दारूबंदीवर सर्व धर्मांचे एकमत

जगातील सर्व धर्मानी दारूबंदीचा कसा पुरस्कार केला आहे यावर आज मी agroone या दैनिकात विविध संतांच्या वचनासह लेख लिहिला आहे ,आपल्यालाही ही संत वचने व्यसनमुक्तीच्या प्रसारात उपयुक्त ठरतील 
हेरंब कुलकर्णी
------------------------------------
दारूबंदीवर सर्व धर्मांचे एकमत
राजकीय पक्षांपेक्षा दारूबंदीवर सर्वांत मोठे एकमत आहे. जगातील सर्व धर्मांचे आणि धर्मसुधारकांचे. प्रसंगी अगदी एकमेकाशी ज्या धर्मांच्या अनुयायात मतभेद आहेत. अशा धर्मातही दारूबंदीच्या उपदेशात मात्र खूप खूप सारखेपणा आहे. 
जयललिता मुख्यमंत्री झाल्या. शपथ घेताच त्यांनी ५०० दारूची दुकाने बंद करून टाकली. दारूच्या दुकानांची वेळ मर्यादित करून टाकली. नितीशकुमार यांच्या पाठोपाठ दारूबंदीचा पाठपुरावा करणाऱ्या मोठ्या राज्याच्या त्या दुसऱ्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत, तेव्हा भारतभर दारूबंदी हा राजकीय अजेंडा इथून पुढे होत जाणार हे स्पष्टपणे दिसते आहे. राजकीय पक्षांचे कितीही मतभेद असले तरी ते दारूबंदीवर एकमत होऊ लागले आहे. राजकीय पक्षांपेक्षा दारूबंदीवर सर्वांत मोठे एकमत आहे. जगातील सर्व धर्मांचे आणि धर्मसुधारकांचे. प्रसंगी अगदी एकमेकाशी ज्या धर्मांच्या अनुयायात मतभेद आहेत. अशा धर्मात ही दारूबंदीच्या उपदेशात मात्र खूप खूप सारखेपणा आहे.
एकेकाळी सर्व जगभर पसरलेला बौद्ध धर्म; पण या धर्माने त्या काळात पाप पुण्याची कल्पना मांडताना त्यात पापाच्या यादीत मादक पदार्थ सेवन घेतले आहे. विपश्यनेत बुद्ध अखंड जागरूकता शिकवतात. जागरूकता गमावण्याला बुद्ध पाप मानतात, तेव्हा जागरूकता म्हणजे पुण्य आणि ती गमावण्याला ते पाप मानतात.
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘जो नशिले पदार्थो का सेवन करता है, वह घोर पाप करता है ।।
मुस्लिम धर्मातही दारूचा निषेध करण्यात आला आहे. या धर्मात दारू निषिद्ध असल्याने सामाजिक जीवनात अगदी स्पष्टपणे फरक जाणवतो. कितीही गरीब मुसलमान असेल, तो झोपडपट्टीत राहत असेल तरी तो दारूपासून दूर असतो, हा फरक मात्र जाणवतो. अर्थात सगळेच नसतील; पण एकूण मुस्लिमात दारू पिण्याचे प्रमाण कमी दिसते. धर्म व्यसनमुक्तीचे काम किती प्रभावीपणे करू शकतो, हे या निमित्ताने लक्षात येते. याबाबत शोध घेतला असता पुढील आज्ञा लक्षात आली.
हजरत मुहम्मद यांच्या आज्ञेप्रमाणे, ‘‘अल्लाह ने लानत फरमाई है शराब पर, पीने और पिलाने वाले पर, बेचने और खरीदने वाले पर और किसी भी प्रकार से सहयोग देणे वाले पर.’’
इतक्या स्पष्ट शब्दांत त्यांनी आज्ञा दिलेली आहे.
जगभर पसरलेल्या ख्रिस्ताच्या धर्मानेही अाध्यात्मिक होण्याची महत्त्वाची अट म्हणून व्यसनमुक्त असणे मानले आहे. परमेश्वराचे गुण जर तुम्हाला तुमच्यात यावेत, असे वाटत असेल तर कधीही दारू प्यायची नाही, इतक्या स्पष्टपणे येशू आपल्या अनुयायांना बजावतात.
येशू यांनी म्हटले आहे, ‘‘तू यह जान ले की मद्यपान तू नही करेगा और इस प्रकार परमपिता परमात्मा के गुणो को अपने मे अवतारित करेगा’’।
जैन धर्मात तर दारू पिणाऱ्यांची आणि मांसाहार करणाऱ्यांची संख्याच दिसत नाही, इतके कठोर पालन आपल्याला आढळून येते. त्याचे कारण शोधताना भगवान महावीर यांचा प्रभाव लक्षात येतो. ते म्हणतात, की
‘‘सब बुराईयो की जड अविवेक है और अविवेक की जड मद्यपान है’’।
म्हणजे महावीरांचे म्हणणे असे की सर्व अविद्या आणि वाईटपणाचे मूळ दारू मध्ये आहे. दारूमुळे विवेक नष्ट होतो आणि विवेक नष्ट झालेल्या व्यक्तीकडून कोणतेही वाईट कृत्य होऊ शकते, असा निष्कर्ष आहे. आज अनेक गुन्हे घडताना आरोपीने मद्यपान केले होते, असे स्पष्टपणे बातम्यात जाणवते. विवेक शाबूत ठेवायला व्यसनमुक्त समाज महत्त्वाचा व गरजेचा आहे, हे महावीर वाणीत स्पष्टपणे सांगितले आहे.
शीख धर्माचे गुरू गुरुनानक देव यांनीही व्यसनमुक्तीचा संदेश त्यांच्या गुरुबाणीत दिला आहे. ते म्हणतात, की तुमची बुद्धी भ्रष्ट होईल, असे कोणतेही पेय तुम्ही सेवन करू नका. असे पेय घेतल्याने तुम्हाला पोटाचा विकार होईल व आपले व परके समजण्याचा विवेक ही तुम्ही गमावून बसाल.
गुरूनानक म्हणतात, ‘‘ऐसे पेय सेवन मत करो जिसके कारण बुद्धी भ्रष्ट हो जाए, उदर मे विकार उत्पन्न हो आपणे और पराये मे भेद न जान सके और मालिक से धक्के खाये’’।
हिंदू धर्मात तर कोणत्याही संतांचे अभंग आपण काढले, तर आपल्याला व्यसनमुक्तीचा उपदेश पानापानांवर दिसू लागतो. संत कबीर हे आपल्या वाणीने उपदेश करताना व्यसनमुक्तीचा उपदेश करतात.
संत कबीर म्हणतात, ‘‘अवगुण कडू शराब का आप अहमक होय. मानुष से पशूआ करे दाम गाठ से खोय’’।
माणसाचा पशू करण्याचे सामर्थ्य या दारू मध्ये आहे, इतक्या भेदकपणे कबीर सांगतात.
संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘मद्यपानी सुराणी नवनीता न पुसे कोणी केळवल्या व्याभिचारिणी दैन्यवानी पतिव्रता.’’
अर्थात लोण्याला कुणी विचारत नाही; पण दारूला मात्र मागणी असते. जसे व्याभिचारी स्त्री दागिणे घालते; परंतु पतिव्रता गरीब राहते.
संत रविदास यांनीही दारूपेक्षा अध्यात्माचा महारस सेवन करावा, असा उपदेश केला आहे. ते म्हणतात,
‘‘मदिरा का पिजीए जो चढे - चढे उतराया।
नाव महारस पिजीए जो चढे - नाही उतराय।।
एकूणच सर्व धर्मांनी माणसांना व्यसनमुक्त ठेवण्यात खूप मोठे योगदान दिले आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञ असले पाहिजे.
- ९२७०९४७९७१