जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष

जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष


सचिन वाकडे मुल

31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून नागरिकांना रोखण्याचा हा दिवस.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनाची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेच्या ;डब्ल्यूएचओच्या वतीने 31 मे 1987 साली करण्यात आली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून होणारे रोग या संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
          तंबाखू सेवनाने भारतात लाखो लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टिबी यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते. तंबाखू हे निकोटियाना प्रजातीच्या वनस्पतीच्या पानांपासून बनविण्यात येते. तंबाखूचे पीक जगभरात उपलब्ध असून त्याला उत्तम मागणी आहे. निकोटीन हा तंबाखूमधील एक प्रमुख घटक आहे.
                    तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन चीन मध्ये घेण्यात येते तर त्याखालोखाल ब्राझील आणि भारताचा क्रमांक येते. भारतात आंध्रप्रदेश, बिहार, आसाम, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि पश्चिमबंगाल या राज्यांमध्ये तंबाखूचे पीक घेतले जाते. तमिळनाडु, आंध्र प्रदेश, पंजाब, बिहार, म्हैसूर आणि पश्चिम बंगालमध्ये तंबाखू संशोधन केंद्रे आहेत.
                    केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 मीटर परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे अनिवार्य आहे. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
          तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच होणे आवश्यक आहे. व्यसनापासून कोसो दुर राहण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. देशातील केंद्र सरकारने 19 मे  2003 च्या राजपत्राद्वारे सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहीरात, प्रतिबंध व व्यापार, वाजीज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन कायदा,  2003 (COTPA) संपूर्ण देशभरात लागू केला आहे. सदर अधिनीयम 1 मे 2004 पासून अमलात आलेला आहे.

कोटपा 2003 कायदा
सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने, जाहिरात, व्यापार विनिमय, पुरवठा व वितरण प्रतिबंधक कायदा म्हणजेच कोटपा. 2003 कायदा होय. हा केंद्र सरकारचा कायदा असून 2003 पासून या कायद्याने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. या कायद्यात पाच महत्त्वाची कलमे असून, प्रत्येक कलमानुसार कारवाई झाल्यास तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर मोठा अंकुश निर्माण होऊ शकतो.

आपली जबाबदारी
व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून दुर करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आसून आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल यात तिळमात्र शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!