उजळू दे गंध शिक्षणाचा.....

पत्रकाराच्या लेखणीतून - विनायक रेकलवार

उजळू दे गंध शिक्षणाचा

कोलंबसाचे गर्वगीत मध्ये कुसुमाग्रजांनी म्हटले आहे, ‘अनंत अमूची ध्येयाशक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.‘ किनारा फक्त समुद्रालाच लाभला आहे. परंतु आमच्या आशा आकांक्षा आभाळाऐवढया अनंत आहेत.आम्हाला  कोणी अडवू शकत  नाही.आमच्या कार्यात कोणी आडकाठी आणू शकत नाही. आम्ही आमच्या   विचारांचे, ध्येयांचे राजे आहोत.  मनात काही तरी करण्याची इच्छा असेल, ध्येय असेल, तर कोणतेही कार्य हे यशोशिखरापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. ‘लाथ मारीन , तिथे पाणी काढीन‘ असे सर्वसामान्य पणे आपल्याकडे काही जण बोलताना  बोलून जातात.हे अतिशोयोक्ती असले तरी बोलणा-या मनात प्रचंड जिदद तयार झालेली असते. स्वप्न बघा आणि ते सत्यात उतरवा. प्रत्येकच स्वप्न सत्यात उतरेल असेही काही नाही. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी जे स्वप्न बघीतले ते त्यांनी पूर्ण करून दाखविले. म्हणून त्यांना चित्रपट सृष्टीतील चित्रपट महर्षी म्हणतात. पहिल्या चित्रपटाची निमिर्ती झाली. असे अनेक उदाहरणे आहेत. जे सत्यात उतरले आहेत. एका गोष्टी पर्यंत सिमीत न राहता त्याही पलीकडे जाऊन आपल्याला हवे ते साध्य करता येते. असेच प्रकारचे कार्य साध्य करण्याचे काम लोमेश मडावी नावाचा कार्यकर्ता करीत आहे. हा कार्यकर्ता दुस-यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी धडपडत आहे.लोमेश मडावी एल्गार प्रतिष्ठानच्या अंतर्गत बाल संस्कार क्रेदात कार्यरत आहे. सदया कोरोनामुळे आठवी र्प्यंत शाळा बंद आहेत.ग्रामीण भागातील मूले टयुशन क्लास मध्ये जावू शकत नाही. किंवा मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेवू शकत नाही.अॅड. कल्याण कुमार यांची ही कल्पना लोमेश मडावीने प्रत्यक्षात साकारली आहे. चंद्रपूर जिल्हयात वीस ते पंचवीस खेडयात हा उपक्रम सुरू आहे. पन्नास खेडयात हा उपक्रम सुरू करण्याचा लोमेशचा भर आहे. शिक्षणापासून दूर जाणा-या विदयार्थ्यांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा उदात्त हेतू  बाल संस्कार केंद्राच्यास माध्यमातून साकारल्या जात आहे.बाल संस्कार केंद्रामध्ये येणारी तिसरी ते आठवी पर्यंतची  मूले ही सर्व शेतकरी , शेतमजूर वर्गातील आहेत. विशेष म्हणजे पालकांच्या समंतीने ही मूल आली आहेत.नेटवर्कची अडचण तर आहे,मुख्य  म्हणजे या वर्गातील पालंकाकडे ,विदयार्थ्यांकडे अॅंड्राईंड मोबाईलची सुविधा नाही.कोरोना काळात शाळा बंद म्हणजे शिक्षण बंद.मग अशा कठिण परिस्थितीत बाल संस्कार केंद्र ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना आधार ठरत आहेत. विशेष म्हणजे कोविड - 19 चे नियम पाळून हे वर्ग भरविले जात आहे. शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे काम संस्था करीत आहे. परिस्थिती कोणतीही असो, विदयार्थी शिकले पाहिजे.आजचे विदयार्थी उदयाचे भविष्य आहेत. हे भविष्य भूतकाळात जाता कामा नये.अर्थात मागे जाता कामा नये. सदैव सैनिका पुढेच जायचे...... अशा रितीने कार्य करण्याचे ध्येय लोमेश बाळगून आहे.या संस्कार केंद्रात पालक आपल्या पाल्याला आवडीने पाठवित आहेत,ही लोमेशच्या कार्याची जमेची पावती आहे. मानधनावर इतर काही गावातीलच उच्च शिक्षित कार्यकर्ते लोमेशच्या मार्गदर्शनाखाली या संस्कार केंद्रात काम करीत आहेत. एल्गार प्रतिष्ठान,बाल संस्कार केंद्र आणि ध्येयवेडया लोमेशच्या कार्याला एक सलाम तर केलाच पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!