धानोरा येथे तेरवीच्या ऐवजी ग्रामगीता प्रणित जनप्रबोधनपर कार्यक्रम संपन्न
धानोरा येथे तेरवीच्या ऐवजी ग्रामगीता प्रणित जनप्रबोधनपर कार्यक्रम संपन्न
एकशे साठ ग्रामगीतेचे वितरण, शाळेला संगणक संच भेट - जेनेकर परिवाराचे आयोजन
धानोरा ता.राजुरा (प्रतिनिधी ) - आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचे एवढे प्रमाण वाढूनही समाज अनिष्ट रूढ्या - परंपरा सोडायला तयार नाही , ही समाजात रूजलेली घातक किड आहे. अंध अनिष्ट रूढ्यातून बाहेर पडल्याशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे, असे प्रतिपादन अ. भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी धानोरा येथे केले.
सुप्रसिद्ध समाजसेवी तथा माजी पं.स. सभापती दिवंगत मारोती पाटील जेनेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तेरवी न करता ग्रामगीताप्रणित जनप्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन जेनेकर परिवाराच्या वतीने आणि ग्रामस्थांचे सहकार्याने करण्यात आलेले होते. अध्यक्षस्थानी गुरूकुंज आश्रमचे उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ. भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, प्रचार प्रमुख दामोधर पाटील, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , गडचिरोली श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाप्रमुख डाॕ. शिवनाथजी कुंभारे, माजी आ. सुदर्शन निमकर, राजुरा तालुकाप्रमुख ॲड. राजेंद्र जेनेकर, प्राचार्य पंडीत पुडके, श्रीमती पार्वताबाई जेनेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या निमित्ताने गावाच्या प्रवेश द्वाराजवळ सेवा मंडळाच्या स्वागत फलकाचे अनावरण अतिथीच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी केले. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनी ग्रामगीता ग्रंथातील अंत्यसंस्कार अध्यायावर प्रकाश टाकत राष्ट्रसंतानी समाजात चेतना निर्माण करण्याचे महान कार्य केल्याचे ते म्हणाले. डाॕ. कुंभारे आणि पाटील गुरूजी यांनी रूढीबध्द समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ग्रामगीता कशी दृष्टी देते आहे याबाबत मनोगत मांडून जीवनाची समग्रता व परस्परावलंबिता यावर प्रकाश टाकला. स्मृतीदिनाचे निमित्ताने जेनेकर परिवाराच्या वतीने एकशे साठ ग्रामगीता ग्रंथाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते परिवाराशी संबंधित कुटूंबास, सामाजिक कार्यकर्त्यास, विविध मंडळास करण्यात आले तर साहित्य संच विरूर स्टेशन शहिद चिडे सार्वजनिक वाचनालयास प्रदान करण्यात आला. स्थानिक शाळेला संगणक संच व पोडीयम भेट देण्यात आले. ग्रंथभेट हे सुदर्शन जेनेकर, नरेंद्र जेनेकर, अविनाश जेनेकर आदीच्या हस्ते देण्यात आले. स्मृतीदिनाचे आयोजन राष्ट्रसंताच्या विचारानुसार केल्याबद्दल अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम तर्फे जेनेकर परिवाराच्या सदस्यांचा व बोबाटे, गौरकर, गोवारदिपे या तिन मुली व जावयांचा शाल व ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले . सूत्रसंचालन लटारू मत्ते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, युवा मंडळी तथा ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.
राष्ट्रवंदना आणि जयघोष नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!