दीडशे व्या गांधी जयंती निमित्ताने नशाबंदी मंडळाचे प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन
दीडशे व्या गांधी जयंती निमित्ताने नशाबंदी मंडळाचे प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन
गडचिरोली (प्रतिनिधी ) - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने सत्तराव्या व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन गडचिरोली शहरात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र जिल्हा शाखा गडचिरोली आणि वेदांती व्यसनमुक्ती सल्ला उपचार व पुनर्वसन केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. शहरातील विविध शाळा महाविद्यालय, सामाजिक संघटनेच्या सहकार्याने व्यसनमुक्तीपर प्रबोधन व पोस्टर प्रदर्शनीचेही आयोजन केलेले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन दोन ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता व्यसन विरोधी तसेच प्लास्टिक मुक्ती जागर पदयात्रा काढण्यात येईल. यावेळी व्यसन विरोधी पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते होईल. जागर पदयात्रा नगरपरिषद ते इंदिरा चौक परत नगरपरिषद या मार्गाने निघेल. या सप्ताहाचे उद्घाटन समाजसेवी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे हस्ते होईल अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओव्हाळ असणार आहे याप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. तीन ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता व्यसन विरोधी प्रबोधनपर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्थानिक महिला महाविद्यालयात होत असलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव न्या. डी. जे. कांबळे यांचे हस्ते होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॕ. हंसा तोमर राहणार आहे. तसेच ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, जिल्हा रुग्णालयाचे मीना दिवटे, वर्षा मनवर, अर्चना चौधरी प्रेमिला अलोने आदींची उपस्थिती राहणार आहे. चार ऑक्टोबरला कृषी महाविद्यालयात व्यसनविरोधी युवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या प्रसंगी पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन डॉ.एस .बी. अमरशेट्टीवार यांचे हस्ते होईल. प्रमुख वक्ते म्हणून डाॕ. कुंभारे, सुरेश पेंदाम, बंडोपंत बोढेकर, दिनेश खोरगडे आदी विचार व्यक्त करणार आहे.
दि.५ आक्टोबरला सकाळी व्यसनविरोधी जागर पदयात्रा व व्यसनमुक्ती संकल्प प्रबोधन संमेलन जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेत घेतले जाईल. तसेच सहा ऑक्टोबरला सायंकाळी श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिर रामनगर शाखा येथे रचनात्मक कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे. याप्रसंगी सुरेश मांडवगडे, विलास निंबोरकर, केशवराव दशमुखे यांची उपस्थिती राहणार आहे. वाकडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे हे व्यसन विरोधी जागर पदयात्रा व व्यसनमुक्ती विचार प्रबोधन संमेलन सात आक्टोबरला आयोजित केलेले आहे. याप्रसंगी सरपंच चरणदास बोरकुटे, डाॕ. कुंभारे, पंडित पुडके, वाय. बी. शेंडे, मिना दिवटे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.तर ९ ऑक्टोबर बुधवारला या व्यसनमुक्ती सप्ताहाची सांगता शासकीय इंग्रजी आदिवासी आश्रम शाळा गडचिरोली येथे होईल. अध्यक्षस्थानी व्ही. एस. राचेलवार असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, ग्रंथमित्र प्राचार्य भाऊराव पत्रे, माजी प्राचार्य जगदीश मस्के, वेदांती व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प संचालक मिलिंद डोंगरे, मुख्याध्यापक शिंदे, जिल्हा रूग्णालयाचे मीना दिवटे आदींची उपस्थिती राहणार आहे. या सप्ताहातील संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा संघटक संदीप कटकुरवार, वेदांती व्यसनमुक्ती केंद्राचे कु. वाघमारे ,कु. शेख, वासनिक, मेश्राम तसेच नगर परिषद विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, मराठी विषय विभाग, महिला मंडळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सायकल स्नेही मंडळ आदींच्या सहकार्याने होत असून ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या अभियानात सहभागी व्हावे अशी विनंती नशाबंदी मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!