बेरोजगारांची चिंता कोण करणार ?
पत्रकाराच्या लेखणीतून-विनायक रेकलवार
बेकार म्हणजे ज्याला काम मिळालेले नाही असा व्यक्ती होय, व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो. परंतु त्याला काम मिळत नसते. बेरोजगारीमुळे देशातील मानव साधनसंपत्तीचा अपव्यय होतो. बेरोजगारीमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते. बेकारीमुळे देशातील सकल राष्ट्रीय उत्पन्न कमी राहते आणि समाज हा गरीब व मागासलेला राहतो. बेकारीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्मांण होतो.म्हणून प्रत्येकाच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे.आज बेकार तरूण मिळेल ते काम करण्याच्या तयारीत आहे.परंतु रोजगाराच्या संधी त्याच्या वाटयाला चालून येत नाही.त्यामुळे तो हताश आहे.अनेक बेरोजगार चांगले उच्चशिक्षित आहेत.त्यांच्या शिक्षणाचा फायदा होणे अपेक्षित आहे.पण तसे होतांना दिसत नाही. तुटपुंज्या वेतनावर अर्थात मानधनावर त्याला काम करावे लागते.त्यातून त्याचे भागत नाही.त्याच्या कुटुंबाचा गाडा हाकलण्यासाठी त्याला कसरत करावे लागते.त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि काम करायला तयार असतात, परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही . ही स्थिती श्रमांचा अतिरिक्त पुरवठा व त्या तुलनेत श्रमिकांची कमी मागणी यातून निर्माण होते. यामध्ये माणसांची मनस्थिती नसतानाही असेल ते कामे करावी लागतात तेही विनामोबदला किंवा कमी मोबदला; त्यामुळे त्यांचे हक्कांचे उच्छाटन होत असलेले दिसून येते. तसेच कमी मिळालेल्या मोबदल्याने त्यांच्या परिवारातील आर्थिक अडचणी पूर्ण होत नसल्याने बेकारींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. बेकारी असा प्रकार आहे की जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते पण तिची काम करण्याची इच्छा नसते. खऱ्या अर्थाने ही बेकारीची स्थिती नसून निष्कियतेची स्थिती आहे. जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही, किंवा तिला कनिष्ठ पातळीवर काम करावे लागते. व्यक्तीकडे पात्रता, कौशल्य, इच्छाशक्ती, असूनही कोणत्याच ठिकाणी काम प्राप्त होत नाही. याला पूर्ण बेरोजगारी म्हणतात
बेकारी प्रामुख्याने ग्रामीण भागात दिसून येते. ही एक गंभीर स्वरूपाची समस्या आहे. यामध्ये
भारतात बहुतेक शेतकरी लागवडी साठी पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे वर्षातून एकदाच पीक घेता येते.यामुळे ग्रामीण शेतमजुरांना केवळ ४ ते ५ महिनेच काम प्राप्त होते व उर्वरित काळ ते बेकार राहतात. अति लोकसंख्येच्या अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये प्रच्छन्न बेकारी ही एक मूलभूत स्वरूपाची समस्या आहे. या प्रकारच्या बेकारीत ज्या ठिकाणी काम करण्यासाठी कमी लोकांची गरज आहे तिथे गरजेपेक्षा जास्त लोक काम करतात तेव्हा अतिरिक्त श्रमिकांची सीमान्त उत्पादकता शुन्य राहते म्हणजेच अतिरिक्त लोक उत्पादनात कोणतीही भर टाकत नाही व छुपी बेकारी निर्माण होते. बेकारी शहरी भागांमध्ये सुदधा मोठया प्रमाणावर आढळून येते. ज्या व्यक्तीने शिक्षण घेतले आहे आणि त्याची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही काम मिळत नसेल, अशा स्थितीला सुशिक्षित बेकारी असे म्हणतात. ही बेकारी दहावी , बारावी पास झालेले, पदवीपूर्व, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले या लोकांमध्ये आढळून येते. नोकरी-योग्य शिक्षणासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व उच्च शिक्षणासाठी आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कामुळे योग्य शिक्षण घेणे शक्य होत नाही. म्हणूनही बेकारी वाढते आहे. शिक्षण घेणारे दिवसेंदिवस वाढत असले तरी त्यांच्या शिक्षणासारखे त्यांना काम मिळत नाही. उच्च पदवी घेऊन देखील आज लाखो सुशिक्षित बेकारांचे प्रमाण वाढले आहे. सरकार कोणतेही असो पण त्या सुशिक्षितांना त्यांच्या पदवी अनुसार काम मिळाले पाहिजे, नाहीतर हि बेकारी भविष्यात खूप वाढेल व त्यांना पाहून येणारी पुढची पिढी हि शिक्षणापासून वंचित राहील असा विचार ही दिसून् येतो.उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्याने सुदधा बेकारी निर्माण होते . शहरी भागात कारखानदार श्रमिकांऐवजी यंत्रांना जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून उत्पादन करणे यामुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. त्यामुळे तांत्रिक बेकारी निर्माण होते.
आर्थिक संघर्षामुळे श्रमिकांना तात्पुरत्या स्वरूपात बेकार व्हावे लागते. यंत्रातील बिघाड, कच्च्या मालाची टंचाई, वीज कपात इ. मुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. अशा स्थितीत श्रमिकांना एक काम सोडल्यापासून दुसरे काम स्वीकारेपर्यंत बेकार राहावे लागते, या बेकारीच्या मधल्या काळात त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केलेला असतो. कोरोनाच्या काळात अशा समस्यांमध्ये वाढ झाली आहे.भारतात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर कामगारांना इच्छेविरुद्ध बेकार राहावे लागते, हे निर्विवाद सत्य आहे. नेमके किती लोक बेकार आहेत त्याचा अंदाज घेणे कठीण आहे. स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या वेगाने वाढू लागली.त्यामुळे श्रमशक्ती वाढत गेली. अपुऱ्या आर्थिक विकासामुळे बेकारी वेगाने वाढत गेली. अज्ञान व निरक्षरतेमुळे भारतातील शेतकरी शेतीमध्ये परंपरागत पद्धतीचा वापर करतात. त्यामुळे भूमीची उत्पादकता कमी राहते आणि रोजगार वाढत नाही. परिणामतः बेकारी वाढते.भारतात १९८० ते १९९५ या काळात मोठ्या प्रमाणात बेकारी होती. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशातला रोजगार निर्मितीचा प्रश्न बऱ्याच अंशी कमी झाला असला तरी, प्रत्येक तरूण बेरोजगाराच्या हाताला काम मिळणे हे त्याचे कर्तव्य आहे.सर्वांना समान संधी समान हक्क मिळायलाच पाहिजे.रोजगाराच्या संधी उपलब्धेतेवर कोणीच कसे का बोलत नाही,हाच मुळी चिंतेचा विषय आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!