राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद महिला विभागाच्या वतीने महिला आर्थिक सक्षमीकरण मेळावा
वृत्त ..
संत मंजुळामाता यांच्या ८४ व्या स्मृतीवर्षाच्या निमित्ताने महिला आर्थिक सक्षमीकरण मार्गदर्शनपर जिल्हास्तरीय मेळावा संपन्न ....
----------------------------------------
स्वावलंबन आणि सहकार तत्वातून मानवी सहजीवन वृध्दींगत होण्यास मदत - बंडोपंत बोढेकर
----------------------------------------
गडचिरोली (प्रतिनिधी )-
छोट्या मोठ्या लघुउद्योगातून जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही तोपर्यंत महिलावर्ग ख-या अर्थाने स्वावलंबी होणार नाही. बचत गट हे महिलांना आर्थिक जगतांशी जोडणारे प्रभावी माध्यम आहे. अशा संघर्षमय मार्गाने आपल्यासोबत गावाचा अर्थात देशाचाही विकास सहज शक्य होईल . राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांनी दिलेले अध्यात्म आणि व्यवहारवादाचे सूत्र आजच्या काळात दिपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन सौ.ईशा प्रंचित पोरेड्डीवार यांनी गडचिरोली येथे उदघाटन प्रसंगी केले.
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद महिला विभागाच्या वतीने राष्ट्रसंताच्या मातोश्री संत मंजुळामाता यांच्या ८४ व्या स्मृतीवर्षाच्या निमित्ताने गोंडवाना कलादालन येथे जिल्हास्तरीय महिला आर्थिक सक्षमीकरण मार्गदर्शनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर, महिला आर्थिक विकास मंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, प्रगतीशील महिला शेतकरी प्रतिभाताई चौधरी ,नक्षल सेल च्या पोलिस उप निरीक्षक वर्षा कुमरे लाभलेल्या होत्या . याप्रसंगी भाग्यश्री स्वयंसहायता समुह मुडझा , जनसेवा स्वयंसहायता समुह बोदली, भाग्यलक्ष्मी स्वयंसहायता समुह जेप्रा, जीजामाता स्वयंसहायता समुह रानखेडा, प्रगती स्वयंसहायता समुह कनेरी, गृहलक्ष्मी स्वयंसहायता समुह माडेतुकूम, सरस्वती स्वयंसहायता समुह नगरी , श्रीसाई स्वयंसहायता समुह पोर्ला, पंचगंगा स्वयंसहायता समुह लांझेडा, धनलक्ष्मी स्वयंसहायता समुह विसापूर इत्यादी दहा गटांना उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले , राष्ट्रसंताच्या आर्थिक विचारांचा पाया स्वावलंबन आणि सहकार तत्त्व असून मानवधर्म फुलविण्यासाठी ग्रामगीता ग्रंथात राष्ट्रसंतानी अर्थविषयक ,बुध्दी कौशल्याची महत्त्वाची प्रमेये सांगीतलेली असल्याचे ते म्हणाले .प्रतिभा चौधरी , पीएसआय कुमरे आणि प्रिती हिरळकर यांनीही आपले स्वानुभाव सांगत नारीशक्तीचे महत्त्व , उद्योगशिलता यावर समयोचित मार्गदर्शन दिलेत. मेळाव्याच्या निमित्ताने नागपूर येथून आलेल्या तज्ज्ञ डाॕक्टरांकडून मोफत महिलांची आरोग्य तपासणी ,मार्गदर्शन तसेच औषधांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वरूण धोडरे यांनी मानले. जिल्ह्यातून आलेल्या ३५० इच्छूक महिलांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!