वन्यप्राणी व मानवजीव संघर्ष टाळण्यासाठी जनतेची चळवळ महत्वाची




महाराष्ट्रातील वाघांच्या एकूण संख्येपैकी साधारण ८० ते ९० टक्के संख्या चंद्रपूर या एका जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी आणि कधीही कोणता वन्यप्राणी पहायला मिळेल, हे सांगू शकत नाही. महाराष्ट्रातील विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती पहायला मिळते.
सावली तालुक्यात मागील ५ वर्षांत वाघ, बिबट या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कितीतरी बालकांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत बळी पडले आहेत. वन्यजीव संरक्षक फक्त माणसांना दोष देत वनात मानवांचा वावर वाढल्याने वन्यप्राण्यांचे हल्ले होत असल्याचे सांगत असतात. पण अनेक उदाहरणे देता येईल की ज्यात वनात न जाता घरी येऊन वाघ बिबट्यानी हल्ले केली आहेत. सिर्सी येथील ४ वर्षाच्या चिमुकलीला दुपारच्या सुमारास घरून बिबट्याने उचलून नेले. प्रत्यक्षदर्शनी तिच्या आईने बघितले होते परंतु वनाधिकारी मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते. उलट त्या बाईने तर घात करून प्रकरण वाघ बिबट्यावर उलटवित नसेल ना? अशा शंकेतून प्रकरणाची चौकशी करीत होते मात्र दुसऱ्या दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेचे शीर मिळाले म्हणून बिबट्याने ठार केल्याची नोंद केली. उपरी येथील १० वर्षाचा मुलगा पहाटेच्या वेळेत व्यायाम करण्यासाठी बाहेर पडला त्याला सहज बिबट्याने उचलून नेत ठार केले. व्याहाड बूज येथे एक महिला लघुशंकेसाठी घरून बाहेर पडताच हल्ला करून ठार केले. हिरापूर येथे शेत काम आटोपून बैल धुत असतांना वाघाने हल्ला करून ठार केले. असे अनेक उदाहरण देता येईल की जंगलात न जाताही वन्यप्राण्यांनी मानवावर हल्ले केले आहे.
ताजी घटना म्हणून रुद्रापूर येथील बाबुराव कांबळे हे सकाळी गावाशेजारी सौचालयास गेला असता वाघाने ठार केले तर खेडी येथे स्वरूपा येलेंट्टीवार ही कापूस काढण्याचे काम करीत असताना वाघाने ठार केले.
  वन्यप्राण्यांमुळे ग्रामीण विकासावरही फार मोठा परिणाम पडला आहे. वाघाच्या दहशतीमुळे शेतात जाणे कठीण होत आहे, शेती पडीक ठेवण्याची पाळी आली आहे, तर रानडुक्कर, वानरमुळे पिकाची फार मोठया प्रमाणावर नासाधुस होत असल्याने घरापर्यंत पीक येईपर्यंत शेतकरी काळजीत आहे. वनविभाग जरी सांगत असेल की पिकाची नासधूस झाल्यास भरपाई देणार पण ती भरपाई तुटपुंजी असते. जंगलशेजारी राहणारे नागरिक तेंदू, मोह, टोळ गोळा करून आपला प्रपंच चालवीत असत हाही रोजगार वन्यप्राण्यांमुळे बंद झाला आहे. वन्यप्राण्यांमुळे शेळ्या -मेंढ्या पालन, गुरे- डोरे कमी झालेले आहे. बेरोजगारांना रोजगार देणे ही सरकारची जबाबदारी असताना उलट एकंदरीत वणावर व शेतीवर अवलंबून असणारे नागरिक वनप्राण्यांमुळे बेरोजगार होत आहेत.
        अनेक संस्था वन, वनजीवरक्षक म्हणून काम करतात. सरकारकडून वेगवेगळे फंड घेऊन नैसर्गिक समतोल राखण्यासाठी वन्यजीव किती महत्वाचे आहेत ते सांगतात व बहुतेक हे वन्यजीवरक्षक शहरात राहतात त्यांचा गावाशी काही लेनदेन नसते. त्यामुळे ग्रामिणांचे दुःख, प्रश्न सरकार दरबारी पोहचत नाही त्यामुळे चांगले धोरणही तयार होत नाही. उलट मानवांमुळे वन्यप्राणीला धोका निर्माण होत असल्याने व्याघ्रप्रकल्प वाढविण्याचे धोरण तयार केले जातात. एकीकडे मानवाच्या हस्तक्षेपामुळे वन्यजीव धोक्यात येत असल्याचे सांगत दुसरीकडे श्रीमंतांचे रिसॉर्ट, हॉटेल वाढवीत असताना वन्यजीव धोक्यात येत नाही का? की पैशापुढे सर्वकाही चालते.
       आजच्या घडीला गडचिरोली जिल्ह्यातील ज्या भागात नक्षलवादी आहेत त्या भागात वन्यप्राणी नाहीत पण जंगल तेंदू, मोह, बांबू हे रोजगार देणारी साधने आहेत म्हणून नागरीकही नक्षलवादीला समर्थन देणार नाही का? आजची वाघ, बिबट यांची संख्या पाहता व मानवावर रोज होणारे हल्ले पाहता पुढील भविष्य फार अंधकारमय वाटते.  उच्चशिक्षित, धोरण बनविणारे अधिकारी, श्रीमंत हे शहरात राहतात व या सर्वांना वन्यप्राणी महत्वाचे वाटतात म्हणून ते आपल्या ग्रामीण जनतेसाठी काय हवे आहे हे विचार करणार नाहीत. त्यामुळे वनविभागाविरुद्ध गावातील लोकांनी चळवळ उभी करणे गरजेचे आहे.

विजय कोरेवार
प्रतिनिधी 
पब्लिक पंचनामा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!