संवेदनशिलता हरवत चालली काय ?
पत्रकाराच्या लेखणीतून - विनायक रेकलवार
संवेदनशिलता हरवत चालली काय ?
माणसा माणसा मधील संवेदनशिलता हरवत चालली आहे काय ? असा प्रश्न देशात चालणा-या चालू घडामोडींवरून पडतो आहे. नुकतेच शनिवारच्या मध्यरात्री भंडारा येथील जिल्हा रूग्णालयातील शिशु कक्षाला आग लागली. त्यात दहा शिशू (बालके) दगावली. काही गुदमरून आणि होरपळून. ज्यांनी जगात पाऊल ठेवल्यानंतर हे जग कस आहे आणि असते,ते बघीतले सुदधा नाही. आई बाबाचे बोट पकडण्याआधीच अशा निष्पाप बालकांना असंवेदनशिलतेचे बळी व्हावे लागले. यापेक्षा दुसरे दुदैव कोणते. ज्या भारताने स्वातंत्र्य ,समता ,बंधुता,न्याय,लोकशाही,सर्वधर्मसमभाव,राष्टीय एकात्मता,वैधानिक दृष्टीकोन या मुल्यांचा स्वीकार केला. संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला, त्याच लोकशाही भारतात अशा निष्पाप बालकांना मारण्याचा अधिकार कुणी दिला ? हा प्रश्न भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या व्यवस्थेला विचारला पाहिजे. काय चुक होती, त्या बालकांची. ज्यांना तुम्ही जगावेगळे केले ? शिशुकक्षाच्या जवळ साधा सेक्युरिटी गार्ड ,साधी सुरक्षा सुदधा नसावी ? यापेक्षा दुसरे वाईट काय? ज्यांनी जगाचं सुंदर स्वप्न सुदधा रंगविले नाही ,अशा चिमुकल्यांना धरणी मातेच्या कुशीत कायमचे निजावे लागले. परिस्थिती ऐवढी वाईट बनावी ? यंत्रणा ऐवढी निगरगटट व्हावी ? साधा पाझर सुदधा न फुटावा ? असे विविध सवाल अभागी झालेल्या मातांच्या वतीने प्रशासनास विचारावयासे वाटतात ? घटनेचे गांभीर्य ऐकूनच मन सुन्न होते. यालाच रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा म्हणतात काय? हा माझ्या सह अनेकांना पडलेला प्रश्न आहे. माताभंगिनींचे दुःख शब्दांच्या पलीकडे आहे. ते शब्दात मांडण्या सारखे नाहीच आहेत. दुःखाचे डांगरच कोसळले आहे . नऊ महिणे नऊ दिवस पोटात वाढवलेल्या,वात्सल्याने,प्रेमाने हात फिरवलेल्या नवजात बाळांचा मृत्यू अशा रितीने होणे म्हणजे खूपच वाईट. अपरिमित हानी . शिशू कक्षाची काळजी न घेण्या इतपत यंत्रणा कशी सुस्त राहू शकते. हे न उलगडणारे कोडेच आहे. सरकारी रूग्णालये म्हणजे गोरगरीबांचा आधार. चांगली वैदयकीय सेवा पुरविणे हे कर्तव्य असतानाही प्रशासन एवढा निर्ढावलेला कसा राहू शकतो? हा प्रश्नच आहे. सरकारी रूग्णालयात दर्जेदार औषधी, योग्य उपचार आणि सुरूळीत सर्व व्यवस्था ही मिळालीच पाहिजे. हा स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहेच.तो त्यांना मिळालाच पाहिजे. रूग्णालये मगं प्राथमिक स्वास्थ केंद असो ,की उपजिल्हा रूग्णालय असो, किंवा जिल्हा रूग्णालये. दवाखाने रूग्णांसाठीच आहे तर मंग रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा या ध्येयाने ती सेवा झालीच पाहिजे. वैदयकीय अधिकारी,परिचारीकां आणि कर्मचा-यांसह सर्व सोयीसुविधांनी युक्त असा दवाखाना गरजेचे झाले आहे. ब-यांच रूग्णालयात वैदयकीय अधिकारी आणि तज्ज्ञांची पदे रिक्त आहेत.ती का भरली जात नाहीत. पदे भरली तरी सेवेत का रूजू होत नाहीत? हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. आता प्रत्येक रूग्णालयांचे वेगवेगळया मुदयांवर ऑडीट होणे गरजेचे आहे.रूग्णालयांना भासणारी कमतरता दूर करणे महत्वाचे आहे. मागे एका शाळेमध्ये आग लागून अपघात झाला होता.त्या घटने नंतर सर्व शाळांमध्ये अग्नीशमन यंत्र आवश्यक करण्यात आले होते. तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखा हा प्रकार आहे. तसाच किस्सा भंडाराच्या घटनेनंतर अस्तित्वात आला तर नवल वाटायला नको.परंतु दवाखान्याच्या बाबतीत अशी दिरंगाई कदापी मान्य नाही.ज्यात हजारो रूग्ण वेगवेगळया कक्षात उपचार घेत असतात. प्रत्येकाचे प्राण मळत्वाचे आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक रूग्ण उपचारातून बरा होवो असेच वाटले पाहिजे. त्याला त्याची सुविधा मिळालीच पाहिजे. तेवढीच रूग्णांची सुरक्षितता सुदधा आता महत्वाची झाली आहे.कोणत्याही प्रकारचे बालमृत्यू हे गंभीरच . भंडारा येथील घटनेनंतर प्रत्येकांच्या मनात रूग्णालयांविषयी धडकीच भरली आहे.एक भिती निर्माण झाली आहे. ती धडकी ,भिती दूर करणे ही खरी कसोटी आहे. या उपचार केंद्राच्या मंदिरात संवेदनशिलता जागृत करा आणि माणुसकीची ज्योत पेटवा.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!