देवा-धर्माला विरोध न करणे ही अभाअंनिसची अधिकृत भूमिका-हरिभाऊ पाथोडे

देवा-धर्माला विरोध न करणे ही अभाअंनिसची अधिकृत भूमिका-हरिभाऊ पाथोडे
तळोधी (बा.): यश कायरकर.
         अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कोणत्याही देवाधर्माला विरोध करीत नाही. देवा-धर्माचा आधार घेऊन जे बुवा-बाबा, तांत्रिक-मांत्रिक, देव्या-भगत समाजाची फसवणूक करून, समाजाचे आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण करतात, त्यांचा भांडाफोड करून  शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचे काम अभाअंनिसचे कार्यकर्ते करीत असतात. देवा-धर्माला विरोध न करणे ही अभाअंनिसची अधिकृत भूमिका आहे.प्रा. श्याम मानव यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गठीत केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच  सर्वांनुमते स्वीकारलेली ही भूमिका आहे, असे मत अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक, हरिभाऊ पाथोडे यांनी व्यक्त केले. ते दिनांक १९आॅक्टो.२०२१ला अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा सिंदेवाहीच्या वतीने आयोजित बैठकीत  बोलत होते. देवा-धर्मातून अंधश्रद्धा निर्माण होतात हा गैरसमज समाजाने आपल्या डोक्यातून काढून घेतला पाहिजे. अंधश्रद्धा ही एक प्रक्रिया आहे. शब्दप्रामाण्य व अचिकित्सा हे दोन घटक समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत लोटण्यास कारणीभूत ठरतात. ज्या कुणाला या भूमिकेबद्धल शंका आहे, त्यांनी अभाअंनिसच्या कार्यशाळेला उपस्थित राहणे गरजेचे आहे. 
       या बैठकीला अभाअंनिसच्या जेष्ठ कार्यकर्त्या लीलाताई पाथोडे,अभाअंनिस जिल्हा शाखा चंद्रपूरचे सहसचिव अनिल लोनबले तसेच अभाअंनिस तालुका शाखा चिमूर चे सचिव किशोरशाह आत्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनीही याप्रसंगी आपले मत व्यक्त केले.
      या बैठकीचे संचालन अभाअंनिस तालुका शाखा सिंदेवाहीचे संघटक डेकेश्वर पर्वते यांनी, प्रास्ताविक तालुका सचिव मोरेश्वर गौरकार यांनी तर आभारप्रदर्शन तालुका अध्यक्ष अंबादास मेश्राम यांनी केले. या बैठकीच्या आयोजनासाठी  सिंदेवाही तालुका महिला संघटिका राजश्री वसाके, सदस्या श्वेता मोहुर्ले, सौ.रजनी पर्वते ,राम पर्वते,प्रणय पर्वते यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!