नक्षत्राचं देणं काव्यमंच चे कार्य अभिनंदनीय - आ. सुधाकर अडबाले
चंद्रपूर (प्रतिनिधी) -
खरंतर कविता म्हणजे कमी शब्दांत व्यक्त होण्याचं, लोकांपर्यंत भावना पोहचवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. कवी शब्दांची निर्मिती करतो, आणि तो सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने काव्यातून आविष्कृत होत असतो. कवी खूप उच्च शिक्षित असावा हे महत्त्वाचे नसून समाजप्रती संवेदनशील असणारा व्यक्ती स्वप्रयत्नाने काव्य लेखन करू शकतो, असे प्रतिपादन आ. सुधाकर अडबाले यांनी केले. ते जे.बी. नगर येथे आयोजित 'नक्षत्रांचा काव्यझरा' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. नक्षत्राचं देणं काव्यमंच पूणे जिल्हा शाखा चंद्रपूर आणि झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. जि.प.चे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर मालेकर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, डॉ. विजय हेलवटे, गीतकार श्रीहरी शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
'नक्षत्रांचा काव्यझरा' म्हणजे महाराष्ट्रातील २७ कवींच्या १२५ काव्यांचा सुंदर फुलोरा असून यातील कवींनी ग्रामजीवन, निसर्ग , जीवनातील संघर्ष, शेतकरी बंधूच्या व्यथा, राष्ट्रप्रेम या विषयावरील कविता वास्तवाशी भिडणा-या आहे. श्रीधर मालेकर यांनी संपादक प्रा. राजेंद्र सोनवणे यांचे कौतुक करून नक्षत्रांचं देणं काव्यमंच या राज्यव्यापी संस्थेच्या साहित्य विषयक कार्याचे अभिनंदन केले . सदर काव्यसंग्रहात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रा. महेंद्र चौधरी, नामदेव गेडकर, महादेव हुलके, रोहिणी मंगरूळकर, मंजूषा खानेकर आदी कवींच्या कविता समाविष्ट केलेल्या आहेत . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धर्मा गावंडे यांनी केले तर बंडू टेकाम यांनी राष्ट्रसंतांच्या गीतांचे गायन केले . प्रभावी सूत्रसंचालन प्रा. नामदेव मोरे यांनी केले तर आभारप्रदर्शन अभय घटे यांनी केले. कार्यक्रमाला कवी शिवशंकर घुगूल, शशिकला गावतुरे , अर्पिता घागरगुंडे, सुनील इखारे, विमाशि पदाधिकारी , कवी, साहित्यिक व शिक्षक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!