कळमना शेतशिवारात वाघाचा धुमाकूळ पावसात वनकर्मचाऱ्यांची रात्रभर गस्त

कळमना शेतशिवारात वाघाचा धुमाकूळ
पावसात वनकर्मचाऱ्यांची रात्रभर गस्त
 बल्लारपूर:-(धनंजय पांढरे )
मध्य चांदा वन विभाग चंद्रपूर अंतर्गत बल्हारशाह वन परिक्षेत्रातील लावारी, कळमना शेत शिवारात वाघाने धुमाकूळ घातला असून गावकऱ्यांनी बंदोबस्ताची मागणी केली होती. त्या अनुषंगाने वन कर्मचाऱ्यांनी भर पावसात रात्रभर गस्त सुरू केली आहे. लावारी व कळमना गावातील शेतकऱ्यांची शेती जंगला शेजारी आहे. शेती कामासाठी रोज शेतात मजुरांना घेऊन जातात. शेतात चराईसाठी जाणाऱ्या पाळीव जनावरांवर वाघाने हल्ला करून तीन जनावरे ठार केल्याने व वाघाचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल बल्लारपूर वन परिक्षेत्राधिकारी संतोष थिपे यांनी घेतली व वन कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून शेत शिवारात गस्ती करण्याचे नियोजन केले. मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून गस्ती पथक पावसाची तमा न बाळगता गस्त करित आहे. गस्ती पथक दिवस रात्र जंगलात भ्रमंती करित, पगमार्ग शोधून, फटाके फोडून वाघाला दूर पळविण्याचा प्रयत्न करित असल्याची माहिती बल्हारशाह वन परिक्षेत्राधिकारी संतोष थिपे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!