सुरक्षा नियमांची आठवण करून दिल्याचा राग; पत्रकारास अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी - बल्लारपूरमध्ये खळबळ
सुरक्षा नियमांची आठवण करून दिल्याचा राग; पत्रकारास अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी - बल्लारपूरमध्ये खळबळ
बल्लारपूर :- सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने कामगारांना सुरक्षा साधने वापरण्याची साधी सूचना दिल्याचा राग मनात धरून एका पत्रकारास भर रस्त्यात अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर व चिंताजनक घटना बल्लारपूर शहरात उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरातील पत्रकार व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रविंद्र नगर वार्ड, बल्लारपूर येथील रहिवासी तथा पत्रकार रमेश शितलप्रसाद निशाद (वय ४९) यांनी या प्रकरणी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास ते आपल्या मित्रा सोबत इम्प्लिकेट गार्डन, वनविकास महामंडळच्या कार्यालयाचा मागील परिसरात सकाळी फिरण्यासाठी गेले होते.
त्यावेळी काही लोक ओव्हरलोड ट्रकमधून कोणतीही सुरक्षा साधने न वापरता अत्यंत धोकादायक परिस्थितीत लाकूड उतरवत होते. कामगारांनी डोक्यावर हेल्मेट, पायात बूट व इतर आवश्यक सुरक्षा उपकरणे न घातल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याचे लक्षात आणून देत पत्रकार निशाद यांनी त्यांना सुरक्षा साधने वापरण्याची सूचना केली. मात्र, या सूचनेचा राग आल्याने तेथे उपस्थित असलेल्या आरोपी अवदेश यादव याने “हाच तो पत्रकार आहे, याने याआधी आमच्याविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या,” असे म्हणत इतर लोकांना एकत्र केले. त्यानंतर पत्रकाराशी वाद घालत त्यांना अत्यंत अश्लील व अपमानास्पद शब्दांत शिवीगाळ करण्यात आली. एवढ्यावर न थांबता “येथे व्हिडीओ काढायचे नाही, पुन्हा येथे दिसलास तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे आपल्याला जीविताचा गंभीर धोका निर्माण झाल्याचे सांगत पत्रकार रमेश निशाद यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठून तात्काळ तक्रार दाखल केला. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ व ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे करीत आहेत. पत्रकाराच्या जीविताला धमकी देण्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!