मानव विकास कार्यक्रमांतर्गत चेकआष्टा शाळेची विज्ञान बालभवनाला भेट

मानव विकास कार्यक्रमांतर्गत चेकआष्टा शाळेची विज्ञान बालभवनाला भेट


(सुरेश कन्नमवार)
सावली ता.प्रतिनिधी

विज्ञानाला विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले म्हणजे विज्ञानातील चुका सुधारून विज्ञानाने समाजाची प्रगती करता येते, हे समजून घेऊन विज्ञानाची कास धरून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा येथील विद्यार्थ्यांनी पोंभूर्णा येथील विज्ञान बाल भवनाला श्री सतिश शिंगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विज्ञानातील अनेक संबोध व संकल्पना समजून घेतल्या. यावेळी विज्ञान बालभवन जनता विद्यालय पोंभूर्णा येथील कोऑर्डिनेटर माननीय श्री चलाख सर यांनी विज्ञानातील विविध वैज्ञानिक चमत्कार समजावून सांगून पारंपारिक समाज हा कसा विज्ञानातील संकल्पना न समजल्यामुळे अंधश्रद्धेला बळी पडतो, हे समजावून सांगितले.
भारतीय समाजाची प्रगती करायची असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याने विज्ञानाला आपलंसं केलं पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान भवनातील विविध प्रयोगांचे निरीक्षण केले. विद्यार्थ्यांनी मानवाची उत्पत्ती, जलचक्र, कार्बन चक्र, सूक्ष्मदर्शी, पौर्णिमा अमावस्या, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, शरीराच्या रचना, शरीरातील अवयवांचे अंतर्गत कार्य इ. याविषयी सविस्तर माहिती प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेतले. यावेळी श्री अरुण आमावर सर हेदेखील उपस्थित होते. विज्ञान बालभवन बघून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होऊन येणाऱ्या काळात प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या आधारे समजून घेण्याचे विद्यार्थ्यांनी ठरवले. यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!