दिलदार मनाचा माणूस -
पत्रकाराच्या लेखणीतून - विनायक रेकलवार
दिलदार मनाचा माणूस -
संजय मारकवार
काही माणसे कर्तृत्वाने,वक्तृत्वाने,नेतृत्वाने मोठी होतात. त्यांच्या अंगी उपजतच ही कला भिनलेली असते. एकमेंकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांचा मित्रत्वाचा गोतावळा वाढत जातो. ही माणसे आपल्या कुटुंबातीलच एक भासायला लागतात. त्यांचा लोकसंचय हा जणूकाही एकप्रकारे बॅंक बॅलन्सच असतो. अशाच एका दिलदार मनाच्या माणसाचा अपघाती मृत्यू मनाला चटका लावून गेला. तो माणूस म्हणजे कर्तृत्वाने, वक्तृत्वाने आपल्या ओघवत्या वाणीने मोठा झालेला संजय पाटिल मारकवार होय. संजय पाटिल मारकवार म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी,विकासासाठी उभारण्यात आलेल्या वेगवेगळया आंदोलनातील तळमळीचा कार्यकर्ता. आंदोलन कुठलीही असू देत. त्यात संजय मारकवार नेहमी अग्रस्थानी राहायचे. नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात प्रचंड होती. दिवं. संजय मारकवार यांना शेतक-यांविषयी ,विदयार्थ्याविषयी आणि जनतेंविषयी अतिशय तळमळ. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असायची.राजकारणाच्या पलीकडे जावून त्यांनी ख-या अर्थांने लोकसेवा केली.समाजसेवा केली. म्हणूनच त्यांना आग्रहाने लोकनेता म्हणावे लागेल. शेतक-यांच्या प्रश्नाविषयी, त्यांच्या समस्या विषयी त्यांना अतिशय सखोल अभ्यास. त्यांचे या विषयी असलेले भाषण अभ्यास पूर्ण असायचे, पोटतिडकीने ते प्रश्न मांडायचे.. जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते त्याविरूदध आवाज उठवायचे. नुकतेच त्यांनी मूल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जनावरांवर आलेल्या रोगांविषयी पत्रकार परिषद घेवून याची इत्यंभूत माहिती पत्रकारांना दिली. शेतक-यांनी ,पशुवैद्यकीय अधिका-यांनी काय करायला पाहिजे याचे उत्तर संजय मारकवार यांच्या कडे होते. हरणघाट येथील शेती साठी असलेला सिंचनाचा प्रश्न असेल, धान उत्पादकांचा प्रश्न असेल. आसोला मेंढा मुख्य कालव्याची दुरूस्तीचा प्रश्न असेल त्यात सातत्याने शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे संजय मारकवार होते. त्यांचा जुनासूर्ला बेंबाळ हा क्षेत्र होता. पंचायत समितीची निवडणूक ते या क्षेत्रातून लढवायचे. राजगड हे त्यांचे मूळ गाव. दिवं. संजय मारकवार विदयमान पंचायत समितीचे सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. मूल पंचायत समितीचे सभापती पद तसेच बाजार समितीचे सभापती पद त्यांनी निर्विघ्नपणे भूषविले होते.पंचायत समितीच्या आणि बाजार समितीच्या त्यांच्या सभापतीच्या कार्यकाळात बातमींसाठी महत्वपूर्ण माहिती त्यांच्याकडून मिळायची.वेगवेगळया विषयांवर गप्पा गोष्टी रंगायच्या. त्यांच्या दालना मध्ये बसल्यावर चहापाणी नास्ता झाल्याशिवाय राहत नव्हते. पत्रकार परिषद व्हायच्या. त्यांच्या कार्यकाळातील आठवणी या लेखाच्या निमित्ताने जाग्या होतात. नुकतेच त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद चालून आले होते. राजगड,जुनासूर्ला ,बेंबाळच्या अर्थातच मूल तालुक्याच्या पंचक्रोशीत ख्याती मिळवलेल्या संजय मारकवार यांना सहा डिसेंबरला देवाज्ञा झाली. आता फक्त संजय मारकवार यांच्या स्मृती, आठवणी मागे राहिल्या आहेत. संजय मारकवार यांच्या निधनामुळे राजकारण,समाजकारणात एक पोकळी निर्माण झाली.ती पोकळी भरून काढणे कठीण आहे. जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हातात नाही. परंतु या पृथ्वीतलावर पाऊल ठेवल्या नंतर ‘मरावे परी, कीर्ती रूपे उरावे‘ प्रमाणे संजय मारकवार यांचे कार्य होते. लोकहितासाठी तळमळीने कार्य करणारा माणूस गेला, यावर विश्वासच बसत नाही. अशा दिलदार मनाच्या माणसाला भावपूर्ण आदरांजली !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!