पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण टाळा, भारतीय संस्कृती जपा.



लेख : सौ. विदया मंगळगिरीवार 
२६ जानेवारीला ' जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा.. ..' हे गाणं ऐकलं आणि ह्या गाण्यातील भारतीय संस्कृती, समृद्धी आणि संपन्नता याचं वर्णनही  लक्षपूर्वक ऐकलं. आणि आता फेब्रुवारी महिना आलाय... लागलीच तरुण पिढीमध्ये उत्साह संचारला आहे. तर कशाचा आहे हा उत्साह? व्हॅलेंटाईन डे चा. हा ' डे ' साजरा करणे म्हणजे पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करणे आहे.
हा डे साजरा करण्यासाठी १५,१६ वर्षांच्या मुलांपासून युवकांपर्यंत सगळेच जय्यत तयारी करतात. या वयात मुलांना खऱ्या अर्थाने प्रेम समजलेही नसते. या दिवशी महागड्या वस्तू भेट म्हणून देणे, लाल रंगाचे गुलाबाचे फूल प्रेमाचं प्रतिक म्हणून देणे, हे सगळं घेण्यासाठी पैसे असोत वां नसोत...कधी आपल्या पॉकेट मनी मधून किंवा वडिलांच्या पाकिटातून नाहीतर दुसऱ्याचं पाकीट मारून ह्या गोष्टी घेतल्या जातात. एकमेकांना प्रेमाची कबूली देतात. खरंच काय कळतं हो त्यांना प्रेम? या दिवशी एका प्रेमी युगुलाचं लग्न लावून दिलं म्हणून व्हॅलेंटाईनला तेथील राजाने शिक्षा केली. म्हणून या दिवसाला  ' व्हॅलेंटाईन डे ' नाव पडलं. हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून आजची तरूण पिढी, विद्यालयीन, महाविद्यालयीन मुले साजरा करतात.
       आपल्या देशात " हर बालक है मोहन और राधा इक इक बाला "  असे आपण म्हणतो. नुसती प्रेमाची कबुली देणे म्हणजे प्रेम नव्हे. खऱ्या प्रेमात शक्ती, भक्ती आणि त्याग असतो. ह्या तिन्ही गोष्टी ह्यात आपल्याला कुठेही दिसत नाहीत. आजच्या तरूण पिढीला जे प्रेम वाटतं ते नुसतं आकर्षण आहे आणि ह्या आकर्षणालाच ते प्रेम समजतात. त्यामुळे एकतर्फी प्रेमाचा प्रकार वाढला आहे,त्यात स्वार्थ आला आहे. खरं प्रेम मात्र दुर्मिळ झालं आहे. प्रेम हे आदरणीय असावं,सगळ्यांनी त्याचा आदर करावा असं असावं. जोडीदार निवडण्या चं स्वातंत्र्य आपल्याही संस्कृतीत आहे. शंकर - पार्वती विवाह घ्या.... पार्वतीने तपश्चर्या करून शंकरासारखा पती प्राप्त केला. जोडीदार निवडायचं स्वातंत्र्य आहे पण त्यासाठी विशिष्ट वेळ आणि काळ पूर्ण व्हावा लागतो.
            अशाप्रकारे हे डे साजरे करून खरा जोडीदार मिळत नसतो. असं अंधानुकरण करणे म्हणजे भौतिक वाद, चंगळवाद वाढवणे आहे. युवकांनो, अशी प्रथा रोका. पालकांनो, आपल्या पाल्यांना सावध करणे आपली जवाबदारी आहे.
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!