ग्रामगीता महोत्सव चितेगाव येथे संपन्न
वृत्त .....
तीन दिवसीय ग्रामगीता महोत्सवाचा समारोप ....
राष्ट्रविकासाचा मार्ग ग्रामोन्नतीतून शक्य - चेन्नईचे ज्येष्ठ पत्रकार डाॕ.विकास पाठक
चितेगाव (प्रतिनिधी )-
जगात सर्वप्रथम गाव तयार झाले त्यानंतर शेतीकामाचा विकास झाला.नंतर शहरी फुगली.गावसंस्कृती मूळ आहे.म्हणून ग्रामविकासातून राष्ट्रविकासाचे स्वप्न राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज पाहिले होते . पर्यावरण कायम टिकवून राष्ट्रसंताच्या ग्रामगीता ग्रंथाप्रमाणे निस्वार्थपणे कृती व्हायला हवी , असे प्रतिपादन चेन्नई चे ज्येष्ठ पत्रकार डाॕ. विकास पाठक यांनी चितेगाव येथे केले. पहिल्या ग्रामगीता महोत्सवाचा समारोप त्यांच्या भाषणाने झाला. याप्रसंगी ॲड. पारोमिता गोस्वामी , डाॕ. कल्याणकुमार , विजय सिध्दावार उपस्थित होते . डाॕ. कल्याणकुमार यांनी महोत्सवाची भूमिका मांडून सहभागी मंडळाचे कौतुक केले.
महोत्सवाच्या आदल्या दिवशी झालेल्या ग्रामगीता आणि आजचे शिक्षण या परिसंवादात सेवानिवृत्त अधिकारी प्रभू राजगडकर यांनी
मराठी शाळा बंद होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद न होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अपेक्षित शिक्षण प्रणाली नुसार कार्य व्हावे. ग्रामगीता प्रचारक रुपचंद दखणे आणि आम्ही आमच्या आरोग्यासाठीच्या संचालिका शुभदा देशमुख यांनी ग्रामगीता आणि ग्रामीण आरोग्य या विषयावर विचार मांडले .
शुभदा देशमुख त्या म्हणाल्या , वैयक्तिक आरोग्य, कौटुंबिक आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य जोपासण्याची आज मोठी गरज आहे. सांयकाळी चितेगाव च्या मुख्य चौकात सप्तखंजेरीवादक उदयपाल महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शविली होती . विजय सिध्दावार यांनी आभार मानले.
व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या स्मृती वर्षाच्यानिमित्ताने चितेगाव येथे पहिल्या ग्रामगीता महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . श्रमिक एल्गार प्रतिष्ठान चितेगाव मध्ये आयोजित या महोत्सवाच्या प्रसंगी आयोजक ॲड. पारोमिता गोस्वामी, श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, स्वागताध्यक्ष डाॕ. कल्याणकुमार, कवी सुखदेव चौथाले, कीर्तनकार शरद सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती .
ग्रामगीता महोत्सव चितेगावात सुरू होणे ही ऐतिहासिक घटना असून अशक्य वाटणारी गोष्ट चंद्रपूर जिल्ह्यात दारूचे दुकान बंद होतील, हे कुणालाही स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र ते कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कृपेने आणि विचारांने झाले, असे विजय सिध्दावार म्हणाले. स्वागताध्यक्ष डाॕ. कल्याणकुमार म्हणाले , राष्ट्रसंताचे साहित्य सर्वव्यापी तसेच जागतिक दर्जाचे असून राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रभक्तीवर विशेषतः जास्त जोर दिला. नव्या पिढी पर्यंत हे पुरोगामी विचार गेले पाहिजेत. ॲड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या , राष्ट्रसंताच्या शब्दांत जी मोठी ताकद आहे त्याची अनुभूती विविध आंदोलनात आम्हाला दिसून आली. म्हणूनच श्रमिक एल्गारच्या वतीने राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार प्रसार सातत्याने सुरू आहे.
कार्यक्रमाध्यक्ष बोढेकर म्हणाले , ग्रामगीता हा ग्रंथ म्हणजे राष्ट्रसंताच्या दीर्घ तपस्येचे व लोकसेवेचा शाश्वत विचार आहे. ग्रामाच्या जडणघडणीसाठी लिहिला गेलेला हा परिवर्तनवादी ग्रंथ असून अलिकडे ग्रामजीवनात आलेली अवकळा घालविण्यासाठी ग्रामगीता तत्त्व विचारांची कास धरावी लागेल. समूहजीवनाला मूल्यत्व प्रदान करण्याचे कार्य ह्या ग्रंथातून झालेले आहे. समाजोध्दाराची तळमळ लागलेल्या व्यक्तीला अचूक मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य ग्रामगीतेत आहे, असे ते म्हणाले . सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले तर आभार सुखदेव चौथाले यांनी मानले. उदघाटन सत्रानंतर सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. प्रार्थनेवर चिंतन शरद सहारे यांनी प्रस्तुत केले. रात्री खंजरी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
...






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!