विशालचे काय चुकले?
विशालचे काय चुकले?
मुंबईस्थित महाराष्ट्र विधीमंडळात गेलात तर दर्शनी भागात एक फलक दृष्टीस पडतो. अतिशय विद्वान आणि गोरगरिबांविषयी आत्मीयता असलेले स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ बॅरिस्टर नाथ पै यांची सुवचने त्यावर लिहली आहेत. त्यातीलच एका सुवचनात बॅरिस्टर नाथ पै म्हणतात की, 'तुम्ही ग्रामस्थ, तुम्ही गावकरी मंडळी, तुमच्यापर्यंत सत्य पोहोचत असले पाहिजे. परंतु अनेक गावकरी वर्तमानपत्र विकत घेऊ शकत नाहीत. काही बिचारे वाचू शकत नाहीत. त्यांना हे सारे कळत नाही आणि त्यांच्या मनात हा प्रश्न येतो की त्यांना आम्ही एवढ्या प्रेमाने लाखमोलाचे आमचे मतदान देऊन निवडून दिले, हे आमचे नेते आमच्या करता करतात काय? आमच्या करता झगडत का आणि हा तुमचा प्रश्न योग्य आहे, रास्त आहे. तुम्ही आम्हाला असेच विचारले पाहिजे. आमचे पुढारी काय करत आहेत, असा प्रश्न जोपर्यंत तुमच्या मनामध्ये येत राहील. तोपर्यंत आमची लोकशाही जिवंत राहणार आहे.'
हीच लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अनेकजण धडपडत आहेत. काही तरुण पिढीही पुढे येत आहेत. आमचे नेते आमच्या साठी करतात काय? असा सहज प्रश्न अवघ्या २३ वर्षीय विशालला पडला. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चारगांव येथील तो रहिवाशी. त्याच्या गावी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सभा झाली. शासकीय लेटरपॅडवर हा दौरा जाहीर झाला होता. म्हणजेच हा दौरा तसा शासकीयच म्हणावा लागेल! चारगांवच्या सभेत विजय वडेट्टीवार यांचे भाषण सुरु झाले. मात्र, वडेट्टीवार यांनी आपण केलेल्या विकास कामावर काहीही न बोलता, एल्गारबाई काय करते? कोणते कामे करते? लोकांकडून पैसे खाते? किती लोकांना पट्टे दिले? किती लोकांना घरकुल दिले? असे प्रश्न करीत भाषण सुरू केले. यावर तेथे उपस्थित असलेल्या या विशाल नर्मलवार याने, "एल्गारबाई नाही, एल्गारताई म्हणा, आणि तीने काय केले नाही, हे सांगण्याऐवजी तुम्ही काय केले? तुम्ही काय करणार? चारगांवचा पुल न केल्यांने यावर्षी चारवेळा पाच-पाच दिवस रस्ता बंद होता, यावर बोला" असे बिनधास्तपणे म्हटले. विशाल हा देशाचा नागरिक आहे. शिक्षित तरुण आहे. मतदार आहे. त्याला लोकप्रतिनिधीला जाब विचारण्याचा अधिकार आहे. असे असताना तरुणाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी वडेट्टीवार भडकले. विशालला शिव्या घालीत, "तु काय सांगतेस आजचा पोरगा. अबे चूप्प! आताचा पोरगा शिकतोस का, पाच हजारासाठी हिंडणारे तुम्ही कुत्रे," असे म्हणत, "धरा रे याला...." पोलिसांना आदेश दिले. पोलिसांना सांगून त्याला तेथून उचलून न्यायला लावले. ही माहिती खरी असेल तर...!
आता प्रश्न असा आहे, विशालचे काय चुकले? वडेट्टीवार म्हणतात कि, एल्गारबाईने पट्टे दिले काय? घरकुल दिले काय? विजय वडेट्टीवारांना ठावूक नाही काय? एल्गार बाई म्हणजे, पारोमिता गोस्वामी या कोणत्याही शासकीय पदावर नाही, ती काही सरकार नाही मग ती पट्टे कशी देणार? घरकुल कशी देणार? उलट वडेट्टीवार हे सरकारमध्ये मंत्री होते, आता कॅबीनेट मंत्रीचा दर्जा आहे. आमदार आहेत, म्हणजे सरकारी पदे त्यांचेकडे आहेत. घरकुल आणि पट्टे देण्यांची जबाबदारी त्यांची. मात्र कामे गोस्वामी यांनी केली नाही, हे सांगणे म्हणजे नवलच नाही काय?
वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे कि, एल्गारबाई, पाच-पाच हजार रूपये घेते, आंगावर सोने लावून फिरते...पट्टे देत नाही.. कुणाकडून पाच हजार घेतले, याचे ते उदाहरण ते देतील काय? विजय वडेट्टीवार हे मंत्री होते, त्यांनी जर त्यांचे कार्यकाळात पट्टे मिळवून दिले असते तर, लोक आता पारोमिता गोस्वामीकडे कशाला आले असते? उलट पट्टे न मिळण्यास कारणीभूत असलेली तीन पिढयाची अट ही काँग्रेसने केलेल्या 2006 च्या कायद्यात आहे. ती अडचणीची ठरत आहे, याची जाणीव वडेट्टीवारांना आहे काय? याच कायद्यामुळे एकाच दिवशी ब्रम्हपुरी तालुक्यातील 2000 अतिक्रमणदारांचे दावे चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांनी एकाच दिवशी अपात्र केले, त्यांवर विजय वडेट्टीवार यांनी या शेतकर्यांना कोणती आणि कशी मदत केली? उलट हे शेतकरी श्रमिक एल्गारकडे आल्यानंतर, त्यांचे प्रत्येकांची वैयक्तीक अपिल तयार करून, त्यावर जिल्हाधिकारी यांनी पुर्नविलोकन करावे अशी मागणी केली आणि या शेतकर्यांचे ताबे कायम ठेवण्यास मदत केली, याची माहीती कदाचित या विरोधी पक्ष नेत्याला नसावी.
जी कामे सरकार म्हणून, आमदार म्हणून वडेट्टीवार यांनी करायला पाहीजे ती कामे एल्गारबाई केली काय? अशा बाळबोध प्रश्नावर जर गावातील एक सामान्य दुध विकणार्यांचा मुलगा प्रश्न विचारल्यावर ते श्रमिक एल्गारमध्ये पाच हजार रूपये मानधन घेवून काम करतो, म्हणून पाच हजाराचा कुत्रा असे संबोधणे हे अशोभनीय आहे. पोटासाठी काम करून पैसे कमाविणार्या तरुणाला, मुलांच्या वयातील युवकाला अशा शब्दात बोलताना वडेट्टीवार यांना लाज कशी वाटली नाही? मग, हाच न्याय लावून महाराष्ट्र शासनाकडून दोन लाख रूपये महिना घेऊन लोकप्रतिनिधी म्हणविणार्या या नेत्याला कोणत्या प्राण्याची उपमा द्यावी, हे आता ध्यानात घ्यावे. मतदाराचा अवमान आता जनता खपवून घेणार नाही. विशाल हा फक्त श्रमिक एल्गारचा कार्यकर्ता नाही तर तो मतदारही आहे. आणि लोकशाहीत लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा मतदाराला अधिकारही आहे!
- विजय सिध्दावार



Ashobhniy
उत्तर द्याहटवा