वरोऱ्यात पिस्तूल व १० जिवंत काडतुसांसह आरोपी अटकेत

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा शहरातील वडर वस्ती परिसरात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने कारवाई करत एका व्यक्तीस पिस्तूल, दोन मॅगझीन व १० जिवंत काडतुसांसह अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडून वरोरा विभागात पेट्रोलिंग व अवैध धंद्यांवर कारवाई सुरू होती. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सत्यन टॉकीजच्या मागे, वडर वस्ती, वरोरा येथे राहणारा संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने (वय ४६ वर्षे) याच्या घराची झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान घरातून एक पिस्तूल, दोन मॅगझीन व १० जिवंत काडतुसे असा अवैध शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला असून आरोपीकडून मोबाईलसह एकूण अंदाजे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अपराध क्र. १०२/२०२६, कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत पोलीस निरीक्षक दीपक कांबेकडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!