शिक्षित आणि सुशिक्षित!
शिक्षित आणि सुशिक्षित!
-पुरुषोत्तम आवारे पाटील
आपल्या समाजात काही शब्द इतके सहज रूढ होतात की त्याचा मूळ अर्थ शोधण्याची नंतर कुणाला गरज वाटत नाही. अर्थ शोधणारे शोधतात तोवर हे शब्द लोकांच्या तोंडी एवढे चपखल बसलेले असतात की जिभेचे वळण सुटत नाही. प्राथमिकच्या पुढे सहसा जो शिकला त्याला सुशिक्षित म्हणण्याचा प्रघात कधीपासून सुरू झाला असावा याचा नेमका शोध लागत नसला तरी इंग्रजी राजवट गेल्यावर काही वर्षांनी हा शब्द उदयास आला असावा. ज्यांनी जुन्या काळात धर्मग्रंथ लिहिले, लोकांसाठी अन्याय आचारसंहिता निर्माण केल्या ते लोक पण सुशिक्षित असले पाहिजेत याबद्दल कुणाच्याही मनात संशय असण्याचे कारण नाही. जो लिहितो, बोलतो, गातो तो केवळ शिक्षित कसा असेल त्याला सुशिक्षितच म्हटले पाहिजे ना.
पुढे सक्तीचे प्राथमिक शिक्षण आणि एकूणच शिक्षणासाठी महात्मा फुल्यांनी लढा दिल्यावर डॉ. आंबेडकरांनी घटनादत्त अधिकार प्रदान केल्यावर *ज्ञान शाखात जाणार्यांची संख्या एवढी वाढली की तेथून बाहेर पडल्यावर या सुशिक्षित लोकांनी सगळ्या महापुरुषांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा मस्त कार्यक्रम राबवला*. हुंडा, जाती, पोटजाती भेद, बुवाबाजी किंवा नवनवे फसवणुकीचे मार्ग याच वर्गाच्या सुपीक डोक्यातून निघाले. शेकडो वर्षांपूर्वी *ज्यांनी धर्मग्रंथ लिहून ठेवले त्यातील आचारसंहिता कशा योग्य आहेत यासाठी हा वर्ग आपले तुटपुंजे ज्ञान खर्च करून जेव्हा वासरात लंगडी गाय शहाणी ठरला तेव्हा यांचे ज्ञान उघडे पडायला सुरुवात झाली*.
शिकलेला म्हणजे शिक्षित आणि शिक्षणाचा उपयोग चांगल्या कामासाठी करणारा म्हणजे सुशिक्षित हा अर्थ अनुभवाने फार अलीकडे समाजाच्या लक्षात आला आहे. चोर्या, खून, फसवणूक, मारामारी, अनैतिकता, द्वेष, मत्सर, विखार यांचा बेमालूम वापर करणारे बहुतांश शिकलेले असतात. त्यांना सुशिक्षित म्हणण्याचे धाडस आता कुणी करणार नाही, ते यासाठी की सुशिक्षित म्हणवून घेणार्या कोट्यवधी लोकांनी मानवतेला लाजवणारी कामे केली आहेत. ते करताना रंगेहात पकडलेसुद्धा गेले आहेत. वैवाहिक जीवनात घडणारे शिक्षितांचे घटस्फोट, घरगुती हिंसाचार आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार यांचे राष्ट्रीय अहवाल हे सांगतात की यात शिक्षित आणि उच्चशिक्षित जास्त आहेत. यांना कोणत्याही तोंडाने सुशिक्षित नागरिक म्हणता येणार नाहीत. याचा साधा अर्थ असाही होऊ शकतो की, *चांगुलपणा, माणुसकी, सामाजिक भान आणि शिक्षण यांचा संबंध असतोच असे नाही. समाजाची विविध क्षेत्रे आज ज्या पद्धतीने नासवली गेली आहेत, त्याला जबाबदार असणार्या लोकांच्या यादीवर नजर टाकली तर दुर्दैवाने शिकलेल्या व्यक्तीच संख्येने जास्त निघतात*. याचा थेट अर्थ असाही असू शकतो की व्यक्ती कितीही शिकलेली असेल, परंतु ती चांगली असेलच असे म्हणता येणार नाही. उलट ज्यांना अडाणी म्हणून जुन्या काळात हिणवले गेले अशा अनेकांनी चांगुलपणा आणि मानवतेचे आदर्श गावोगाव निर्माण करून ठेवले आहेत. शिकलेली व्यक्ती आजच्या काळात कट्टर असेल, कोणत्याही कारणाने कुणाचा द्वेष करीत असेल किंवा जन्मावरून कुणाला कनिष्ठ वा श्रेष्ठ समजत असेल तर या कथित सुशिक्षित व्यक्तींचा समाजाला काहीही फायदा होणार नाही. उलट ज्यांनी शिक्षणावर सू आणि शी केली आहे अशांना आपण सुशिक्षित म्हणून गौरवांकित करून ठेवले आहे असा आरोप करायला भरपूर जागा उपलब्ध झाली आहे. *जो वावरतो नव्या शतकात पण विचार करतो धर्म ग्रंथांच्या आदेशाने, विज्ञानाने निर्माण केलेल्या सगळ्या सुखसुविधांचा वापर करतो आणि जिथे विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरू होते अशा फोकनाड्या मारतो त्यांनाच जर सुशिक्षित म्हणायचे असेल तर आपले अडाणी पूर्वज खरे सुशिक्षित होते असे विधान करायला संधी आहे*.
- पुरुषोत्तम आवारे पाटील


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!