कारगिल विजय दिन विशेष (२६ जुलै)
मूल (सचिन वाकडे)
स्वतंत्र भारतासाठी कारगिल विजय दिवस एक महत्वपूर्ण दिवस आहे. हे दरवर्षी 26 जुलैला साजरे केले जाते. कारगिल युध्द साधारणतः तीन महीने चालले व 26 जुलैला युध्दाच्या शेवट झाला. यात भारत विजयी झाला. हा दिवस कारगिल युध्दात शहीद झालेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ साजरे केले जाते. युध्द सुरु झाले आणि भारत सरकारने ऑपरेशन विजय नावाने 2,00,000 सैनिकांना पाठविले. या युध्दात 527 सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.
या युद्धात चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील एक सैनिक प्रत्यक्षरीत्या सहभागी होऊन कारगिल युद्धाच्या वेळी रणभूमिवर आपल्या प्राणाची व परिवाराची पर्वा न करता फक्त देशासाठी निकराने लढला होता. सैन्यात असलेल्या प्रत्येक सैनिक बांधवांना रणभूमिवर शत्रूंशी दोन हात करायला मिळेलच असे नाहि. मात्र ते भाग्य मुल येथील अनिल मोरेश्वर येत्ते या वीर सैनिकाला प्राप्त झाले.
या युध्दात सहभागी सैनिक अनिल मोरेश्वर येत्ते यांच्या जन्म 19 नोव्हेंबर 1975 ला चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे झाला. वडील सैन्यात असल्याने इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण हैद्राबाद, गोंदिया, मुल येथे झाले. 23 वर्ष भारतीय सैन्यात सेवा दिलेल्या वडीलांचे 9 वर्षापुर्विच निधन झाले. आई, मोठा भाऊ, वहिणी, दोन पुतणे, अनिलची पत्नी सोनाली, मुलगी अग्रणी, मुलगा आशय असा अनिलचा आनंदी परिवार.
28 ऑगस्ट 1995 ला भारतीय सेनेमध्ये रुजू होवून युनिट 255 एफडी रेजीमेंटमध्ये 17 वर्षे 8 महिने 4 दिवसाची संपुर्ण नोकरी हि तोफखाना येथेच झाली. भारतमातेची सेवा पुर्ण करुन 30 एप्रिल 2013 ला अनिल सेवानिवृत्त होवून सुखरुप घरी परतले. वडील सैन्यात असल्याने अनिलला बालपणापासूनच सैन्याचं आकर्षण होतं. सैन्याच्या शिस्तित वाढलेल्या अनिलने मनोज कुमार यांच्या उपकार सिनेमा पाहिला आणि ठरवलं एकतर शेती करायची नाहितर सैन्यात जायचे. मुल येथिल नवभारत विद्यालयात शिक्षण सुरु असतांना एनसीसी मध्ये भाग घेतला. आणि हळुहळू सैन्यात जाण्याच्या निर्णय पक्का होत गेला.
28 ऑगस्ट 1995 ला वयाच्या 20 व्या वर्षी सैन्यात दाखल झाले. एक वर्ष तोफखाना केंद्र गोलकोंडा, हैद्राबाद येथे खडतर प्रशिक्षण पुर्ण केले. 1996 ला पश्चिम बंगाल येथिल सिलीगुडी मध्ये उदलावाडी येथे पोस्टिंग झाली. तेव्हा अनिल यांची युनिट आसाम मध्ये होती. कारण त्यावेळी तिथे बोडो उग्रवादी आणि उल्फा उग्रवाद्याच्या हालचाली मोठया प्रमाणात वाढल्या होत्या. तेव्हा तब्बल एका वर्षात 12 ते 15 बोडो व उल्फा उग्रवाद्याच्या खात्मा केला. आणि 50 ते 60 शस्त्रे व काडतुस हस्तगत केली. सैन्यात टिम वर्क असते. आणि हे धाडसी कार्य अनिलच्या युनिटने पार पाडले. यासाठी विभागीय मुख्यालयाने संपुर्ण युनिटला सन्मानित केले. त्यानंतर 1997 ला सिलीगुडी, 1998 मध्ये उत्तराखंड येथे युनिटला पाठविण्यात आले.
1999 मध्ये रायवाला येथे कर्तव्यावर असतांना हायकमान कडून काहि आदेश अनिलच्या युनिटला आले. बहुतेक तो महिना एप्रिल किव्हा मे च्या असावा. सगळया युनिटला 72 तासात तोफा, वाहने, संपुर्ण साहित्य, राशन, डिझेल, पेट्रोल सर्व वाहनांत लोड करण्याचे आदेश मिळाले. युध्द सामग्री भरुन सर्व जवान वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत होते. आदेश झाला व युनिट सकाळी रायवालाहून कारगिलच्या दिशेने प्रवास सुरु झाला. दररोजचा प्रवास सकाळी 5 वाजता सुरु व्हायचा, पण त्या आधी नाश्ता व जेवण पॅक करुन घ्यायचे. साधारण 2:30 ते 3:30 च्या सुमारास प्रवासात जेवण आटपायचे. प्रथम चंडिगढ, द्वितीय पठाणकोट व तिसरा मुक्काम जम्मु येथे झाला. उदभवलेल्या परिस्थितीची जाण ठेवत पॅक करुन आणलेली शस्त्रे व काडतुस सर्वांना वितरित करण्यात आली. युनिट दुसऱ्या रात्री श्रीनगरला पोहचली. तीन दिवस तिथेच मुक्काम होता. सौपोरला मुव्हींग आदेश मिळाला, तिथे दोन दिवस मुक्काम करुन लगेच उडी सेक्टरला जाण्याचे आदेश मिळाले. या मुव्हींगमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी तंबु ठोकायचा. राहायला व झोपायला सर्व व्यवस्थित करायचे व सकाळी सर्व मोडून पुढे जायला सज्ज व्हायचे. यात सर्वांची तारांबळ उडायची, पण पर्याय नव्हता. उडी सेक्टरला पोहचत नाहि तोच एका युनिटला पारो पोस्टवर जाण्याच्या आदेश मिळाला. खराब मार्गाने तोफासहित जाणे अडचणिचे होते. पारोला पोहचत नाहि तर परत येण्याच्या आदेश मिळाला. युनिट परतून उडीला आली. सर्वांना स्नो बुट, स्नो कोट अर्थात बर्फाळ भागातील उपयुक्त सर्व किट वितरित करण्यात आली. मात्र जायचे कुठेघ् याच्या थांगपत्ता लागेना. त्याच वेळेस युनिटला कारगिलला जाण्याचे आदेश मिळाले. तिथे संध्याकाळ नंतर सैन्यांच्या वाहनांच्या हालचाली बंद असते. अश्या परिस्थितीमध्ये जवळपास 90 वाहनांनी शस्त्रांसहित निघाले. सौपोरजवळ अंधाराच्या फायदा घेवून वाहनांवर अचानक गोळीबार सुरु झाला. सैनिकांनी आपल्या गन व एलएमजी त्या दिशेने फिरवून चोख प्रत्युत्तर देताच गोळीबार करणारे पळून गेले. त्यांनी वाहनांच्या टायरवर अधिक गोळिबार केल्याने एका सैनिकाच्या हाताला गोळी लागली होती. त्याला लगेच सैनिकी दवाखान्यात उपचाराकरिता रवाना करण्यात आले. सर्व सुरळित करुन पुढचा प्रवास सुरु केला, व पटटनला पोहचले. नंतर कारगिलचा प्रवास सुरु झाला. प्रथम सोनामर्गा, गुमरी म्हणजे जगातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे थंड ठिकाण. कॅप्टन मोड जसजसे पुढे जायचे, तसतसे थंडीचे प्रमाण वाढत होते. मुक्काम करत युनिट पंदरास येथे पोहचली. तिथे 315 एफडी रेजीमेंट डिप्लाय होती. मात्र तिथे पोहचण्यापुर्वीच काहि हालचाली होवून 315 एफडी रेजीमेंटच्या एका तोफवरती पाकस्तिानने डागलेला गोळा पडला होता. त्यात 7 सैनिक शहिद झाले. तसेच तोफसुध्दा पुर्णपणे निकामी झाली होती. तिथे अनिलच्या युनिटला एकत्र करुन सामोरिल परिस्थितीबाबत माहिती देत असतांन बाजुलाच पाकिस्तानी बाॅॅंब (गोळा) धडकला. लगेच सर्वांनी आपआपली बाजु सांभाळली.
तिथुन 5 ते 6 किलोमिटरवर पुर्णतः नष्ट झालेले व शत्रुला स्पष्ट दिसत असलेल्या द्रास येथे युनिट पोहचली. तिथे सैनिकांव्यतिरिक्त साधे पक्षीसुध्दा दिसत नव्हते. सर्व ओसाड दिसत होते. अश्या परिस्थितीत फक्त 4 वाहनांनी पुढे जातांना आजुबाजुला बाॅॅंब (गोळा) धडाधड पडु लागले. कारण त्यावेळी टायगर हिल शत्रुच्या ताब्यात होती. त्यामुळे त्यांनी हायवे 1 वर संपुर्ण कब्जा केला होता. अश्या बिकट परिस्थितीत युनिट सकाळी 4:30 वाजता कारगिलला पोहचलीे. तिथे सुध्दा चैफेर फायरिंग सुरु होती. जेवण आटोपुन बटालिक सेक्टरच्या दिशेने निघाले. ऊंच ऊंच पहाडी, चढ उतार मार्गाने विना लाईट वाहने पुढे जावु लागली रात्री 11:30 वाजता 0 (जिरो) पाईंट वर युनिट थांबली. कारगिल मधुन सोबत असलेले 4 वाहने आता मात्र वेगवेगळया दिशेनी गेल्या. अनिल बसलेले वाहन जिरो पाईंट म्हण्जे 14000 ला पोहचली. रात्री 12:30 ला काळोखात विश्रांती घेतली. सकाळी 4 वाजता अनेक भारतीय सैनिकी वाहने पोहचली. जिरो पाईंट वरुन 5 ते 7 किमी सामोर जावून एका पहाडालगत मोठया नाल्यात तोफ लावल्या व पाकिस्तानच्या दिशेने फायर सुरु झाला. भारतीय सैन्य द्रासपासून लेह लद्दाखपर्यंत पसरलेली होती.
दिवाळी कधी घरी साजरी केली नाही, मात्र तिथे एकसारखी दिवाळी सुरु होती. हा अनिलच्या जिवनातील विलक्षण क्षण होता. चारहि दिशेने रात्रंदिवस सारखा बाॅंब गोळयांच्या वर्षाव सुरु होता. काहि दिवसांनी शत्रुला आमचे लोकेशन लक्षात आल्याने रात्री 11:30 युनिटला अल्टरनेट मुव्ह करावा लागला. वेळ कमी असल्याने रात्रीलाच आपल्या गनसहित निघाले व थोडयाच वेळात तिथे शत्रुंच्या तोफांचे गोळे बरसले. युनिटने 5 ते 6 किमीवर जावून पुन्हा नाल्यात गन डिप्लाय केल्या. हे सर्व घडत असतांना अनिल व मित्र जावेद उभे असतांना पाकिस्तानी एक गोळा 25 ते 30 फुट वर धडकला तेव्हा पायाखालची जमीन हादरली. पुढे खराब स्थितीत असलेल्या डोजरखाली जावेदला ओढले. गोळयाने नजिकच्या मोठया झाडाचे तुकडे तुकडे झाले. जमीनीवर खड्डा पडला होता. त्या दिवशी मात्र, मृत्यु क्षणभर जवळच होता. काहि अंतरावर जीप मध्ये झोपलेला विक्रम गोळयांच्या स्पेंडरनी उध्वस्त केले, त्यात विक्रम बचावला. 5 ते 7 दिवस लोटले. संध्याकाळची वेळ होती. गनएरीया मध्ये स्मशान शांतता पसरली होती. कारण काय तर 17 ते 18 हजार फुट वर आऊटपोस्ट वर नायक यशवंत दिवाकर कोलकर शहिद झालेला होता. मृतदेह आणायला काहि सैनिकांना पाठविण्यात आले. मात्र अनिलच्या डोळयांसामोर कर्नाटक सिमेवरील मराठी बोलणारा यशवंत कोलकरच्या चेहरा येत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार होता. या प्रसंगाने अनिलचे मन हेलावुन गेले होते. वाटायचे याच क्षणी पाकिस्तानला संपवुन टाकावे. असे अनेक प्रसंग सतत 3 महिने आले. मात्र स्वताच्या मर्जीने काहिही करने शक्य नाहि. हि लढाई सतत सिसफायर होईपर्यंत चालत राहिली. अनिलच्या युनिटने जवळपास 25,000 च्या वर गोळे डागले. शत्रुंचे अम्युनेशन डम्प उडविले. मदतीची साधने, अनेक पाईंट नेस्तनाबुत केले. मात्र देशासाठी लढतांना लाडका यशवंत कोलकर शहिद झाला. तसेच सर्व शहिद जवानांनी देशासाठी प्राण पणाला लावले होते. 26 जुलै 1999 ला पाकिस्तानला नमवुन भारत युध्द जिंकला. याची दखल घेवून युनिटला 9 महिण्याकरिता पश्चिम आफ्रीकेला शांतीसेनेत पाठविण्यात आले. तिथेहि तीन लढायांना सामारे जावे लागले होते. 21 वर्षापुर्वी घडलेल्या युध्दाच्या प्रसंग सांगत असतांना आजही अनिलच्या डोळयांत नकळत अश्रु ओघळते.
26 जुलै 1999 हा दिवस भारतीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने कोरला गेला आहे. शहीद जवानांना देश कायम स्मरणात ठेवेल. युध्दात अदम्य शौर्य आणि साहसाचे परिचय देणाऱ्या भारतीय सैनिकांना 23 व्या कारगिल विजय दिनानिमित्य त्रिवार वंदन.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!