अखेर गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडी धावणार मंगळवार पासून रेल्वे प्रवाशांना दिलासा
अखेर गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडी धावणार
मंगळवार पासून रेल्वे प्रवाशांना दिलासा
कोविड १९ कोरोना संसर्गामुळे मागील १८ महिन्यापासून बंद असलेली गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर रेल्वे गाडी मंगळवार दि.२८पासून सुरू होत आहे.यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील सहा महिन्यांपासून या गाड्या सुरू करण्यासाठी प्रवाशांची असलेली मागणी अखेर मार्गी लागली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद असल्याने प्रवाशांना एसटीने तसेच खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. गोंदिया ते चंद्रपूर प्रवासाठी तब्बल ३०० रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर मंगळवारपासून धावणार असल्याने प्रवाशांना यासाठी केवळ ५० ते ६० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावरील भार कमी होणार आहे. मात्र, या गाड्यांमध्ये पूर्वीचप्रमाणेच रेल्वे स्थानकावरून तिकीट घेऊन प्रवास करता येणार की आरक्षण करावे लागणार याबाबत रेल्वेने अद्यापही स्पष्ट केले नाही. सोमवारी यासंदर्भातील दिशा निर्देश प्राप्त होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे या पॅसेंजर गाड्या सुरू होण्यासाठी मागील दीड वर्षांपासून असलेली प्रतीक्षा संपली आहे.
रेल्वे विभागाने मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक्स्प्रेससह काही पॅसेंजर गाड्या बंद केल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहे. मात्र, पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता, तर भाजीपाला विक्रेते आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी जीवनदायिनी असलेल्या या पॅसेजर गाड्या बंद असल्याने अनेकांचा रोजगार हिरावला होता. ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांना एसटी प्रवास करण्यासाठी दुप्पट पैसे माेजावे लागत होते. त्यामुळे पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी केली जात होती. गोंदिया बल्लारशहा रेल्वे मार्गावरील प्रवाश्यांची रेल्वे गाडी सुरु करण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. अखेर रेल्वे विभागाने तब्बल १८ महिन्यांनंतर पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वे विभागाने यासंदर्भातील पत्र शुक्रवारी जारी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!