जामणी पुनर्वसनग्रस्तांचा मोबदल्यासाठी संघर्ष सुरूच!
शेतीचा लाभ आणि १८ वर्षांवरील मुला-मुली पुनर्वसनाच्या लाभापासून वंचित; प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांचे ताडोबा प्रशासनाला निवेदन
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून जामणी गावाचे पुनर्वसन होऊन अनेक वर्षे उलटली असली, तरी पुनर्वसनग्रस्तांच्या समस्या अद्याप कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. सन २००८ ते २०१२ या कालावधीत जामणी गावाचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले. मात्र, गावातील पुनर्वसनग्रस्तांना अद्याप शेतीचा लाभ मिळालेला नाही. तसेच गावातील १८ वर्षांवरील मुला-मुलींनाही पुनर्वसनाचा लाभ मिळाला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होऊन अनेक वर्षे लोटल्यानंतरही मूलभूत हक्क आणि पुनर्वसनाशी संबंधित लाभ प्रलंबित असल्याचा मुद्दा ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. याशिवाय गावातील काही समस्या अद्याप निकाली न निघाल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथील उपसंचालकांकडे निवेदन सादर केले. जामणी येथील पुनर्वसनग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गावात बैठक आयोजित करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
गावात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
जामणी येथील पुनर्वसनग्रस्तांच्या समस्या समजून घेण्यासाठी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात प्रत्यक्ष उपस्थित राहून ग्रामस्थांशी चर्चा करावी. शेतीच्या लाभाचा प्रश्न, १८ वर्षांवरील मुला-मुलींच्या पुनर्वसन लाभाचा प्रश्न तसेच गावातील इतर प्रलंबित समस्या यावर सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पुनर्वसनग्रस्तांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
पुनर्वसनग्रस्तांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष लागले
पुनर्वसनानंतरही लाभांपासून वंचित राहिल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात असल्याने आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे जामणी येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे. गावात बैठक आयोजित करून संबंधित प्रश्नांवर तोडगा काढला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यावेळी उपस्थित नागरिक : कैलास आलाम, निलकंठ रायसिडाम, मंगलदास मडावी, किशोर पोहीनकर, विठोबा मडावी, निखील कोयचाडे, दामोजी सिडाम, जीवन सिडाम, इंदरशहा मडावी, प्रमोद धारणे, गणेश पेंदाम आदी नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!