बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाला आली जाग
भिसी स्मशानभूमीत वीजपुरवठा सुरू
नगर पंचायतीने घेतली तात्काळ दखल
प्रतिनिधी - ( पंकज मिश्रा )
भिसी : - भिसी येथील स्थानिक स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून पसरलेला अंधार आणि प्रकाशव्यवस्थेचा अभाव ही समस्या पब्लीक पंचनामा वेब पोर्टल तथा यासह विवीध वृत्तपत्रांनी प्रामुख्याने मांडल्यानंतर अखेर नगर पंचायतीने याची दखल घेतली आहे. बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन तात्काळ कामाला लागले आणि स्मशानभूमीतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, ज्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
भिसी येथील बायपासवर असलेल्या स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. येथे प्रकाशाची (लाइटची) कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे शोकाकुल कुटुंबीय आणि नागरिकांना अंधारातच अंत्यविधी पार पाडावे लागत होते. स्थानिक नागरिकांनी ही समस्या अनेकदा मांडली होती, परंतु यावर कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती.
माध्यमांत बातमी येताच प्रशासन अॅक्शन मोडवर या समस्येसंबंधीची बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच नगर पंचायतीच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली. अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तांत्रिक पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले आणि स्मशानभूमीतील वीजवाहिन्या व लाइट्सची दुरुस्ती करून प्रकाशव्यवस्था सुरळीत करण्यात आली.
नागरिकांनी मानले आभार
स्मशानभूमीत लाइट सुरू झाल्यामुळे आता रात्रीच्या वेळी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बातमी प्रसिद्ध करणाऱ्या माध्यमांचे तसेच नगर पंचायत प्रशासनाच्या या तात्काळ कारवाईचे कौतुक करत आभार मानले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!