वैदर्भीय अस्मिता हरविलेले साहित्य संमेलन!!!

वैदर्भीय अस्मिता हरविलेले साहित्य संमेलन!!!


नुकतेच चंद्रपुरात 68 विदर्भ साहित्य संमेलन पार पडले. अत्यंत घाई-घाईत गोंडवाना विद्यापीठ व एका नामांकित शैक्षणिक संस्थेने हे संमेलन आयोजिले होते. यामध्ये एका तरुण कवीने उल्लेखलेल्या" फ्रॅक्चर फ्रीडमची "  बरीच चर्चा झाली. हल्ली स्वातंत्र्य धोक्यात आहे, राज्य घटना संकटात आहे. हे शब्द अगदी परवलीचे झाले आहे. दररोज वृत्तपत्रात स्वातंत्र्य किंवा घटना धोक्यात आहे असं काहीतरी वाचायला नक्कीच मिळते.
      जणू प्रत्येक जण केंद्रात असलेल्या उजव्या सरकार विरुद्ध घटना व कायद्याचा रक्षक बनूनच उभा ठाकला आहे, असं काहीच चित्र विचारवंत लेखक, प्राध्यापक काही वकील, काही चळवळीतील लोक रंगवताना नियमितपणे दिसतात. मात्र ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची हक्क काय ? अधिकार काय? त्या प्रदेशाला किती निधी मिळाला पाहिजे? त्या प्रदेशाचे प्रश्न कायदेमंडळात उपस्थित होतात की नाही? हे या अत्यंत बुद्धिमान अशा विचारवंतांना दिसत नाही..
विदर्भ साहित्य संमेलनात अनेक परिसंवाद झाले, कवी संमेलने झाली, कथाकथन झाली, नाट्यप्रयोग झाले ग्रंथांचे विमोचन झाले. पण विदर्भातल्या ज्वलंत प्रश्नावर एकही चर्चा झाली नाही अपवाद फक्त अखेरच्या दिवशी झालेल्या मानव वन्यजीव संघर्ष व चंद्रपुरातील प्रदूषणाचा विषय वगळता एकही परिसंवाद विदर्भीय अस्मितेला धरून नव्हता.  पाच सहा वर्षापूर्वी चंद्रपुरात पोलीस फुटबॉल मैदानावर भरलेल्या अतिशय भव्य अशा विदर्भ साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव घ्यावा असा आग्रह काही विदर्भवाद्यांनी धरला. यावर संमेलनाचे अध्यक्ष  व आयोजक यांनी अतिशय गंभीर चर्चा केली. मात्र तत्कालीन सत्ताधारी संरक्षक यांच्या दबावात स्वतंत्र विदर्भाचा ठराव घेण्याची हिम्मत मात्र कोणाचीही झाली नाही.
    असो स्वतंत्र विदर्भ हा तर खूप लांबचा विषय झाला.
गेल्या महाविकास आघाडी सरकारने विदर्भाला ओरबाडणे सुरू केले. पहिल्यांदा कोरोनाचे कारण देत नंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीचे कारण देत असता अनेक वर्षा पासून  अखंड चालत आलेलं नागपूरचं हिवाळी अधिवेशन बंद पाडलं. यावर एकाही साहित्यिक विचारवंतांनी चकार शब्द काढला नाही. गोरेवाडा उद्यानाला दिलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव हा तर विदर्भावर ,विदर्भाच्या संस्कृतीवर थेट हल्ला होता. बाळासाहेबांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही परंतु  विदर्भातही अशी अनेक व्यक्तित्व होऊन गेली की ज्यांचं नाव गोरेवाडा उद्यानाला देता येता आलं असतं.  नागपूर व अकोला करारात ठरल्याप्रमाणे विदर्भाला निधी मिळतो की नाही ?किंवा सरकारी नोकऱ्यांचे वाटप नागपूर व अकोला कराराप्रमाणे होतो की नाही? याही विषयावर एखादा परिसंवाद या विदर्भ साहित्य संमेलनात होऊ शकला असता. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. विदर्भातील वनांचे कार्पोरेटीकरण होत आहे. शेकडो वर्षापासून जंगलात राहणारा आदिवासी या व्यवसायीकरणामुळे जंगलाबाहेर फेकला जातोय. त्यांचे पारंपारिक प्रथा, परंपरा, सण, उत्सव अजूनही जंगलावर आधारलेली आहे. उदाहरणार्थ ताडोबाच्या जंगलात ताडोबा नावाचा आदिवासींचा एक देव आहे, त्याची समाधी तिथे आहे परंतु त्या समाधी पर्यंत आदिवासींना जाऊ दिल्या जात नाही.  पारंपारिक रहिवासी असलेल्या आदिवासींचे  तारोबा च्या समाधी पर्यंत जाणे बंद केले आहे. याविषयी आमचे लेखक, साहित्यिक व संपादक यांनी चकार शब्द सुद्धा काढला नाही. मेळघाटात अजूनही शुद्ध पिण्याच्या पाण्याअभावी मृत्यू होतात. कमलापूरच्या हत्ती कॅम्प मध्ये असलेले हत्ती थेट अंबानींच्या सेवेत गुजराती मध्ये नेण्यात आले. हे सगळं विदर्भाचं सांस्कृतिक वन्यजीव विषयक असलेल्या समृद्धीवर आक्रमण होतं. मात्र एकाही वैदर्भीय पत्रकाराने लेखकाने, बुद्धिवंतांनी किंवा प्राध्यापकांनी कवीने एकही चकार शब्द यावर काढलेला नाही. तर मग हे कशावरून म्हणता येईल की विदर्भ साहित्य संमेलन होते. यामध्ये विदर्भाचा नेमकं काय चर्चिला गेलं? कुठला प्रश्न यामध्ये विदर्भाचा चर्चिला गेला? त्याची दखल या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून थेट शासनापर्यंत पोहोचेल असं काहीतरी या संमेलना घडलं का? की केवळ काही ठराविक प्राध्यापक बुद्धिमत्तांसाठी किंवा विदर्भ साहित्य संघाच्या आजीवन सदस्यांसाठी ही एक सांस्कृतिक मेजवानी होती?  
     एकोणवीस डिसेंबरला नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते श्री अजित पवार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न उपस्थित केला. काही विदर्भातले आमदारांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. परंतु एकच प्रश्न उपस्थित होतो मानव वन्यजीव संघर्षात दररोज सरासरी एका माणसाचा जीव विदर्भात जात आहे. प्रदूषणाने शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहे. विविध प्रकारचे आजार प्रदूषणामुळे विदर्भात होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा चाऊन चोथा केलेला विषय आहेच. ही मनुष्य हानी होत असताना यापेक्षाही महत्त्वाचं महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आहे का? किंवा बेळगाव महाराष्ट्रात येणं हे एखाद्या माणसाचा जीव जाण्यापेक्षाही महत्त्वाचा आहे का?
  जर आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आमदारांसाठी आमचे जिवापेक्षाही अखंड महाराष्ट्र महत्त्वाचा असेल किंवा बेळगाव महाराष्ट्रात सामील होणे महत्त्वाचे असेल तर याहून मोठे दुःखद दुर्दैव आम्हा वैदर्भीयांचे दुसरे काहीही नाही.
बरोबर एका महिन्यानंतर वर्धेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मंडप समजणार आहे.  तिथे तर वैदर्भीय अस्मितेचे दर्शन दुर्लभ च राहील कारण काय तर ते अखिल भारतात राहणाऱ्या मराठी माणसांचं संमेलन आहे .  तिथे वैदर्भीय अस्मिता, प्रादेशिक वाद उपस्थित करणे म्हणजे अपरिपक्वताच ... नाही का......
         जय विदर्भ......


योगेश्वर प्रकाश पचारे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!