शिक्षकांच्या गटविम्याची प्रकरणे निकाली काढा म. रा. प्राथमिक शिक्षक संघाने दिले निवेदन गटशिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षक समस्यांवर चर्चा




नागभीड : (यश कायरकर) 
 शिक्षकांच्या गटविमा प्रकरणांच्या नोंदी अद्ययावत नसल्याने सेवानिवृत्ती नंतर शिक्षकांना नाहक त्रास होतो त्यामुळे अचूक नोंदींसह प्रस्ताव जि. प. कडे पाठवावा. व गटविम्याची थकीत प्रकरणे त्वरित निकाली काढावी अशी मागणी म. रा. प्राथमिक शिक्षक संघाने प्रशासनाकडे केली आहे. 
           संघटनेच्या समस्या निवारण दौऱ्याअंतर्गत राज्य प्रतिनिधी संतोष कुंटावार व जिल्हा मार्गदर्शक विठ्ठल आवारी, तालुकाध्यक्ष योगेश भगत यांनी पंचायत समिती नागभीडचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांची भेट घेऊन याबाबत नुकतीच चर्चा केली. शिक्षक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर गटविमा प्रकरणांचे प्रस्ताव वर्षे दोन वर्षे  जि.प.कडे सादरच होत नाही. कधी गटविमा नोंदी पूर्ण नसतात तर कधी नामनिर्देशन नसल्याच्या कारणास्तव प्रस्ताव परतविले जातात. परिणामी शिक्षक लाभापासून वंचित राहतात. हे वास्तव संघटनेने प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. त्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी यावेळी योग्य उपाययोजना करून प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे.
          यावेळी संघटनेने विविध समस्यांवर चर्चा केली. सातव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्याकरिता विशेष शिबीर लावण्याचे मान्य करण्यात आले, याशिवाय शालेय पाठ्यपुस्तके थेट शाळेपर्यत पोचवणे, सहाव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते जीपीएफ ला पाठविणे,  परीक्षेला बसण्याची परवानगी मिळण्याचे प्रस्ताव त्वरित पाठविणे,   शाळा अनुदानांबाबत मुख्याध्यापकांना वेळोवेळी अवगत करणे, जड वस्तू निर्लेखनाबाबत कार्यशाळा घेणे, परिभाषित अंशदान योजनेतील शिक्षकांना १ जुलै ला देय असणारा सातव्या वेतन आयोगाचा हप्ता मिळणे इ. प्रलंबित समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.  सर्व समस्यांवर लवकरच उचित उपयोजना करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने संघटनेला दिले आहे. यावेळी संघटनेच्या महिला प्रतिनिधी हर्षलता वालदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!