमेदवारी दिली. त्यांनी स्वतंत्र पार्टीचे के. एम. कौशीक यांचे विरोधात निवडणूक लढवून विजय मिळविला व पुढे अडीच वर्ष त्या चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या खासदार होत्या. या निवडणुकीत गोपिकाताई कन्नमवार या विजयी झाल्या. त्या या मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. यानंतर १९६७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.
यानंतर, खासदारकीच्या निवडणूकीत प्रमुख पक्षांनी महिलांना संधी दिली नाही. मात्र
कॉंग्रेसनेच तब्बल 58 वर्षानंतर प्रतिभा धानोरकर या महिलेला उमेदवारी
दिल्याने चंद्रपूर जिल्हयाची पहिली महिला खासदार गोपिकाताई कन्नमवार यांची आठवण ताजी झाली आहे.
कशी झाली लढत?
तिसर्या लोकसभा निवडणूकीच्या चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील पोटनिवडणूक रंजक झाली. या निवडणूकीत 4 उमेदवार रिंगणात होते. भारतीय राष्ट्रिय कॉंग्रेसच्या गोपिकाताई मारोतराव कन्नमवार यांना 1,05,163 (52.36%), के. एम. कौशिक 79,529 (39.6%), एन. एस. उईके 8264 (4.11%), यु.डी. कुळमेथे 7,877 (3.92%) अशी मते मिळाली. अर्ध्यापेक्षा अधिक मते मिळवित गोपिकाताई चंद्रपूर लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार झाल्यात.
अशा होत्या गोपिकाताई कन्नमवार!
वयाच्या केवळ अठराव्या वर्षी मारोतराव ज्यांना सारेचजण दादा म्हणत त्यांचा गोपिकाबाई यांच्याशी हिंगणघाट या ठिकाणी विवाह
झाला. बऱ्यापैकी सधन कुटुंबातल्या गोपिकाबाई मारोतरावांच्या चंद्रमौळी संसारात हळूहळू रमल्या. नवऱ्याच्या घरी अठराविश्व दारिद्र्य असताना गोपिकाबाईंनी मोठ्या जबाबदारीनं संसार चालवला. त्याकरता प्रसंगी त्यांनी २५ रुपये महिना
पगाराची नोकरी सुद्धा केली.
आपल्या नवऱ्याच्या राजकीय कार्यात सुद्धा गोपिकाबाईंची साथ होती. १९५९ साली काँग्रेसचं ६४ वं अधिवेशन
नागपूरमध्ये भरलं होत. मारोतरावांच्या पत्नी गोपिकाबाई कन्नमवार यांची या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षा
म्हणून निवड करण्यात आली. तेव्हा नागपूर प्रदेश काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष होत्या. गोपिकाबाईंना सगळे ताईसाहेब कन्नमवार म्हणत.
या अधिवेशनाचे यजमानपद त्यामुळे स्वाभाविकपणेच कन्नमवार यांच्याकडे होत. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत ढेबर भाईंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाची भव्यता
पाहून देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी कन्नमवारांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. काँग्रेस नेतेच काय तर खुद्द पंडित
नेहरूंनी सुद्धा गोपिकाबाईंबद्दल गौरवोद्गार काढले होते.
२४ ऑक्टोबर १९६४ या दिवशी कन्नमवारांचा मृत्यू झाला. एक महिन्याच्या अंतराने त्यांच्या जीवनावर साहित्यभूषण तु. ना. काटकर यांनी लिहिलेल्या एका छोटेखानी पुस्तकाचे प्रकाशन होते. नागपूरच्या चिटणीस पार्कवर तेव्हाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण या सोहळ्यासाठी आले होते.
त्या भव्य समारंभाला हजर राहून दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला जाणारी बस पकडायला शांताराम
पोटदुखे आणि पत्रकार सुरेश द्वादशीवार नागपूरच्या जुन्या एस.टी. स्टँडवर
गेले होते. तेव्हा दादासाहेबांच्या पत्नी गोपिकाबाई त्या स्टँडवरच त्यांना दिसल्या. हातात एक छोटीशी बॅग
घेतलेल्या गोपिकाबाई एस.टी.च्या
तिकिटासाठी सामान्य माणसांप्रमाणे रांगेत उभ्या होत्या.
एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्रीणबाई असलेल्या गोपिकाबाईंना तसं बेदखल उभं असलेल पाहून त्या दोघांना हि गलबलून आलं. मग त्यांच्यातल्याच एकाने त्यांना जबरीनेच बसायला लावून त्यांची तिकिटे काढून आणली.
अशी हि व्रतस्थ स्त्री
शेवटपर्यंत आपल्या पतीप्रमाणे स्वच्छ प्रतिमा घेऊनच जगली. आज असं एखाद्या
मुख्यमंत्र्यांच्या बायकोला जगता येणं केवळ आणि केवळ अशक्य.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!