बिहारमध्ये एप्रिलपासून दारूबंदी

महिलांनी उघडलेली मोहिम  कौतुकास्पद

पाटणा,२६ नोव्हेंबर- नुकतेच बिहारमध्ये नव्याने मुख्यमंत्री झालेले नितीशकुमार यांनी राज्यात १ एप्रिल २०१६ पासून दारूबंदी करण्यात येण्याचे संकेत दिले आहे. या दारूबंदीमुळे बिहार सरकारला ४ हजार कोटी रूपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. मात्र हा फटका भरून काढण्यासाठी विविध योजना आखल्या जातील, असे नितीशकुमार यांनी सांगितले आहे. दारूबंदी दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी नितीशकुमार यांनी राज्यात दारूबंदीची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाला असून गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे राज्यात १ एप्रिल २०१६ पासून दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यात दारूबंदीसाठी महिलांनी जी मोहिम उघडलेली आहे ती कौतुकास्पद आहे. दरम्यान, दारूबंदीवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व अधिकार्‍यांना आदेश देण्यात आले आहेत.