अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणेसह शिष्टमंडळाची डेरा आंदोलनाला भेट व चर्चा

राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या डेरा आंदोलनाला १३ व्या दिवशी दिनांक २०  फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमने, विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सुरपाम, प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड व रक्तपेढी प्रमुख डॉ. अनंत हजारे यांच्या शिष्ट मंडळाने भेट देऊन आंदोलनकर्त्या  कामगारांशी चर्चा केली. यावेळी शासनाने सर्व कामगारांचे थकीत पगार जमा करण्याचे निर्देश अधिष्ठाता कार्यालयाला दिलेले असून पुढील १० दिवसांमध्ये कामगाराच्या खात्यामध्ये पगार जमा होण्याची शक्यता असल्याचे तोंडी आश्वासन अधिष्ठाता डाॅ. हुमणे यांनी आंदोलकांना दिले. यावर आजपावेतो वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने थकीत पगार व किमान वेतनाबाबत अनेक वेळा तोंडी व लेखी आश्वासन देऊनही त्यांची पूर्तता केलेली नाही.कामगारांच्या खात्यामध्ये थेट पगार जमा करण्यासाठी कोषागार विभागाने शासनाकडून केवळ चार ओळींची परवानगी मागीतलेली आहे. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने तीन महिन्यात परवानगी मिळविण्यासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे थकीत पगार व किमान वेतनाबाबत ठोस कार्यवाही झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,अशी भूमिका आंदोलनकर्त्या कामगारांनी घेतलेली आहे. 

कोरोनाची लस घेण्याचे डॉ. राजेंद्र सुरपाम यांचे कामगारांना आवाहन 

'थकीत पगार देणार नाही,तोपर्यंत कोरोनाची लस घेणार नाही', अशी भुमिका घेऊन ५०० कोविड योध्द्या कामगारांनी महिन्याभरापूर्वी असहकार आंदोलन छेडले होते. कामगारांच्या या असहकार आंदोलनामुळे अधिष्ठाता कार्यालयाची पंचाईत झालेली आहे. केंद्रीय स्तरावर लस घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोठा पूर्ण झाल्याची माहिती पाठविण्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला अडचण निर्माण होत आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्याच्या कार्यक्रमाची मुदत संपत असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने कंत्राटी कामगार लसीच्या डोज पासुन वंचित राहणे योग्य नाही अशी भावना व्यक्त करुन डॉ. सुरपाम यांनी सर्व कामगारांना विहित मुदतीत लस घेण्याचे आवाहन केले. यावर सर्व  कामगारांशी चर्चा करून भूमिका जाहीर करण्याचे आश्वासन जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिष्टमंडळांला दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!