जिल्ह्यात ३४ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले

हो 
जिल्ह्यात ३४ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले




चंद्रपुर (प्रतिनिधी) 
नुकतीच आटोपलेली दिवाळी अन त्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीने एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविणाऱ्या चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून मात्र शालेय विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रयोग चालविला जात आहे. १० नोव्हेंबरच्या शासन निर्णयाला आधीन राहून चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने उद्या दि.२३ नोव्हेंबर सोमवार पासून वर्ग ९ ते १२ पर्यंतच्या ६१७ शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काल पर्यंत जवळपास ४३०० शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली त्यात ३४ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अजून काही हजार शिक्षकांच्या तपासण्या होणे बाकी आहे. सरासरी मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर शिक्षकेत्तर कर्मचारी देखील काही ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत. ही पार्श्वभूमी बघता पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे मात्र शिक्षण विभाग आशावादी असून जवळपास ९० टक्के विदयार्थी उपस्थित राहतील असा अंदाज शिक्षण विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या एकूण ६१७ शाळांपैकी अर्ध्या शाळांमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. या बाबत काही शिक्षकांसोबत चर्चा केली असता, त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की,सध्या शाळा सुरू करण्याचा निर्णय हा विदयार्थ्यांना धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली. स्थानिक परिस्थितिचा विचार न करता केवळ वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत, म्हणून आम्ही शाळेत जाऊ आणि शाळा सुरू करणार आहोत, असेही ते म्हणाले. शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे मग शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणीचे काय असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे. हा एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयोग तर नाही ना असेही आता दबक्या आवाजात बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!