जागतिक महिला दिन : घे भरारी

जागतिक महिला दिन : घे भरारी 

सचिन वाकडे, मुल 



मनात दुर्दम्य इच्छाशक्ती असली, तर सर्व ध्येय सहज गाठता येतात. पण त्यासाठी अपार मेहनत घ्यायची तयारी असणे तशी मनाशी खुणगाठ बांधणे आवश्यक आहे. मुल तालुक्यातील अनेक युवतीनी आज विविध क्षेत्रात कुणी गाॅडफाॅदर नसतांना, केवळ मेहनत व कौशल्याचा बळावर आपल्या कामाशी प्रामाणिक राहुन, आपले पाय घट्ट रोवू पाहतेय.

अल्पावधीतच नाट्यक्षेत्रात रसिक मनावर स्वत:ची अमीट छाप पाडून, अधिराज्य गाजवणारी मूल शहरातील नाट्य कलावंत युवतीचे नाव आहे प्राची फुलचंद गोंगले. अनेक कार्यक्रमात लहानपणीच प्रथम क्रमांक मिळत गेल्याने प्रोत्साहन आणि उत्साह वाढतच गेला. अनेक तालुका स्तरावरील कार्यक्रमात सहभागी होऊन पारितोषिकही मिळविले. शिक्षणासोबतच हा प्रवास सुरूच राहीला. यातुनच कला क्षेत्रातली आवड वृध्दींगत होत गेली. स्वतःला ओळखणं महत्वाचे आहे, असे ती सांगते. राज्यनाट्य, कामगार कल्याण नाटक, पुरुषोत्तम करंडक, अहमदनगर करंडक, महिला नाट्य, अशा विविध ठिकाणी नाटकाचे प्रयोग प्राचीने केले आहे. अमरावती, नागपूर, अकोला, यवतमाळ, सातारा, कोथरूड, पुणे, मुंबई सारख्या मोठया महानगरात नाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. मराठी नाट्यरंगभूमीवर प्राचीने आतापर्यंत काळोख देत हुंकार, कॉटेज नं. ५४, कथा दिनूच्या मृत्युपत्राची, आवघडीचे पाच दिवस, रंग जगण्याचा इत्यादी नाटकांत भूमिका साकारली आहे.
अभिनयात जिवंतपणा असल्याने शिरमी हे पात्र रसिकांच्या मनात घर करून गेले. रसिकांचे भरभरून प्रेम मिळालेल्या प्राचीला राज्यस्तरीय कामगार कल्याण नाट्य स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केल्या गेले. प्राचीच्या विविध कलागुणांमुळे पुणेे येथे असताना मराठी प्रसिद्ध अभिनेत्री अनिताताई दाते केळकर यांची मुलाखत घेण्याची संधीही तीला मिळाली. तो प्राचीला कायम स्मरणात राहणारा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला आहे. 

मुल येथील मध्यमवर्गीय परिवारात निकिता हजारे हया गुणी युवतीचा जन्म झाला. आज नृत्यक्षेत्रात ती टाॅलीवुडमध्ये काम करत असली, तरी तीला सुरुवातीला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने निकिताला इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मामाकडे राहून पुर्ण करावे लागले. या काळात वडीलांना लकवा झाल्याने पुढिल शिक्षणासाठी मुलला यावे लागले. अगदी शैक्षणिक वयात घरातील परिस्थितीची जाणीव होऊन निकीताने स्वत:चा खर्च स्वत: करण्याचा ठरवून घरी आपल्याकडून थोडीफार आर्थिक मदत व्हावी, म्हणून निकिताने एमएससी-आयटी शिकविण्याकरीता काॅम्पुटर इस्टिटयुटमध्ये शिकवणी घेण्यास सुरवात केली. यामुळे निकीता स्वत: स्वावलंबी तर झालीच परंतु घरी सुध्दा आर्थिक मदत झाली. नागपुरातील वास्तव्यादरम्यान विशेष आठवणीतील कधिही न विसरता येणारी घटना म्हणजे, आर्थिक चणचणीमुळे अन्नाविना उपाशी राहून काढलेले ते दोन दिवस, आयुष्यात खुप काहि शिकवून गेले. निकिताचे आयुष्य हे चढ उतारांनी भरलेले असून आलेल्या समस्यांवर वेळोवेळी मात करण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता. 
दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने, टेलिव्हिजन पाहत नृत्यकलेत आज पारंगत झालेल्या निकिताने युवा मंचचा माध्यमातून नृत्यस्पर्धेत भाग घेत राहिली. आणी, हळुहळू पारितोषिकांची रिघ लागली. त्यातुन निकिता राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेतही गेली. स्वत:चा एक प्लॅटफार्म तयार झाल्यावर ती इतरांनाही नृत्य शिकवू लागली. यातून आर्थिक उन्नती साधता आली. निकिताला इथेच थांबायचे नव्हते, तर प्रगतीच्या वाटेवर पुन्हा लांबचा पल्ला गाठायचा असल्याने, ती थेट हैदराबाद गाठत दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री टाॅलीवुडमध्ये नशिब आजमायला गेली. दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुणी गाॅडफाॅदर नसल्याने संघर्ष करण्यात काहि कालावधी गेला. आपल्या नुत्याच्या बळावर तीला टाॅलीवुडमध्ये बॅकग्राउंड डाॅन्सर म्हणून संधी मिळाली. छान डाॅन्स करित असल्याने तीला एकापाठोपाठ एक असे संधी मिळत गेल्या.
शुटिंग, इव्हेंट, ऑडिओ लाॅंच यात मिळेल ते काम करित निकिता यशाची एक एक पायरी चढत गेली. आज ती टाॅलीवुडमध्ये काम करित असुनहि घरच्या कामांमध्ये तिचा सहभाग असतो. भाऊ अक्षय याला परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी तिचा महत्वाचा पाठींबा आहे. इव्हेंटसाठी तीला दुबई, सिंगापूरला जाण्याची संधीसुध्दा मिळाली आहे. स्वत:ची आवड जोपासत ती आता अभिनयाकडे वळली आहे. 7 वेबसिरीजमध्ये काम केलेल्या निकिताला पुन्हा लांबचा पल्ला गाठायचा आहे. तीला टिव्ही मालिकांमध्ये काम करायचे असल्याचे ती आवर्जुन सांगते. त्या दिशेने निकिताचे प्रयत्न सुरु आहेत.
               आकाशाला गवसणी घालणाऱ्या निकिताच्या मते, नुसतं जगणं महत्वाचं नाहि, तर त्या जगण्याला उद्देश हवा, स्वप्ने असावीत. बाहेरच्या जगामध्ये आपली स्वत:ची ओळख आणि स्वत:चं वेगळं अस्तित्व असायला हवं, असं निकिता आवर्जुन सांगते.

बालमनावर संस्कार करणारे केंद्र म्हणजेच शाळा. याच शाळेत आपल्या आजुबाजुला घडत असलेल्या घटनांमधून चांगले ते घ्यावे आणि वाईट ते सोडावे असा गुरुमंत्र शिकविल्या जाते. राष्ट्रपिता म. ज्योतीराव फुले यांनि सांगितलेल्या विद्येविना मती गेली .... हि शिकवण लाख मोलाची ठरते. संत, थोर महात्म्यांची, महान समाज सुधारकांची भूमी म्हणून महाराष्ट्र सुपरिचित आहे. देशाला दिशा देणारे, सदैव मार्गदर्शकांची भूमिका बजाविणाऱ्या महान विभूतीच्या महाराष्ट्रात, साहित्याला फार मोठे अनन्यसाधारण महत्व आहे. साहित्य हे केवळ माहिती देत नाहि, तर यातून आयुष्याला कलाटणी देणारी, दिशा देणारी, मार्गदर्शक ठरणारी सदैव चांगली शिकवण देणारी हि गुरुकिल्ली आहे.
मुल येथील तीन सदस्यांच्या आनंदी व सुखी परिवारात, सलोनी अशोक राऊत या गुणी उदयोन्मुख युवा कवियत्रीचा जन्म झाला. कर्मवीर महाविद्यालयात कथा कथन स्पर्धेत प्रथम तसेच स्वरचित काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त असलेल्या सलोनीला यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'जन्म नवा' या कवितेचे सादरिकरण करण्याची संधी प्राप्त झाली. राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सादरीकरण करणारी मुल तालुक्यातील ती पहिली व एकमेव युवा साहित्यिक ठरली आहे. स्वलिखीत पुस्तक प्रकाशनाची मनोमन इच्छा असलेल्या सलोनीला आपल्या साहित्यातून जनजागृती करायची आहे. अजूनही काही सुशिक्षित नागरिक २१ व्या शतकातही अनिष्ठ रूढ़ी, प्रथा पाळत असल्याने त्यांना स्वत:च्या साहित्यातून शिक्षित करायचा ध्यास ती मनाशी बाळगून आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, मासिक धर्माला आजही काही महाभाग विटाळ मानतात. जेव्हा की, मासिक धर्म स्त्रीयांकरिता एक अनमोल वरदान आहे. आपले विचार साहित्यातून प्रत्येक स्त्री मनावर तीला उमटवायचे आहेत. अनेक विषयावर साहित्यलेखन केलेल्या सलोनीला इतर विषयाच्या तुलनेत 'प्रेम' या विषयावर वाचकांचा अधिक प्रतिसाद मिळतो.

युवा चित्रकार रविना प्रभाकर धोटे हिने एक वर्ष कालावधीचा चित्रकलेचा अभास्क्रम पुर्ण केलेला आहे. ती मूल येथिल सी.बी.एस.सी.कॉन्वेंटला दोन वर्ष चित्रकलेची शिक्षिका म्हणुन कार्यरत होती. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी चित्रकलेत पारंगत केले आहे. आताही अनेका विद्यार्थ्यांना ती चित्रकलेत संप्रेशन करीत आहे. रविनाला चित्र तयार करणे, रांगोळी चित्र आणि भिंतीचित्र बनविण्याची आवड आहे. सुरूवातीला चित्रकला अवघड जात असल्याने थोडा त्रास झाला. मात्र सरावाने हळुहळु सर्व सोपे होत गेले. एखाद्या विषयावर चित्र तयार करतांना चेहऱ्यावर सुखाचे भाव येतात. आणि त्यातुन आनंद मिळते, महत्वाचे म्हणजे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. असे ती सांगते. चित्रकलेतुन स्वताची ओळख तयार होत गेली. या क्षेत्रात आणखी बरेच काही शिकायचे आहे. स्वताचे कौशल्य तयार करायचे आहे असे ती सांगते. 

फँशन हे नाव उच्चारताच डोळ्यापुढे येते महानगरे. मुल शहरात लहानाची मोठी झालेली आरतीचे जसजसे वय वाढत गेले तसतसे आईच्या चिंतेत भर पडत गेली. कारण, नवनवीन कपडयांच्या छंद लागल्याने आईची नजर चुकवून ती इच्छेनुसार कपडयांना कसेही कापत असे. हा छंद दिवसागणीक वाढत गेला तशी आईचे रागावणं हे स्वाभाविक व कायम होतं. वय वाढत गेले तसे छंदही वाढले. आता मात्र आरतीत एक वैचारिक बदल झालेला होता. ती या छंदाला आता करियर या दृष्टिने बघु लागली. दृढनिश्चय केलेल्या आरतीचा प्रवास आता छंदापासून प्रोफेशनल फॅशन डिझायनरच्या दिशेने सुरु झाला. यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणाची जोड दयावी लागली. पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना तीला मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला. नातलगांकडून तीच्यावर दबाव टाकण्याच्या भरपुर प्रयत्न केला गेला. पण, त्या दबाबवाला बळी न पडता आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी तडजोड करायला ती तयार नव्हती. या क्षेत्रात तीने प्रामाणिकपणे चोख कामगिरी बजावत वयाच्या केवळ 22 व्या वर्षी प्रोफेशनल फॅशन डिझायनर म्हणून बरेच नामांकित पुरस्कार प्राप्त केले आहे. बेस्ट स्टुडेंट सेंट्रल इंडिया इंन्स्टिटयुट ऑफ फॅशन टेक्नोलाॅजी, बेस्ट डिझायनर रनरागिणी फॅशन शो पुणे, बेस्ट थिम व्हि प्रोडक्शन फॅशन शो नागपुर, बेस्ट माॅडेल नागपूर असे विविध पुरस्कार मिळवलेली आरती प्रकाशझोतात आली, ती वृत्तपत्रापासून तयार केलेला ड्रेसमुळे. हा ड्रेस समाजमाध्यमांवर चांगलाच लोकप्रिय झाला होता. आरतीच्या फॅशन डिझायनिंगची दखल प्रादेशिक मोठया वृत्तपत्राने घेवून तिच्या वृत्तपत्रापासून बनविलेल्या ड्रेसला स्पेस मिळवून दिली.

मुल तालुक्यातील मुक्काम पडझरी, पोस्ट सोमनाथ या लहानश्या खेडयातील एक युवती, जगातील सर्वात उंच असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहते. आदिवासी विकास विभाग चंद्रपुरच्या वतीने, तीन आश्रम शाळांची निवड करण्यात आली. शुभांगी शिक्षण घेत असलेली बोर्डा येथील आश्रम शाळेतून तीची निवड करण्यात आली. नोव्हेंबर 2017 मध्ये स्वप्न पुर्ण करण्यासाठी तीच्या पुढिल प्रवासाला सुरुवात झालीे. व्यवसायाने शेतकरी असलेले वडील सुधाकर कोटनाके यांच्या मुलीची शौर्यगाथा हि तालुक्यासाठी गौरवांकित करणारी आहे.
पालकांच्या सहमतीने शुभांगीला मिशन एव्हरेस्टच्या रुपाने हिमालयीन पर्वतारोहण संस्थान दार्जिलिंग येथे समुद्रसपाटीपासून 14,000 फुट उंचीवर गिर्यारोहणाचे व उंचीवरील वातावरणाशी समरस होण्याचे विशेष प्रशिक्षण घेवून ती मिशन एव्हरेस्टसाठी तयार केल्या गेले. शुभांगी हि मुल तालुक्यातील पहिली माऊंट एव्हरेस्टची गिर्यारोहि ठरली आहे.
सर्वदुर केवळ बर्फाच्छादित वातावरण असल्याने संकटही तितकेच भयावह असायचे. भुकंप आला, खोल खाईत पडले, पाउस आला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऐनवेळी ऑक्सिजन कमी झाले तर अश्यावेळेस तिथे दुसरा काहिच पर्याय उपलब्ध नसायचा. झाडांच्या थांगपत्ता नाहि, श्वास घ्यायला होणारी अडचण, अश्यावेळी काम करत नसलेलं डोकं, मग त्यातुन डोकं दुखणे, सर्दी, पोट दुखणे यासारखे आजार उत्पन्न होत असे.
               प्रशिक्षणादरम्यान मिशन एव्हरेस्टवाल्यांना स्वत:चा आत्मविश्वास वाढविता आला. शिस्त तसेच टिम मेंबरशी कसं वागावं व त्यांची काळजी घेणे, स्वच्छता, संवादकौशल्य यासारख्या बाबी प्रशिक्षणात शिकता आल्या. जर एखादा व्यक्ती पाण्यात बुडाला तर त्या व्यक्तीला कसं वाचवता येईल, तसेच वेळेवर कोणतेच साधन उपलब्ध नसेल, तर घरगुती वापराचा वस्तुपासून नवीन साधन तयार करुन, सामोरच्या व्यक्तीच्या जिव वाचवणे यासारखे प्रशिक्षण ती घेतली आहे. ती एव्हरेस्ट सर करु शकली नसली तरी तिचा हा साहसी प्रयत्न वाखाणण्याजोगा व प्रेरणादायी आहे.

सुखी व आनंदी परिवारात जन्म झालेल्या अवंती अनिल गांगरेड्डीवार ह्या तरुणीने शिकई मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे तसेच मुल शहराचे नाव गौरवांकित केले आहे. आजपर्यंतच्या कारकिर्दीत मिळालेल्या यशाचे श्रेय ती आई, वडील व प्रशिक्षक संदीप पेदापल्ली यांना देते. घरून पूर्ण सहकार्यासोबतच भक्कम पाठींबा मिळाल्याने, लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्रात अव्वल राहता आले. हाच पाठींबा कायम सोबत असल्यामुळे घरच्यांच्या विश्वास सार्थ ठरवत, २०१८ साली दक्षिण कोरियामध्ये झालेल्या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात विश्व अजिंक्य स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावता आला. क्रिडा क्षेत्रात किंवा सैनिकी क्षेत्रातआवश्यक असलेली एनसीसी ए, बी, सि प्रमाणपत्र ए ग्रेड मध्ये उत्तीर्ण असलेल्या अवंतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर लद्दाख येथे महाराष्ट्राचे नेतृत्व केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेपाल, भूतान, कोरिया पाच सुवर्णपदक पटकावून तसेच राष्ट्रीय स्तरावर गोवा, अमृतसर, जम्मू काश्मीर, पाठण, मुंबई, रोहतक सहा सुवर्णपदक पटकावला आहे. राज्यस्तरावर आठ पदके पटकावलेली आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत तायकांडो या क्रीडा प्रकारात सलग तीनदा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी खेळून विद्यापीठाचे कलर कोट प्राप्त केले आहेत. कबड्डी, खो-खो या क्रीडा प्रकारात देखील तिने प्राविण्य मिळविलेले आहे.

आपल्या एकाग्रतेच्या भावविश्वात रमून मातीला आकार देत, हवी ती मूर्ती घडविणारी महिला मूर्तिकार अंकिता मारोती रामशेट्टीवार हे नाव मुल तालुक्याला सुपरिचित आहे. अंकिता ही चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या मुर्तीकलेची छाप पाडणारे प्रसिद्ध चेपाजी पेंटर यांची नात आहे. आजोबापासून वडिलांकडे तर वडिलांपासून अंकिताकडे मुर्तीकलेचा हा वारसा पारंपारिक आवड असल्याने चालत आलेला आहे. चेपाजी पेंटरपासून सुरु झालेला हा वारसा आज अंकिताच्या रूपाने तिसरी पिढी चालवीत आहे.
मुर्तीकलेत काम करित असतांना अंकिताला काहि समस्या किव्हा संकट आलेले नसले तरी प्रकृती अस्वस्थामुळे मन मात्र कधीतरी विचलित व्हायचे. ह्या क्षेत्रात एक ठराविक लक्ष्य असते, ज्याच्या अचूक वेध घ्यायचा असतो तेच तीने केले. प्रकृती अस्वस्थामुळे आयुष्यात केलेली मेहनत आणि त्यात मिळालेले समाधान हे सदैव उपयोगी पडणारे आहे. कुठलिही गोष्ट विकसित करतांना शारिरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावे लागते. वेळेनुसार परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्या कामात असलेले समर्पण, माणसाची जिद्द हि त्याला यशाच्या शिखरावर पोहचवतो. आजतागायत आयुष्यात मिळालेले यश व मिळालेले गुण यांची सांगड घालून खुप सामोर जायचे असल्याचे अंकिता आवर्जून सांगते. भविष्यात अंकिताला यशस्वी मुर्तीकार व्हायचे असून प्रत्येकाला कलेची जाणिव करून द्यायची आहे.
लोकांच्या भावना, त्यांच्या आवडी निवडी ह्या आपल्या समजून मुर्तीकलेतून त्यांचे दुख, वेदना, अंकिताला हलके करायचे आहे. येतांना निशब्द असलेले ओठ मुर्ती नेताना मात्र मुर्ती पाहून त्यांच्या ओठावर स्मीतहास्य फुलवायचे आहे.

मुल येथील उदयोन्मुख प्रथम महिला पत्रकार तसेच संगीतकलाप्रेमी कुमुदिनी शरद भोयर हे नाव आज तालुक्यातील नागरिकांसाठी परिचयाचे आहे. बालपणापासून संगीत क्षेत्रात आवड असणाऱ्या कुमुदिनीने आपले शिक्षण संगीत विषयातच पुर्ण केले आहे. गायन, वादन, वाचन, लेखन करणे हे आवडीचे विषय असले तरी मुलसारख्या शहरात प्रथम महिला पत्रकार होण्याचा बहुमान कुमुदिनीला मिळाला आहे. अनेक अन्यायाला वाचा फोडणाऱ्या कुमुदिनीने पत्रकारिता क्षेत्रात काम करित असतांना जेव्हा धाकटया बहिनीला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या दोषींना शिक्षा व्हावी व त्यासाठी योग्य तपास व्हावा, असे प्रयत्न करित असतांना तेव्हा अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या काळात अनेक समस्याहि आल्या. आयुष्याच्या वळणावर आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत, यशाची एक एक पायरी चढत आज एक यशस्वी पत्रकार तसेच गोड गळयाची गायीका मुल शहराला लाभली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!