क्रांतीकारक भगवान बिरसा मूंडा स्मृती दिन
क्रांतीकारक भगवान बिरसा मूंडा स्मृती दिन
सचिन वाकडे, मुल
बिरसा मुंडा यांचा जन्म आई करमी हातु व वडील सुगना मुंडा यांचे पोटी 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड राज्यातील रांची जिल्हयातील उलीहातू या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते प्रथम अपत्य होते. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे. ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे. बिरसा लहानपणापासूनच खूप कुशाग्र बुद्धीचे व चपळ होते. बिरसा हे उत्तम योद्धा होते.
बिरसा मुंडा एक भारतीय क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते.
बिरसा मुंडा 1900 मध्ये इंग्रजांविरूध्द विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हटले आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही, आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने आपली सेना बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविली. बिरसा मुंडास पकडून देणाऱ्यास बक्षिस जाहीर केले होते. बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसा मुंडा यास अटक केली. त्यांच्या सोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली.
बिरसांना शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य यांची सुद्धा आवड होती. ते उत्तम बासुरी वाजवायचे, त्यांचा आवाज भारदस्त होता. रानात गुरे चरायला नेत असल्यामुळे उपलब्ध असलेल्या वनऔषधीबद्दल चांगलेच ज्ञान होते. आजारग्रस्त लोकांना जडीबुटी देवून त्यांचा आजार बरा करत असल्याने लोक त्यांना भगवान बिरसा म्हणू लागले.
सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या शोषणाची सीमा पार केली होती. आदिवासी जमिनीचे मूळ मालक असूनही जमीनदार व सावकार जबरदस्तीने त्या जमिनीवर ताबा मिळवून बसले होते. पण त्याबद्दल चकार शब्दही न काढण्याचा आदेश इंग्रजांनी दिले होते. परंतु बिरासांना ते सहन झाले नाही बिरसांनी लोकांमध्ये जागृती करण्यास सुरवात केली. ते लोकांना म्हणत कि तुमच्या जमिनी धूळ वाऱ्यासारख्या उडून गेल्या आहेत, स्वाभिमानासोबत तुमचा आत्मविश्वासही संपला आहे, जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास परत जागृत नाही केला तर तुम्ही तुमच्या आया बहिणींची अब्रु कशी वाचवाल असा सवाल केल्याने या प्रश्नाने लोकांच्या मनावर खोल परिणाम झाला व लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत होण्यास सुरवात झाली.
1869 मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आल्याने जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली. आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्द बिरासांनी 1890 मध्ये व्यापक क्रांती उलगुलान ची घोषणा केली. जंगल, जमीन, संपत्ती हा आमचा अधिकार आहे ते आमच्या उपजीविकेचे साधन आहे यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येवून लढायचे आवाहन केले. बिरसांनी न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतेले. जंगल राज्याची घोषणा करून ते आदिवासींचे महानायक बनले. यामुळे इंग्रज सरकार त्यांच्या मागे लागले तरी इंग्रजांना न घाबरता सर्व शक्तीनिशी आपले कार्य चालूच ठेवले.
डुंबारी बुरुज नरसंहारानंतर 7 जानेवारी 1900 मध्ये इंग्रजांनी धरपकड सुरु केली. व पुढे 3 फेब्रुवारी 1900 ला बिरसांनी आपल्या 80 अनुयायांसमवेत स्वतःला इंग्रजांच्या स्वाधीन केले. तीथे उपस्थित आदिवासी बांधवांना बिरसांनी माघारी फिरण्यास सांगून आपल्या अधिकारांसाठी लढण्याचा उपदेश केला. 9 जून 1900 ला वयाच्या केवळ 25 व्या वर्षी तुरुंगवास भोगत असताना रहस्यमयरित्या बिरसांची प्राणज्योत मालवली.
बिरसांच्या उलगुलानलाहि बिरसाइतकेच महत्व प्राप्त आहे. उलगुलान मध्ये समाजहीत तसेच मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणे यासारखी तत्वे समाविष्ट असल्याने लोक बिरसांना धरती आबा म्हणून संबोधतात.
आजही या महान व्यक्तीच्या पवित्र स्मृती झारखंड राज्यातील रांची येथे आहेत. झारखंड राज्याने रांची विमानतळ व रेल्वे स्थानकाला बिरसा मुंडा हे नाव देवून त्यांच्या महान कार्याला गौरविले आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी बिरसा मुंडा आदर्श आहेत.
या महान जननायक, वीराला पब्लिक पंचनामा तर्फे शतशः नमन.
भारतीय स्वातंत्र्य लढयात आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसामुंडा यांनाच जाते. आदिवासी जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावलेले आहे ते एकमेव क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!