झाडीपट्टी रंगभूमीवरील कलाव्रतींचा संघर्ष.

मराठी रंगभूमी दिनानिमित्त...
लोकशाही वार्ता 2022 च्या 'लोकदीप' दिवाळी अंकातून साभार...

झाडीपट्टी रंगभूमीवरील कलाव्रतींचा संघर्ष.
     
       चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये दिडशे वर्शांची नाट्यपरंपरा आहे. हे चारही जिल्हे जंगलव्याप्त असल्याने नैसर्गिकरित्या तयार झालेल्या ह्या बेल्टला झाडीपट्टी असे नाव पडले आहे. हे नाव सुप्रसिद्ध बांबूचित्रशैलीचे जनक तथा नाट्य समीक्षक स्व. धनंजय नाकाडे. यांनी दिल्याचे कळते. झाडीपट्टी धान (तांदूळ) आणि जंगलासाठी जसे प्रसिद्ध आहे तसेच येथील नाटकांसाठीही प्रसिद्ध आहे. किंबहुना झाडीपट्टी, नाटक आणि बैलांचा शंकरपट ह्यांचं अतूट नातं आहे. या परिसरातील लोक नाटक उत्सव म्हणून साजरा करतात. भारतीय समाजामध्ये  तेथील पारंपारिक सणांना जितकं महत्त्व असते तितकंच महत्व येथील नाटकांना असते. नाटक हे केवळ मनोरंज नसून ही येथील लोकांची जीवनशैली आहे.
झाडीपट्टीत दंडार ह्या लोककला प्रकारापासून प्रारंभ झालेले नाटक पहाता पाहता आज दीडशे वर्षाचे झाले. मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांपासून ते आजच्या व्यावसायिक नाटकांपर्यंतचा झाडीपट्टीचा प्रवास थक्क करणारा आहे. गेल्या चाळीस वर्षात ह्या हौशी रंगभूमीने व्यावसायिक रुप धारण केले आहे. परिणामतः नाटकांच्या संचांची संख्या चारपटीने वाढली .कलावंतांची संख्या हजारोंच्या घरात पोचली तर लेखकांची संख्या शेकडोत.
     गडचिरोली जिल्यातील वडसा देसाईगंज हे शहर झाडीपट्टीच्या नाटकांचे करोडो रुपयांची उलाढाल करणारे मध्यवर्ती आणि महत्वाचे ठिकाण म्हणून नावारूपाला आले आहे. याच शहरातून आता नव्या कलावंतांचा नाट्यप्रवास सुरू होतो तर जेष्ठांचा इतिहासही सांगितला जातो. झाडीपट्टी रंगभूमीवरील प्रवासाचे बरे वाईट दिवस, संघर्ष आणि यशाची गाथा सांगणारे शेकडो कलावन्त ह्या शहरात भेटतात तेव्हा खरी झाडीपट्टी कळते. 
विदर्भातील छोट्या छोट्या गावांमधून कलावन्त या शहरात येतात आणि आपले भाग्य अजमावतात. प्रचंड संघर्ष करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. थोडक्यात म्हणजे पुण्या मुंबईच्या नाट्य आणि सिने जगताप्रमाणेच इथल्याही कलावंतांचा कलाप्रवास आहे असे म्हणायला हरकत नाही. अशाच तीन कलाव्रतींचा संघर्ष या लेखांतून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.

वर्षा गुप्ते :-
       चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या शहरात जन्मलेली वर्षा आज पूर्णवेळ नाटकांत काम करीत असली तरी कलावंतांच्या आयुष्यात असलेला संघर्ष तिच्याही वाट्याला आला आहे. जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या वर्षाच्या आयुष्यात आई वडिलांचं सुख नाही. ती तीन वर्षाची असतानाच वडील वारले. वडील तेव्हा गाड्या दुरुस्तीचं काम करायचे. अकाली निधन झाल्याचे दुःख आई पचवू शकली नाही. आई मानसिक रुग्ण झाली, वेड्यागत वागायला लागली. त्यामुळे ह्या दुहेरी दुःखाचा सामना वर्षाला करावा लागला. दोन बहिणी आणि वेडसर आई यांच्यासमवेत वर्षाचा कौटुंबिक संघर्ष सुरू होता. बालपणापासूनच वर्षाला नृत्याचं वेड होतं. वयाच्या चौदाव्या वर्षी तिने शाळेच्या स्नेहसंमेलनात 'रेकॉर्डिंग डान्स' केला आणि ती पट्टीची नृत्यांगना असल्याची चुणूक सर्वांना लागली. मात्र आई आणि नातेवाहिक यांच्या विरोधामुळे तिला नृत्याचे प्रशिक्षण आणि सादरीकरण करता आले नाही. पण नृत्याची आवड तिला स्वस्थ बसू देत न्हवती आणि घरचे स्वतःची मानसिकता बदलायला तयार न्हवते. अशावेळी घरच्यांची नजर चुकवून प्रसंगी गुपचूप पळून जाऊन तिने आपली नृत्याची हौस भागविली. नृत्याच्या पंचवीस रुपयांच्या मानधनापासून तिने आपल्या कामाची सुरुवात केली. व्यावसायिक नाटकांच्या अंकांच्या मध्ये नृत्य करण्याची संधी तिला झाडीपट्टीतील गायक कलावन्त अमरकुमार मसराम यांनी सर्वप्रथम दिली. त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने वर्षाचा व्यावसायिक नाटकांमध्ये प्रवेश झाला असल्याचे ती सांगते. नाट्यशास्त्रचं कुठलंही शिक्षण न घेतलेली वर्षा आज लाखो चाहत्यांची पहिली पसंद आहे. १९९६ साली वडसा येथील गणी भैय्यांच्या नाट्यसंस्थेत तिने सर्वप्रथम काम केले.  कॉलेज कुमारिकेपासून चरित्र अभिनेत्री पर्यंत आणि नकारात्मक भूमिकेपासून लावणी नृत्यांगणापर्यंत सर्व भूमिका तिने लीलया साकारल्या. माझं घर माझी माणसं, सुनबाई जरा जपून, आई तुझाच आशीर्वाद, कुंकू माझं सौभाग्य तुझं, बलिदान इत्यादी नाटकांतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. झाडीपट्टीतीतील प्रतिथयश कलावन्त शबाना खान, रागिणी बिडकर, ज्ञानेश्वरी कापगते,देवेंद्र दोडके, हिरालाल पेंटर यांना ती आपले आदर्श मानते. सिने कलावन्त देवेंद्र दोडके, मधू जोशी, मीनाताई देशपांडे, अर्चना कुबेर, वत्सला पोलकमवार,शोभा जोगदेव यांच्यासोबत तिने अनेक नाटकांमधून भूमिका केल्या.
         २००७ साली सोहन शुक्ला या नाट्यकलावंताशी वर्षाने लग्न केलं. दोघांनीही एकच व्यवसाय स्वीकारला.  कष्ट केले. सुंदर संसाराचे, सुंदर घराचे स्वप्न बघितले. ते पूर्ण करण्यासाठी नाटकांतून झालेल्या मिळकतीतून  जमिनीचा एक भूखंड घेतला. कालांतराने वर्षा आणि सोहम च्या संसारात कोहिनुर नावाचं सुंदर फुल आलं. आई होण्याचं वर्षांचं स्वप्न कोहिनूरमुळे पूर्ण झालं.  बघता बघता कोहिनूर बारा वर्षाचा झाला. तिघांचा संसार दृष्ट लागावी इतका आनंदी चालला असतानाच कोरोनाचे आक्रमण झाले. नाटकाचा हंगाम सुरू असतानाच लॉकडाऊन ने सर्वांना घरी बसविले. ठरलेली नाटके रद्द झालीत. नाटकांतून येणारे मानधन बंद झाले. कमाईचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने संसार चालविणे कठीण होऊ लागले. पोटाची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत होती. फक्त प्रश्न आणि प्रश्न. पण उत्तर कुठेच न्हवते. आणि अशातच चिमुकल्या कोहिनूरची तब्बेत बिघडली. डॉक्टरच्या रिपोर्टनुसार त्याला कॅन्सर होते. आता मात्र वर्षा पार कोसळली. उपचाराचा खर्च फार मोठा होता, आणि कोविडमुळे प्रयत्नाची दारे  बंद झालेली. पण पोटच्या गोळ्याला कॅन्सरच्या विळख्यातून सहीसलामत बाहेर काढणे ही एका आईची प्राथमिकता होती. कॅन्सर आणि कोवीडच्या घट्ट विळख्यात सापडलेली वर्षा असहाय्य झाली होती. दिसेल त्यांचेकडे कोहिनुर च्या आयुष्याची भीक मागत होती. आयुष्यभर तोंडाला रंग फासून अभिनय केला. आलेल्या मिळकतीतून जमिनीचा तुकडा खरेदी केला. त्यावर सुंदर घर बांधण्याचे स्वप्न बघणाऱ्या वर्षाला मुलाच्या उपचारासाठी स्वप्नांचा सौदा करावा लागला. भूखंड विकला. झाडीपट्टीत वाद्य संघटनेच्या कलावंतांनी आपल्या ह्या बहिणीसाठी मदत गोळा केली. आमदार नाना पटोले यांनी वर्षाच्या एका हाकेसरशी मदतीचा हात पुढे केला. आणि सुदैवाने कोहिनुर कॅन्सरमुक्त झाला.
     या संपूर्ण प्रवासात वर्षा झाडीपट्टीतील रसिक प्रेक्षकांचे आवर्जून आभार मानते. तिच्याच शब्दात , " माझा संसार उभा राहिला, मला नाव,पैसा आणि मान मिळाला तो केवळ आणि केवळ याच झाडीपट्टीतील प्रेक्षकांमुळे. झाडीपट्टी नसती तर आज माझं अस्तित्व शून्य असतं. संघर्षातही मायेची ऊब आणि बापासारखा आधार या झाडीपट्टीमुळेच मला मिळाला. तिचे अनंत उपकार माझ्यावर आहेत."

शबाना खान:-

 झाडीपट्टीत सन्मानाने घेतले जाणारे दुसरे नाव म्हणजे शबाना खान. नैसर्गिक काश्मिरी सौंदर्य आणि अस्खलित  मराठी यांचा सुरेख मेळ शबाना खान यांच्या व्यक्तिमत्त्वात बघायला मिळतो. चिमूर तालुक्यातील (जिल्हा चंद्रपूर) जांभूळघाट या छोट्याशा गावात शबानाचा जन्म झाला. वडील मालगुजार सावकार. मात्र शबाना सात वर्षाची असतानाच वडिलांचे निधन झाले. ते गेल्यावर वडिलोपार्जित मालमत्तेच्या हिस्से वाटपामुळे शबाना आणि भाऊ शेरू खान यांची आर्थिक स्थिती बदलली. गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत शबाना शिकली. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण तिने चिमूर येथे घेतले. मात्र तिची शिक्षणाची गाडी दहावीच्या पुढे गेली नाही. शबानाला क्रीडा आणि कला या दोन विषयात प्रचंड आवड होती. धावपटू व्हायचं तिचं स्वप्न होतं. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नेहमी अव्वल राहणारी शबाना राज्यस्तरीय स्पर्धेत ठाण्यापर्यंत पोचली. पोलीस होऊन देशसेवा करण्याची तिची तीव्र इच्छा होती. पण परिस्थितीचा सामना करता करता तिला आपल्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागली. कलाक्षेत्रात घरून प्रोत्साहन नसलं तरी अंगात अभिनय ठासून भरल्याने ते सरस्वतीचं देणं आपल्याला लाभलं अशी शबानाची श्रद्धा होती. वयाच्या सोळाव्या वर्षी शाळेत आणि गणेशोत्सवात रेकॉर्डिंग डान्स करून तिने आपल्यातल्या कलाव्रतीस अभिव्यक्त होण्यास वाट करून दिली.  तिच्या या प्रवासात  भाऊ शेरू खान सावलीसारखा उभा राहिला. माणिक शिंदे आणि गुलाम सुफी यांच्या 'चक्रव्यूह' या धार्मिक नाटकातून शबाना पहिल्यांदा प्रेक्षकांपुढे आली. नृत्याचे आणि अभिनयाचे कुठलेही शिक्षण न घेता ह्या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या, सौंदर्याच्या आणि नृत्याच्या जोरावरआजपर्यंत झाडीपट्टीच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. 
डॉ खुणे, प्रा.डोंगरे, के आत्माराम आणि विजयाताई पणफुले या जेष्ठ कलावंतांना ती  गुरु मानते. सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक आणि पौराणिक अशा सर्व नाटकांतून शबाना चमकली. झाशीची राणी, चक्रव्यूह, भूक, झाकून किती झाकायचं, स्वर्गावर स्वारी, संत गोरा कुंभार, ज्वालामुखी, खेळ मांडला नशिबाने, लावणी भुलली अभंगाला इत्यादी नाटकांचे तिने हजारो प्रयोग केलेत. तीनशे रुपये मानधनापासून सुरुवात केलेल्या या कलाव्रतीने नाटकाच्या निमित्ताने संपूर्ण झाडीपट्टी पिंजून काढली. ज्या काळात प्रयोगाला स्वतःच्या वाहनाने जावे लागायचे. त्यावेळी बस, सायकल,  मोटरसायकल आणि बैलबंडीचा प्रवास करून नाटकाला वेळेवर पोहोचण्याच्या आठवणी तिने सांगितल्या ज्या फार आदर्श आहेत.
 भंडारा जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात नाटक होते. कोंडा कोसरा या मुख्य रस्त्यावरील गावात आयोजक मोटरसायकलने तिला घ्यायला येणार होते. मात्र ते आलेच नाहीत. त्या काळात संपर्कासाठी मोबाईल  नव्हते. अखेर गावातून दोन सायकली भाड्याने घेतल्या आणि भाऊ शेरू खान सोबत वीस किलोमीटर सायकलने रात्रीचा प्रवास करून प्रयोगाच्या ठिकाणी वेळेवर  पोचल्याची आठवण सांगताना,"वक्त की कदर करो, वक्त आपकी कदर करेगा" असा उपदेश नव्या कलावंतांना ती देते.  
      झाडीपट्टी कलावंतांसाठी प्रयोगाला जातानाचा प्रवास म्हणजे बऱ्या वाईट अनुभवांची पुंजी असते. दोन ठिकाणच्या थक्क करणाऱ्या प्रवासाच्या तिने आठवणी सांगितल्या.
झाकून किती झाकायचं?  या नाट्यप्रयोगासाठी गडचांदूर च्या पुढे जायचे होते. रस्ता संपला समोर नदीचं पात्र, पलीकडे गाव. तेव्हा एका बैल बंडीवर बसून पाण्यातून नदीच्या पलीकडे जावे लागले. पोटासाठी असा त्रास सहन करावाच लागतो असे मिश्किलपणे ती यावेळी बोलली. अलीकडच्या काळातील एक चित्तथरारक अनुभव तिने सांगितला. झाशीची राणी नाटकाचा प्रयोग आटोपून ती चारचाकी वाहनाने सर्व सहकारी कलावंतांसोबत परतत होती. जागरण झाल्याने ड्रायव्हरसह सर्वांच्याच डोळ्यावर झोप होती. गाडी वैनगंगेच्या पुलावरून जात असतानाच ड्रायव्हरला डुलकी आली. नदीच्या लोखंडी कठड्यांना गाडी भिडणार तोच शबानाने प्रसंगावधान साधून ड्रायव्हरच्या थोबाडात हाणली. ड्रायव्हरने करकचून ब्रेक मारला. गाडी नदीत कोसळायला फक्त वीतभर अंतर शिल्लक होते. गाडीत शबानासह 17 कलावंत होते.  जवळजवळ 50 फूट उंचीचा नदीवरचा पूल आणि खाली फक्त खडक.  पाणी नाहीच. गाडी पुलावरून कोसळली असती तर?... कल्पना न केलेली बरी. आठवणीने सुद्धा अंगावर काटा येतो.
 पुन्हा एक प्रसंग सांगताना शबानाच्या डोळ्यात अश्रू येतात. झाडीपट्टीत सर्वाधिक गाजलेल्या भूक नाटकाची मुख्य अभिनेत्री शबाना हीच होती. त्या नाटकाचे 500 हून अधिक प्रयोग तिने केले. सीजनमध्ये रोज रोजच्या प्रयोगांमुळे एक दिवस पण सुट्टी मिळत नव्हती. परिणामतः भूक नाटक सुरू असतानाच तिची तब्येत बिघडली. ब्लड प्रेशर लो झाल्याने तोंड अक्षरशः वाकडे झाले. तो अर्धांग वायूचा सौम्य झटका होता. शरीरात झालेला बदल सहकलाकार कमलाकर बोरकर याच्या लक्षात आला. त्याने शबानाला कसेतरी सावरले. नाटक बंद करावे लागले. प्रेक्षकांना झालेला प्रकार कथन केल्यानंतर शबानाला ताबडतोब शेजारच्या लाखांदूर गावात दवाखान्यात हलविण्यात आले. डॉक्टरांनी ताबडतोब उपचार केले. थोडीफार सवरल्यानंतर शबाना पुन्हा नाटकाच्या ठिकाणी परतली. आणि  दोन तासानंतर पुन्हा नाटक सुरू झाले. पण एकही प्रेक्षक घरी गेला नाही. की कुणी तक्रार केली नाही. या प्रेक्षकांबद्दल बोलताना "हा माझा खरा परिवार" असा ती उल्लेख करते. 
कलावंतांवर जीवापाड प्रेम करणारा, त्यांच्या चुका पोटात घालणारा, त्यांना गळ्यातले ताईत म्हणून सन्मानाने वागणूक देणारा प्रेक्षक झाडीपट्टीतच असू शकतो असे तिचे मत आहे.
कोविडच्या दोन वर्षात इतर कलावंतांप्रमाणे शबानाचे जीवन संघर्षमय राहिले. कोरोना काळात भावासोबत शेती करणे आणि गावातच नाश्ता तयार करून विकणे हे शबानाचे रोजचे काम. या कामामुळेच  कोरोनाच्या काळात तिचे जगणे सुसह्य झाले असे ती सांगते.
           पण वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या अभिनेत्रीला आता अडचणींचा  सामना करावा लागतो आहे. झाडीपट्टीत नाटकांचे अनेक ग्रुप तयार झाल्याने जुन्या वयस्क कलावंतांना मिळेल तेवढ्याच मानधनात समाधान मानावे लागते. शेवटी पोटाचा प्रश्न आहे.
प्रयोग संख्याही आता रोडावली आहे. कित्येक वर्षापासून शासनाच्या वृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी अर्ज केला आहे मात्र कुठे घोंगडं भिजत घातलं आहे कुणास ठाऊक, पण मानधन सुरू नाही. "आता काय आम्ही माती खायची काय? असा सवाल शबाना शासनाला करते तेव्हा तिच्या संघर्षाची वेदना कळते.

रागिणी बिडकर 

लोकनाट्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सुप्रसिद्ध कलाकार शांताबाई देवळीकरांच्या कलेचा वारसा घेऊन आलेली त्यांची कन्या म्हणजे रागिनी बिडकर.  झाडीपट्टीतील लावणी नृत्यांगना ते चरित्र अभिनेत्री आणि अभिनेत्री ते नाट्य लेखिका अशी त्यांची रंगभूमीवरील ओळख आहे. त्यांच्या बालपणात रागिणीताई अभ्यासात हुशार होत्या. मात्र चौथ्या वर्गाच्या पुढे त्यांना शिकता आलं नाही. आई शांताबाई लोकनाट्याच्या निमित्ताने गावोगावी फिरायच्या, वडील ढोलक वादक म्हणून सोबत असायचे त्यामुळे लहान बहिणीला सांभाळण्यासाठी चिमुकल्या रागिणीला शाळा सोडावी लागली ती कायमचीच. लग्नानंतरही रागिणीताईची परिस्थिती हालाकीचीच होती. पती एम.ए.शिकलेले पण हाताला काम न्हवते. त्यामुळे ते रस्त्याचे छोटे मोठे ठेके घ्यायचे. पण तेवढे काम संसाराचा गाडा पुढे नेण्यास पुरेसे न्हवते.
पदरात दोन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी रागिनीताईंवर होती.  त्यांनी परिस्थितीशी दोन हात करून मुलांना शिकवून उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न बघितले खरे. पण परिस्थिती साथ देत नव्हती. अंगात कला होती त्या कलेचा आधारच मुलांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकतो हे त्यांनी हेरलं म्हणूनच त्यांनी नृत्याचे आणि नाटकांचे कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. 
त्यासाठी खूप तडजोडी कराव्या लागल्या. बरेचदा पेटकर आणि तबलजीसोबत मेटॅडोरमध्ये बसून प्रयोगाला जाण्याचा त्यांच्यावर प्रसंग आला. कारण तोपर्यंत त्या कुठल्याही ग्रुपशी जुळल्या नव्हत्या.
 ओळख नसलेल्या गावांमध्ये जाऊन लावणी करायची तर प्रचंड भीती वाटायची. तरीपण मनाविरुद्ध सर्व करावेच लागायचे. अनोळखी ठिकाणी एकटी बाई पाहून तिचा हात धरणे, स्टेजवर सर्रास जबरदस्तीने ओढणे, अश्लील चाळे करणे हा विकृत त्रास त्यांच्या वाट्याला आला. रंगमंच सोडून कायमचं घरी निघून जावं असं त्यांना अनेकदा वाटायचं, पण मुलांच्या शिक्षणाचा विचार डोळ्यासमोर आला की त्या विकृत वासनांध समाजाच्या नजरांचाही स्वीकार करावा लागायचा.  
त्यावेळी त्यांच्या अस्वस्थ मनाला काही ओळी सुचल्या ज्या त्यांच्याच नाटकात लावणीच्या रूपाने त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

रक्ताळलेल्या पायी मी घुंगरू आज बांधले ।
लाज शरम सोडून मी हो तुम्हापुढे नाचले ।
 पुढे पुढे प्रयोगांची संख्या वाढली.आणि प्रत्येक प्रयोगाच्या ठिकाणी आता पती प्रदीप बिडकर स्वतःच्या M 80 या दुचाकी वाहनाने घेऊन जायला लागले. हा त्यांच्यासाठी खूप मोठा आधार होता.
 नाटकात काम करणाऱ्या मुलींना नटी म्हणून हिणावणारे अनेक प्रसंग रागिणीताईंनी अनुभवले. समाजात आणि घरातही कलावंतांना मान मिळत नसतानाही केवळ पोटासाठी आणि मुलांसाठी हा व्यवसाय करावा लागायचा. 
पण चिमुकल्या मुलांनाही आपली आई लावणी नाचते, नाटकात नटी म्हणून काम करते हे जगाला कळू नये असेच वाटत असावे असा एक अनुभव रागिनीताईंनी सांगितला. मुलगा साकोलीला सहाव्या वर्गात शिकायचा आणि रोज बसने जाणं येणं करायचा. एके दिवशी त्याला शिकविणारे गुरुजी घरी आले. त्यांना एका नाटकाच्या प्रयोगासाठी स्त्री कलावन्त हवी होती. त्यासाठी तारीख पक्की करण्याच्या उद्धेशाने गुरुजी आपल्याकडे आल्याचे मुलाच्या लक्षात आले. मात्र मुलगा गुरुजी परतेपर्यंत खोलीबाहेर आलाच नाही. त्याला कारण विचारले असता माझी आई नटी आहे, ती स्टेजवर नाचते हे आपल्या गुरुजींना कळू द्यायचे न्हवते. त्या व्यवसायाची त्याला लाज वाटत असावी कदाचित. मला या गोष्टीचे खूप वाईट वाटले.  मी हा प्रसंग आठवला की आजही माझ्या डोळ्यात अश्रू उभे रहातात असे भावनिक होऊन रागिनीताई सांगतात. पण मी खंबीर होती. मुलांसाठी लोकांकडे भांडे घासण्यापेक्षा चेहऱ्याला रंग फासून पैसे मिळविणे मी पसंत केले. आणि त्याच पैशातून मी माझ्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले याचा मला अभिमान असल्याचे त्या बोलतात.
आज त्यांची दोन्ही मुलं उच्च विद्याविभूषित आहेत. मोठा मुलगा विशाल इंजिनिअरिंग आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एका विभागात मोठ्या हुद्द्यावर अधिकारी आहे. तर धाकटा सागर MBA केल्यानंतर थेट लंडनमध्ये नोकरीला आहे. नाटकांमुळेच मुलांना शिकवून मोठं करण्याचं ध्येय मला गाठता आलं,  त्यासाठी झाडीपट्टीनेच माझे स्वप्न मूर्तरुपात आणण्यासाठी मदत केली असं त्या अभिमानाने सांगतात.

 व्यंकोजी वाघ, झाकून किती झाकायचं, प्रित जमली चाळातून, माझं घर माझी माणसं, भिकारी, बंधन तुटले प्रेमाचे, एक नार तीन बेजार, संसार माझ्या पाखरांचा ह्या नाटकांतून त्या प्रेक्षकांपर्यत आल्यात.या काळात त्यांच्याती लेखिका त्यांना स्वस्थ बसू देत न्हवती.  समाजाला प्रबोधन करण्यासाठी त्यांनी लेखणी हातात घेतली आणि कुंकू माझं सौभाग्य तुझं, सवत माझी लाडकी, नसून पती सौभाग्यवती ह्या नाटकांना त्यांनी जन्म दिला.
    पती प्रदीप बिडकर स्वतः मराठीत MA आहेत. त्यांनी रागिनीताईसाठी अनेक नाटक लिहून त्याचे यशस्वी प्रयोग करून झाडीपट्टीत इतिहास घडविला. एक नार तीन बेजार, कलंकित देवदासी,  लग्नाआधी पुसलं कुंकू, आई तू माझी होशील का?, संसार माझ्या पाखरांचा इत्यादी कौटुंबिक नाटके पती प्रदीप बिडकर यांनी लिहिलीत. ज्यात रागिनीताईंनी अभिनय केला. ह्या त्यांच्या सर्व नाटकातील गाणी सुद्धा रागिनीताईंनीच लिहिली आहेत हे विशेष. 
आपल्या  नाट्यप्रवासातील अनेक प्रसंग त्यांनी यावेळी कथन केलेत.
एकदा कुंकू माझं सौभाग्य तुझं ह्या नाटकाचा प्रयोग आरमोरी च्या शेजारच्या गावात  होता. प्रगोग संपवून रात्रीच त्या पती प्रदीपरावांसोबत दुचाकीने परत  निघाल्यात. समोरून येणाऱ्या ट्रकच्या प्रखर बल्ब मुळे डोळे दिपले आणि प्रदीपरावांची गाडी शेतात वळती झाली. रागिनीताई कोसळल्या आणि बेशुद्ध पडल्यात. तोंड फुटलं. रक्तबंबाळ झालं. दुसऱ्याच दिवशी नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग असलेल्या गावात खूप कॉम्पिटेशन असल्याने प्रयोग रद्द करता येत न्हवतं. पर्यायच न्हवता. चेहरा सुजलेला, बँडेज बांधूनच रागिनीताईंनी रंगमंचावर प्रवेश केला नि नाटक पूर्णही केलं. कुठलाही आक्षेप न घेता प्रेक्षकांनी सुद्धा त्या अवस्थेत त्यांना स्वीकारलं. 
दुसरी मनाला चटका लावून जाणारी घटना त्यांच्या आयुष्यात घडली जी त्या अजूनही विसरू शकल्या नाहीत.  आपल्या सहकारी कलावंतांना अपघातात डोळ्यासमोर मरताना त्यांनी बघितलं. 2012 सालची गोष्ट.  नाटकासाठी संध्याकाळी गाड्या निघाल्या. रागिनीताई बसलेली गाडी पुढे होती. आणि मागे निर्माता आणि इतर कलावन्त बसलेली गाडी होती. काहीच वेळात मागच्या गाडीला ट्रक ने धडक दिली. अपघात खुपच मोठा होता. गाडीत बसलेले आठपैकी आठही कलावन्त आपला जीव गमावून बसले होते. "आम्ही परतलो तेव्हा अक्षरशः मोळ्या रचतात तसे कलाकारांचे प्रेत रचले होते. अजूनही ते चेहरे डोळ्यासमोरून जातच नाहीत" असे भावविवश होऊन रागिनीताई सांगतात. अशी संघर्षाची अनेक पाने रागिनीताईच्या पुस्तकात सापडतील पण म्हणून झाडीवरची निष्ठा त्यांची कमी झाली नाही. जे काही मिळालं ते झाडीपटीमुळेच हे त्या प्रांजळपणे कबूल करतात. 
गेल्या काही वर्षांत ह्या रंगभूमीवर अनेक बरे वाईट प्रवाह पहायला मिळतात, जे रागिणीताईच्या संवेदनशील मनाला न पटणारे आहेत. म्हणून साठी ओलांडलेल्या ह्या कलाव्रतिने सात वर्षांपूर्वीच  झाडीपट्टीत काम न करण्याचा ठाम निर्धार केला. 
 पण झाडीपट्टीतील त्यांच्याच वयाच्या ज्या  स्त्रियां अजूनही काम करतात त्यांच्या वयाला साजेशी भूमिका त्यांना मिळावी. या वयात त्यांनी काय करायचे असा सवाल झाडीपट्टीत तमाम दिग्दर्शकांना त्यांनी केला आहे.जो रास्त आहे. नाटकातील वयस्क आणि म्हाताऱ्या भूमिकांसाठी जेष्ठांना डावलून वीस पंचेविस वर्षांच्या अभिनेत्रीची निवड करणे हे योग्य नसल्याचे रोखठोक मत त्यांनी अलीकडेच ब्रम्हपुरी येथे झालेल्या चवथ्या झाडीपट्टी नाट्यसंमेलनात एका चर्चासत्रात मांडले.  ह्या वयात सुद्धा त्यांची रंगभूमीची ओढ कमी झाली नाही. "ज्या दिवशी माझ्या कलासक्त मनाला न्याय देणारा आदर्श ग्रुप मला प्रभावित करेल त्या दिवशी मी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईन" असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला आहे.
झाडीपट्टी च्या पवित्र रंगमंचावर  अतिक्रमण झालेल्या नृत्य हंगामा प्रकाराला त्यांचा सक्त विरोध आहे. अशा वाईट प्रथा रंगभूमीवरून हद्दपार व्हायला हव्यात असे त्यांचे मत आहे. कलावंताचं आयुष्य म्हणजे रसिकांसाठी समर्पण आहे त्यांचा सन्मान व्हावा एवढेच त्यांचे नटेश्वरकडे मागणे आहे.

सदानंद बोरकर
नवरगाव
जिल्हा चंद्रपूर
9021333633


२ टिप्पण्या:

  1. प्रिय विजय
    सदानंद बोरकर यांचे लेखावरील प्रतिक्रिया.

    नमस्कार
    सदानंदजी
    मी प्रभू राजगडकर.
    नागपूर


    आताच "लोकदीप"दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला व पब्लिक पंचनामा ने पुन प्रकाशित केलेला- 'झाडीपट्टी रंगभूमीवरील कलाव्रतींचा संघर्ष ' हा लेख वाचला.
    झाडीपट्टी विश्वातील स्त्री कलावंताच्या वाट्याला आलेले अनुभव मन हेलावून टाकणारे आहे.या झाडीपट्टी रंगभूमी विषयी मला प्रचंड आकर्षण आहे.चंद्रपूर-गडचिरोली मध्ये शासकीय नोकरीत असतांना काही नाटक पाहण्यात आली. मला अनेक प्रश्न पडलेत. ज्या विषयी काही मित्रांशी शेअर केले.या रंगभूमीबाबत अलिकडे खुप चर्चा होते.येथे पुण्या -मुंबईचे लोक काम करुन जाताही.
    या झाडीपट्टी रंगभूमी बाबत लिहिले गेले असेलही पण माझ्या जे वाचण्यात आले ते फारच त्रोटक आहे.खरेतर एखाद्या बृहदग्रंथाचा हा विषय आहे.काही विद्यार्थ्यांना पीएचडी करीता सुचवून पाहिले.एकाचे म्हणणे होते की लिखीत-पुस्तकरुपात संहिता उपलब्ध नाही.मला वाटते असे पुस्तक रुपात असणे बंधनकारक असेल तर ते अन्यायकारक आहे.

    विशेषता तुमचा हा लेख वाचून या सर्व स्त्री कलावंताकडे/ अन्य ही असल्यास पाठपुरावा करुन त्यांचे कडून सुंदर आत्मचरित्र येवू शकतात.
    कलावंताचे जगणे त्यातही स्त्री कलावंताचे जगणे एक वेगळाच आयाम आहे/असतो.मराठी नाट्यसृष्टित असे आत्मचरित्र आलेले आहे. हे आपणासारख्या नाटकवेड्या कलावंताला माहितच असणार.
    या आत्मचरित्राचे निमित्ताने एकूणच झाडीपट्टी रंगभूमीवरील त्या त्या काळाचा इतिहासाच उभा राहील. आणि ते महत्वाचे आहे.असे मनोमन वाटते.
    पुरुष कलावंतानीही आत्मचरित्र लिहिल्याचे आठवत नाही.
    या रंगभूमीवरील कलावंताच्या खूप समस्या असल्याचे वाचण्यात, ऐकण्यात येते. या बाबत झाडीपट्टी काही कोष उभा करता येईल का .ते तपासले पाहिजे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने वडसा येथे एक स्थायी भव्य नाट्य संकुल जसे मुंबईत प्रभादेवी येथे पु.ल.चे नावाने आहे उभारले पाहिजे. तेथे लेखन,कलावंताच्या कार्यशाळा ,अभ्यासवर्ग ,सुसज्ज लायब्ररी इत्यादि असावे. सतत चालले पाहिजे.अनुभवी लेखक-कलावंत यांच्या अनुभवाचा फायदा करता येईल. जागतिक रंगभूमीची,भारतातील अन्य प्रांतातील लोककला याचा अभ्यास. असे खूप काही करता येण्यासारखे आहे.

    आपण एक उत्तम लेख लिहून या विषयावर अनेकांनी लिहावे यासाठी एक मार्ग प्रशस्त करुन दिला.

    लेख आवडला. पुनश्च अभिनंदन.

    प्रभू राजगडकर, नागपूर.
    5/11/2022

    उत्तर द्याहटवा
  2. सदानंद जी लेख वाचला.काळजात धस्स झालं
    महिला कलावंतांच्या वेदना वाचून मन सुन्न झालं .एकेकाळी मीही झाडीपट्टी च्या नाटकांमधून थोडी कामे केली आहेत .स्व.मनोहर पोलकामवर यांच्या ग्रुप मधे होतो फकत 6च प्रयोग करण्याचे भाग्य मला लाभले
    नंतर मला.झाडीपट्टी सोडावी लागली.पण
    झाडीपट्टी विषयीचे प्रेम माझे आजही कायम आहे.
    तुमच्या लेखाने मन विष्णन झाले.
    आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ कलावंतांसाठी काही करू शकतील का?
    आपण ह्या वेदना त्यांच्या कानावर घालू यात.
    बाकी
    आपला.
    सुनिल देशपांडे.
    पिंपळे सौदागर,पुणे

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!